गंगाखेडच्या मध्यवस्तीतून जाणारा रेल्वे मार्ग ‘बायपास’ कडे स्थलांतरीत करा !

422

🔹गोविंद यादव यांची मागणी न झाल्यास करणार सर्वपक्षीय जनआंदोलन

✒️अनिल साळवे(विशेष प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.20डिसेंबर):-गंगाखेड शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅक मुळे मोठी गैरसोय होत आहे. तहसील जवळील गेट सतत बंद राहण्याने वाहतुकीचा खोळंबा असून या ठिकाणी आता ऊड्डाणपूल प्रस्तावित केला जात आहे. या ऊड्डाणपूलावरील जवळपास दोनशे ते अडीचशे कोटी रूपयांचा खर्च अपेक्षीत आहे. हा खर्च वाचून नागरिकांची सोय व्हावी यासाठी हा रेल्वे ट्रॅक नव्या प्रस्तावीत रेल्वे बायपास मार्गावर स्थलांतरीत करावा, अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री व सर्व संबंधितांकडे केली आहे.

या संदर्भाने कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी रेल्वे च्या नांदेड विभागीय व्यवस्थापक ( डीआरएम ) निती सरकार यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या वेळी श्रीमती सरकार यांचेशी झालेल्या चर्चेत अनेक मुद्दे मांडले. नांदेड विभागा अंतर्गत येत असलेला नांदेड – परळी वैजनाथ हा जूना रेल्वे मार्ग गंगाखेड शहरातून जातो. शहराची वाढ झालेली असल्याने पूर्वी शहराबाहेरून असलेला हा रेल्वे मार्ग आता मध्य शहरात आलेला आहे. या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढलेली असल्याने रेल्वे गेट सतत बंद राहून वाहनांच्या रांगा लागणे, राष्ट्रीय महामार्ग असलेला नांदेड परळी रस्ता बंद पडणे हे प्रकार रोजचेच झालेले आहेत. परिणामी या रेल्वे गेट वर ऊड्डाणपूल बांधण्याची मागणी जोर धरीत आहे. तसेच रेल्वे आणि राज्य सरकारकडूनही ऊड्डाणपूल बांधणेबाबत सकारात्मक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या पूलासाठी दोनशे कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षीत आहे.

सध्या परभणी -परळी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाने गती घेतलेली आहे. गंगाखेड शहरातून जाणाऱ्या दुहेरी मार्गासाठीचे सर्वेक्षण पुर्ण झाले असून त्यासंदर्भातली अधिसूचनाही काढण्यात आली आहे. हा रेल्वे मार्ग गंगाखेड शहराच्या बाहेरून जाणार आहे. या बायपास मार्गावर भुयारी रस्ते, मानवविरहीत गेट अशा आवश्यक गोष्टी पुर्ण केल्या जाणार आहेत. यामुळे सध्या शहरातून जात असलेला रेल्वे मार्ग याच नवीन बायपास मार्गाने करण्यात आल्यास शहरात ऊड्डाणपूल बांधकामावर होणारा खर्च वाचणार आहे. याचबरोबर रेल्वे गेट बंद झाल्यामुळे रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकताही राहणार नाही. तसेच रेल्वे मार्ग शहराबाहेरून जाणार असल्याने अपघातांची संख्याही कमी होण्यास मदत होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता सध्याचा रेल्वे ट्रॅक नवीन बायपास मार्गाने वळवावा, अशी आग्रही मागणी गोविंद यादव यांनी केली.

यासंदर्भाने दिलेल्या निवेदनाच्या प्रती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार संज जाधव, आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, रेल्वे बोर्डाचे सदस्य अरूण मुंडे आदिंना देण्यात आल्या आहेत. हे न झाल्यास सर्वपक्षीय जनआंदोलन ऊभारण्याचा ईशारा गोविंद यादव यांनी दिला आहे. यावेळी साई सेवा प्रतिष्ठाणचे सचिव नागेश पैठणकर, संजय सोनटक्के यांची ऊपस्थिती होती.

*डिआरएम सकारात्मक !*
चर्चेदरम्यान गोविंद यादव यांनी मांडलेले मुद्दे डिआरएम निती सरकार यांना मान्य झाल्याचे दिसून आले. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत श्रीमती सरकार यांनी संबंधीत अधिकारी वर्गाशी लगोलग दुरध्वनीवरून चर्चा केली. ट्रॅक बदलण्याच्या संदर्भाने सर्वेक्षणासाठी अधिकाऱ्यांचे पथक लवकरच गंगाखेड येथे पाठवण्याचे अश्वासन त्यांनी यावेळी शिष्टमंडळास दिले.