बीड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा; १८ गावांच्या विहिरींचे अधिग्रहण 

301

🔸गेवराई तालुक्यातील देवपिंप्रीमध्ये एक टँकर सुरू

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.30डिसेंबर):-पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यात १८ विहिरी – बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर गेवराई तालुक्यातील देवपिंप्रीमध्ये एक टँकर सुरू झाला आहे. पाण्याची मागणी वाढत असल्याने जिल्हा परिषदेने १८ विहिरी – बोअरचे अधिग्रहण करण्यात केले आहे. पुढील काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, असे आता झालेल्या परिस्थितीवरून समजून येत आहे. हिवाळ्याचे दोन व उन्हाळ्याचे चार असे सहा महिने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

पावसाळ्यात चांगला पाऊस झाला नाही. परिणामी लहान – मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. यामुळे धरण क्षेत्रानजीकची पाणीपातळी वाढलेली नाही. मोठा पाऊस झाला नसल्याने जमिनीची पाणी पातळी खालावली आहे. उन्हाळ्यापूर्वी हिवाळ्यातच ग्रामीण भागात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. नद्या कोरड्या पडल्या आहेत, तर बोअरचे पाणी आटू लागत असल्याची स्थिती सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

या तालुक्यात झाले अधिग्रहण
——————————————-

पाणीटंचाईची मागणी होत असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून विहीर व बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बीड तालुक्यातील ६, गेवराई तालुक्यातील ४, वडवणी तालुक्यातील ५ व धारुर तालुक्यातील ३ अशा एकूण १८ गावांमध्ये पाण्याचे स्रोत म्हणून विहिरी व बोअरचे अधिग्रहण झाले आहे.