स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला थेट ग्रामपंचायतीसमोर

312

🔸गेवराई तालुक्यातील धक्कादायक प्रकार

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.22डिसेंबर):-तालुक्यातील सुशी गावात स्मशानभूमी नसल्याने ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून ठेवण्यात आला. सुशी येथील तुळशीराम आश्रुबा कलेढोण यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मात्र, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी सुशी गावात स्मशानभूमी नाही. गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते कुटुंब स्वत:च्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करतात. मात्र, तुळशीराम कलेढोण यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ते लोक ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करायचे तेथे गेले असता गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला.

म्हणून शेवटी तुळशीराम यांचा मृतदेह नातेवाइकांनी थेट ग्रामपंचायतीसमोर आणून मांडला. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत मृतदेह ग्रामपंचायतीसमोरच होता. घटनास्थळावर तलाठी, मंडल अधिकारी आणि पोलिस दाखल झाले होते. अधिकाऱ्यांनी समजावून सांगितल्यानंतर नातेवाइकानी शेतात अंत्यसंस्कार विधी केला.