पंचायत समिती फलटण व नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

125

🔸शुद्ध पाणी हा मूलभूत अधिकार: मा.श्री.सी.जी.मठपती(विस्तार अधिकारी, पंचायत समिती, फलटण)

✒️फलटण(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

फलटण(दि.१५जानेवारी):- श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय व पंचायत समिती, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१५ जानेवारी रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धा नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटणच्या प्रशस्त व सुविधांनी युक्त अशा हॉल क्रमांक एक मध्ये पार पडल्या.

सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या स्पर्धा दुपारपर्यंत चालल्या. या स्पर्धांपूर्वी सर्व महाविद्यालयांना महाविद्यालय स्तरावर स्पर्धा घेणेविषयी जिल्हा परिषद सातारा यांनी मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. ‘जल जीवन मिशन’ या योजनेच्या प्रेरणेतून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या महाविद्यालय स्तरीय स्पर्धेतून तीन विजेत्या वक्त्यांची निवड आज पार पडलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी करण्यात आली होती. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तालुक्यातील जवळजवळ सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धक व प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय जाधव होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती फलटणचे विस्तार अधिकारी माननीय श्री.सी.जी.मठपती उपस्थित होते. स्पर्धकांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे श्री.मठपती यांनी पिण्याचे शुद्ध पाणी हा जनसामान्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले यासारख्या स्पर्धांमधून भविष्यातील सुजाण नागरिक घडवण्याचे काम नित्यनियमाने होत असते. पाण्याचे मूल्य सर्व नागरिकांना कळावे या हेतूने सातारा जिल्हा परिषदेने ‘जल जीवन मिशन’ प्रभावीपणे राबवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. यानंतर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांसाठी सर्व तालुक्यातील विजेत्यांना स्पर्धक म्हणून निमंत्रित केले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय स्तरावर एकूण ७५ हजार रुपयांची बक्षिसे सातारा जिल्हा परिषद वितरित करणार आहे.

या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटणचे स्पर्धा समिती अध्यक्ष प्रा.डॉ.संदेश बिचुकले यांच्या कमिटीने पार पाडले. आपल्या प्रास्ताविकात डॉ.संदेश बिचुकले यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करतानाच स्पर्धेचे नियम व निकष याविषयी देखील मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे श्री.सी.जी. मठपती यांचे स्वागत आय क्यू ए सी समन्वयक प्रा.डॉ.दीपक राऊत यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांसोबतच मा.श्री.दारासिंग निकाळजे (केंद्रप्रमुख झिरपवाडी), मा.श्री दत्तात्रय तोरस्कर (वरिष्ठ लिपिक, पंचायत समिती फलटण), मा. सौ.दमयंती कुंभार (गटप्रमुख, पंचायत समिती फलटण), श्री.पिनाक आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.उदय जाधव सर यांनी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पाणी प्रश्नावर काम करणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. वक्तृत्व स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. परीक्षणाचे कार्य बी. आर. सी. समन्वयक श्री.विनोद शिंदे, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय-राज्यशास्त्र विभागाचे प्रा.श्री.श्रेयस कांबळे आणि मुधोजी हायस्कूल व जुनियर कॉलेज चे प्रा.श्री.एस.एम.पवार यांनी निःपक्षपातीपणे पार पाडले.

कनिष्ठ विभागात मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणची विद्यार्थिनी कु.दामिनी पाटील हिने बाजी मारली. तर द्वितीय व तृतीय क्रमांकावर अनुक्रमे मुधोजी महाविद्यालय फलटण ची विद्यार्थिनी पायल जाधव व मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटणची विद्यार्थीनी कु.सृष्टी पाटील यांचा क्रमांक लागला.

वरिष्ठ विभागात नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. यश बापू नामदास या कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कु.तृप्ती माने तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस कु.ज्ञानेश्वरी बिबे या विद्यार्थिनींना मिळाले.

स्पर्धा पार पडल्यानंतर आयोजक, मान्यवर व परीक्षकांच्या संमतीने प्रा.डॉ. संदेश बिचुकले यांनी स्पर्धेचे निकाल जाहीर केले. बक्षीस वितरण कार्यक्रमात स्पर्धेचे परीक्षक प्रा.श्रेयस कांबळे यांनी स्पर्धकांना जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी शुभेच्छा देतानाच आता हे विजेते केवळ त्यांच्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करत नसून संबंध फलटण तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहेत असे गौरवोद्गार काढले. कार्यक्रम झाल्यानंतर देखील परीक्षकांनी स्पर्धक विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शनपर सूचना केल्या. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रा.श्री. विकास तरटे, प्रा.श्री नितीन नाळे, प्रा.श्री.रणवरे सर उपस्थित होते. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व पंचायत समिती अधिकारी वर्गाने प्रा.डॉ.संदेश बिचुकले व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. प्रा.श्री.विठ्ठल गौंड यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.