ख्रिस्ती सण: ख्रिसमस डे!

116

(नाताळ- प्रभू येशू जन्मोत्सव- ख्रिसमस डे विशेष)

प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून साजरा होणारा हा सण आहे. नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स.३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने २५ डिसेंबर हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या संत मॅथ्यू आणि संत ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत, त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू.३३६मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला, असे मानले जाते.

या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, नाताळ शुभेच्छापत्र देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ख्रिसमस वृक्ष सजावट- ख्रिसमस ट्री- नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो, असे मानले जाते. यामध्ये चॉकलेट, केक, आदी वेगवेगळे पदार्थ बनविले जातात.
प्रभू येशूंच्या जन्मदिनाचे महत्त्व: ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ बायबलच्या संत लूक व संत मत्तय या दोन्ही शुभवर्तमानांमध्ये ख्रिस्तांच्या जन्माची हकीकत वर्णन केली आहे. त्यानुसार त्यांचा जन्म जुदेआच्या बेथलेहेम या गावी एका गोठ्यात झाला. संत लूकच्या लेखनातून येशूची आई मारिया आणि वडील योसेफ यांच्या दृष्टिकोनातून बेथलेहेमच्या यात्रेचा वृत्तान्त दिलेला आहे. असे मानले जाते की, या दिवशी देवदूताने त्यांना मसिहा म्हणून उद्देशिले व आजूबाजूचे सर्व मेंढपाळ त्यांची स्तुती करत होते. तसेच संत मॅॅथ्यू यांच्या सुवचनानुसार तीन राजे प्रभू येशूंना भेटायला आले होते. त्याच लोकांनी प्रभू येशूंना भेटवस्तू दिल्या.

प्रभू येशूंच्या जन्माचा संदेश मिळताच त्यावेळच्या राजा हेरॉडने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. त्यामुळे प्रभू येशूंचे कुटुंबीय जीव वाचवण्यासाठी इजिप्तला गेले. आत्म्याच्या योगे गर्भवती झाल्याचे स्वप्नातील दर्शनाद्वारे एका दूताने योसेफाला सांगितले. मोठ्या आनंदाने त्याने मारियाला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. योगायोगाने त्याच वेळी सीझर ऑगस्टस याने साऱ्या जगाची माहिती नावांनिशी लिहिली जावी, अशी आज्ञा केली. योसेफ हा बेथलेहेम या गावचा असल्याने त्याने आपल्याला वाग्दत्त असलेली मारिया हिलाही आपल्या बरोबर घेतले. तेथे पोहोचल्यावर तिचे दिवस भरले. परंतु सर्व उतारशाळा- धर्मशाळा भरल्या होत्या. त्यामुळे गाईच्या गोठ्यात त्यांनी आसरा घेतला. तिथेच मारियाने आपल्या पुत्राला जन्म दिला. मानव होऊन देव माणसात वस्ती करू लागला. स्वर्गीय देवदूतानी आपल्या राजेशाही थाटात त्यांच्यासाठी गायन गायिले. मेंढरे राखणाऱ्या मेंढपाळानी दिव्य बाळाचे दर्शन घेतले. पूर्वेकडच्या विद्वान लोकांनी येशू बाळाचा शोध घेऊन त्याला नमन केले. तर हेरोद राजाचे धाबे मात्र दणाणले. अशा प्रकारे कितीतरी वर्षापूर्वी विविध भविष्यवाद्यांनी जुन्या करारात केलेले भाकीत पूर्ण झाले.

कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल (यशया: ७:१४). यहुद्यांच्या वंशास तारणारा जन्मास येईल (उत्पत्ती: ४९:१०). तो दाविदाच्या घराण्यात जन्म घेईल (येहेज्केल: ३४:२३). ख्रिस्तजन्मापूर्वी इ.स.५०० वर्ष आधी मिखा भविष्यवाद्याने देखील हेच भविष्य सागितले होते (मिखा: ५:२).रोमन कालगणनेनुसार २५ डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळाचा दिवस आहे. प्रतीकात्मक कारणासाठी भगवान येशू यांनी आपल्या जन्मासाठी हा सर्वात छोटा दिवस निवडला, अशी धारणा आहे. प्राचीन धर्मोपदेशक ऑगस्टाईन यांनी नोंदविले आहे की, आपल्या पृथ्वीय अनुमानानुसार भगवान येशू सर्वात छोट्या दिवशी जन्माला आले. तरीही त्यामागील उदात्त आशय असा आहे की, त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो. त्यामुळे भगवान येशू आपल्यासाठी लीन झाले आणि त्यांनी आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला दाखविला. कारण यानंतरच्या दिवसांमध्ये सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो. या जन्माच्या स्मरणाचे औचित्य साधून चर्चमध्ये सायंकाळपासून प्रार्थना म्हणण्यात येतात. ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेस आवर्जून उपस्थित राहतात. काही ठिकाणी नाताळ सणापूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जाऊन येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. त्यांना कॅराॅल असे म्हणतात.

क्रिसमस किवा नाताळ हा सण प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत मुळीच अस्तित्वात नव्हता. खरे पाहता पूर्वी येशूजन्माचा उत्सव मागी लोकांच्या आगमनापर्यंत ६ जानेवारी या दिवशी साजरा केला जाई. पौर्वात्य ख्रिस्तसभेमध्ये तिसऱ्या शतकात आणि रोमन ख्रिस्तसभेमध्ये इ.स.३००च्या जवळपास नाताळ साजरा करण्यात येऊ लागला. रोम शहरात ही तारीख २५ डिसेंबर अशी ठरविण्यात आली. परंतु इतरत्र मात्र वेगळ्या दिवशी हा सण साजरा केला जाई. रोममधील रोमन लोक सूर्याची देव म्हणून उपासना करीत. २२ डिसेंबरनंतर सूर्याचे दक्षिणायन संपून त्याचे उत्तरायण सुरू होते व दिवस मोठा होऊ लागतो. रोमन लोकांच्या धार्मिक श्रद्धेनुसार हा सूर्याचा जणू नवीन जन्म असतो. आपल्या देवाचा हा नवजन्म रोमन लोक मोठ्या आनंदाने साजरा करीत. कॉन्स्टन्टाईन या रोमन सम्राटाने याच सुमारास ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्याने ख्रिस्ती धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्याची उपासना न करता सूर्याचा निर्माता आणि नीतिमत्तेचा सूर्य जो प्रभू येशू त्याची उपासना करणे सुरू केले. अशा प्रकारे २५ डिसेंबर हा दिवस रोमन कॅथोलिक ख्रिस्तसभेत प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. सूर्यदेवाच्या वाढदिवसाला रोमन भाषेत नातालीज सोलिस इनइक्विटी म्हणजे अजिंक्य सूर्यदेवाचा वाढदिवस असें म्हणत. त्यावरून या उत्सवाला नाताळ असें नाव पडले. संत क्रिजोस्तम तर म्हणत, “आपल्या प्रभूवाचून आणखी दुसरा अजिंक्य देव तो कोण आहे? तो तर न्यायाचा सूर्य आहे.“

कॅथोलिक ख्रिस्तसभेमध्ये ख्रिस्तजन्माची स्मृती म्हणून गोशाळा किवा गायीचा गोठा तयार करण्याचा प्रघात आहे. ही परंपरा संत फ्रान्सिस असिसिकर याने १२२३ साली सुरू केली. ग्रेसिओ नावाच्या एका लहान गावाजवळ असलेल्या गुहेमध्ये त्याने खरी गाय, उंट, मेंढरे, गाढवे आदी आणून असा देखावा निर्माण केला. त्याद्वारे लोकांना देवाच्या अपार दयेची व ख्रिस्ती धर्माची शिकवण दिली. ही प्रथा गावातील लोकांनी पूर्वापार पाळत ठेवली. असे म्हणतात की, त्या वेळी संत फ्रान्सिस याने पवित्र मिस्सा अर्पण केली व लोकांना भावस्पर्शी प्रवचन दिले. त्या प्रवचनाच्या शेवटी या संताच्या हातात खरोखरच एक जिवंत बालक अवतरल्याचे लोकांनी पहिले. त्यामुळे गोशाळा उभारण्याच्या प्रथेला आणखी बळकटी मिळाली. अकराव्या व बाराव्या शतकात ख्रिसमस कॅराॅल किवा नाताळ गीतांची प्रथा जर्मनीत सुरू झाली. दहाव्या शतकात ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा सुरू झाली. ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड व क्रूसाचे झाड यांचे प्रतीक आहे. ख्रिसमस ट्रीचा अधिक सविस्तर उल्लेख १६०५मध्ये आढळतो.

!! ख्रिस्ती बांधवांना नाताळ निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.गडचिरोली, फक्त मधुभाष- ७१३२७९६६८३