मराठा आंदोलकांसाठी कोळगावसह ५० गावे अन्नदानासाठी सज्ज

36

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कुच करण्यासाठी मराठा बांधव सज्ज झाले आहेत. २० जानेवारी रोजी सराटे अंतरवाली येथून मुंबईकडे निघणाऱ्या मराठा बांधवांसाठी दुपारच्या जेवणाची सोय कोळगाव याठिकाणी केली आहे. दरम्यान, या भव्य अन्नदानासाठी कोळगावसह आजूबाजूच्या ५० गावांतील नागरिकांनी हातभार लावण्याचा निश्चय केला आहे.

यावेळी २० ठिकाणी जेवणाचे स्टॉल, पिण्याच्या पाण्यासाठी जार, हात-पाय धुण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याचे टँकर उभे करण्यात येणार आहेत. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था कोळगाव येथील नागरिकांनी केली आहे.

कोळगाव परिसरातील ५० गावांतील नागरिकांनी अन्नदानासाठी हातभार लावण्याची तयारी दर्शवली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून ग्रामस्थांनी बैठक घेऊन नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. आता तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गावातील तरुण, ग्रामस्थ अन्नदानासाठी सज्ज झाले असून स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदारी देण्यात आल्या आहेत.

स्वयंसेवकांची नियुक्ती
—————————
कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव येथे २० ठिकाणी जेवणाचे स्टॉल ठेवले आहेत. यामध्ये पुरी, ठेचा, खिचडी, भाकरी, बेसन, उपमा, शिरा, भाजी असे पदार्थ ठेवले जाणार आहेत. पिण्याचे पाणी, ठिकठिकाणी पाण्याच्या टँकरची सोय केली आहे. वाहनांच्या पार्किगची व्यवस्था केली आहे. तर शेकडो स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.