दहिवडी आगार असून अडचण;नसून खोळंबा!

204

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔸दगडापेक्षा वीट बरीःएस.टी.नसल्याने प्रवासी नाराज

म्हसवड(दि.27डिसेंबर):-माण तालुक्याचे मुख्यालय असलेल्या व मतदारसंघाची राज‌धानी असलेला दहिवडी एस.टी.आगाराबद्दल प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.प्रवाशांना तीन-तीन तास एस.टी.ची वाट पहावी लागत असेल तर दगडापेक्षा वीट बरी असे म्हणून प्रवासी खाजगी वाहन वडापचा वापर करताना दिसून आले.

दहिवडी बस स्थानकातून दुपारी १२ः०० वाजल्यापासून जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या सातारला जाण्यासाठी २:१५ पर्यंत एकही एस.टी.बस उपलब्ध नसल्याने दहिवडीच्या आगाराचा भोंगळ कारभार ऐरणीवर आला आहे.सकाळी ११ः३० वाजता बस स्थानकावर आलेले रुग्ण,अबाल वृद्ध,महिला,विद्यार्थी, विद्यार्थिनी तीन तास बस स्थानकावर बसून होते.प्रवाशांनी संपर्क साधल्यानंतर कशीबशी १:३० वाजता बस आली,परंतू त्यानंतर चालक उतरले आणि २:१५ वाजता बस सुरु केली.नंतरचा प्रकार असा की,बस तीन तासानंतर आल्याने आगारप्रमुखांनी किमान दोन बस तरी पाठवणे आवश्यक होते.परंतू तसे न करता एकच बस पाठवली.त्यामुळे एकुण ४५ ची आसन क्षमता असलेल्या बसमध्ये १४५ प्रवासी प्रवास करताना दिसून आले.

जादा प्रवासी असल्याने तिकीटे काढण्याच्या कारणास्तव वाहकाच्या विनंतीप्रमाणे चालकाने बस धीम्या गतीने चालवली नंतर आगाराने दोन बसेस पाठवल्या.परंतू चालक वाहकाने पाठीमागच्या बसमध्ये बसण्याचा आग्रह प्रवाशांना करून पिंगळी,महिमानगड,निढळ मध्ये प्रवासी घेतले नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी बोलून दाखवली.मग १४५ जण असून किती प्रवा‌सी एस.टी.प्रशासन बसवणार? असा सवाल प्रवाशांनी विचारला आहे.

प्रवाशांनी आगारप्रमुखांना संपर्क साधला असता,ते दत्त जयंतीची वर्गणी गोळा गोळा करताना दिसून आले.त्यामुळे तुम्हाला नक्की प्रशासनाने आगाराच्या सेवेसाठी नेमले आहे की वर्गणीसाठी? अशा तीव्र प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.सातारसारख्या जिल्ह‌याच्या ठिकाणी रुग्णालय,शासकीय कार्यालये,महाविद्यालये असल्याने हजारो प्रवासी दररोज सातारला ये-जा करत असतात.जर या कार्यालय किंवा रुग्णालयात जाण्यासाठी प्रवासी ११ः३० बसस्थानकावर आला आणि जर तो ५:०० वाजता सातारला पोहोचत असेल तर दुसरी कोणती शोकांतिका असू शकते.

दहिवडीतून सातारला बसेसनी जाण्यासाठी दोन तास कालावधी जातो.परंतू आता कोरेगाव शहरातील रस्त्याच्या कामामुळे जवळपास तीन तास लागतो.त्यामुळे २.१५ वाजता एस.टी.ने गेलेले प्रवासी ५:०० वा.पोहोचले आणि त्याच बसने मागारी परतले.यामुळे परिवहनचा भोंगळ कारभार ऐरणीवर आला आहे.हा सर्व घटनाक्रम पाहता आगारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर जिल्हा व राज्यस्तरावरून काय कारवाई होणार? याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.

आगाराला कार्यक्षम आगारप्रमुख देता का?

मावळते आगारप्रमुख विक्रम हांडे यांच्या विरुध्द कर्मचारी व प्रवाशांच्या तक्रारीमुळे व कर्मचाऱ्यांच्या व संघटनांच्या आग्रहास्तव लोकप्रतिनिधींनी नवनियुक्त आगारप्रमुख कुलदिप डुबल यांची दहिवडी आगारात तडकाफडकी बदली केली खरी,पण एवढा सर्व आटापिटा करुनही जर आगार प्रशासन जैसे थे असल्याने व आगारप्रमुख आगाराचा नफा वाढवण्यात व नफा असलेल्या मार्गावर फेऱ्या वाढवण्यात धन्यता मानत असतील तर सर्वसामान्य प्रवाशांनी दाद मागायची तरी कोणाकडे? यासह अनेक प्रतिक्रिया प्रवाशांनी बोलून दाखवल्या आहेत.