गंगाखेडमधील आगग्रस्त दुकानदारांना मदत देण्याची मागणी

78

🔹तीन दुकाने भस्मसात

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.17जानेवारी):-शहरातील डॉक्टर लेन परिसरातील तीन दुकानांनी आज पहाटे अचानक पेट घेतला. यात आतील सामानासह दुकानांचे आतोनात नुकसान झाले. या आपदग्रस्तांना तातडीने आर्थीक मदत द्यावी, अशी मागणी तालुका कॉंग्रेसच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली.

आज पहाटे शहरातील मयुर ड्रायक्लिनर्स, बालाजी फर्निचर व जमिर फर्निचर या दुकानांनी पेट घेतला. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात येताच अग्नीशमन यंत्रणांशी संपर्क साधण्यात आला. नगर परिषद आणि जी सेवन शुगर्सच्या अग्नीशमन यंत्रणांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. तोपर्यंत बापुराव ( बंडू ) वाघमारे यांचे मयुर ड्रायक्लीनर्स हे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यात आतील यंत्र सामग्री, जवळपास १५०० कपडे नग व फर्निचर असे अंदाजे १५ लाख रूपयांचे साहित्य भस्मसात झाले. बाजूस असलेल्या अरविंद साळवे यांच्या बालाजी फर्निचर व जमिर फर्निचर या दुकानांनाही आगीची झळ बसून या दोन्ही दुकानांतील मशिनरी आणि साहित्य जळून जवळपास २० लाख रूपयांचे नुकसान झाले.

या आपदग्रस्त दुकानदारांसह कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, बाजार समिती संचालक सुशांत चौधरी यांनी तहसीलदारांची भेट घेवून निवेदन सादर केले. या दुकानदारांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना तहसीलदारांनी संबंधीतांना दिल्या असून अर्थसहाय्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याचे यावेळी सांगीतले. दरम्यान, गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनीही या प्रकरणात तहसीलदारांना सुचना केल्या. मदतीचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा. शासनस्तरावरून मदत मिळवून देवू, असे अश्वासन आ. गुट्टे यांनी आपदग्रस्त दुकानदारांना दिले.