तलाठ्यावर गौण खनिज तस्करांचा जीवघेणा हल्ला

4077

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

महागाव (दि. 21 डिसेंबर):-गौण खनिज तस्करीला पायबंद घालण्यासाठी गेलेल्या तलाठ्यावर रेती व माती माफियांनी जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यात तलाठी मोडके हे गंभीर जखमी झाले असून तहसील कार्यालयाचे वाहन चालक आडे किरकोळ जखमी झाले आहेत.

काल बुधवार दि. २० डिसेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास काळी टेंभी परिसरात ही घटना घडली आहे.

जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी महागाव तहसील कार्यालयात विभाग निहाय आढावा बैठक घेतली.

फुलसावंगी परिसरात प्रचंड प्रमाणात रेती आणि मातीचे अवैध उत्खनन करण्यात येत आहे. ही गौण खनिज तस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आज सक्त कारवाईचे आदेश दिले होते.

आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महागाव तहसील कार्यालयाचे रात्र गस्ती पथक फुलसावंगी परिसरात टेहळणी करीत असताना काळी टेंभी येथे मातीचे अवैध उत्खनन व वाहतूक करण्यात येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

पथक कारवाई करण्यासाठी सरसावले असता दहा ते पंधरा गौण खनिज तस्करांनी तलाठी मोडके यांच्यावर प्राण घातक हल्ला चढविला. तसेच तहसीलच्या वाहनाचे चालक आडे यांनाही मारहाण केली. त्यानंतर गौण खनिज तस्कर पळून गेले.

गंभीर जखमी झालेल्या अवस्थेतच तलाठी मोडके पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत.

रेती, माती आणि मुरुम तस्करांकडून हप्ते खाण्याचे काम आजवर तहसील व पोलीस प्रशासनाने इमान इतबारे केले आहे. या दोन्ही डिपार्टमेंटचा वरदहस्त लाभल्यामुळे महागाव शहरासह तालुक्यातील गौण खनिज तस्कर प्रचंड मस्तवाल झाले असून आज या गौण खनिज तस्करीतील भस्मासुराने तहसील यंत्रणेच्या डोक्यावर हात ठेवल्याचे दिसत आहे.