तालुकास्तरीय पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा संपन्न

195

✒️विशेष प्रतिनिधी(सौ.अश्विनी जोशी)

जिंतूर(दि.25फेब्रुवारी):- राधाकृष्ण मंगल कार्यालय, जिंतूर येथे तालुकास्तरीय पारितोषिक वितरण तथा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वरिष्ठांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने आणि जिंतूर तालुक्यातील सर्वांच्या सहकार्याने तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होण्याच्या हेतूने…. दर्जेदार पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या ध्येयावर वाटचाल करण्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांना तालुक्याने उदंड प्रतिसाद दिला. यामध्ये हिरीरीने आणि उत्साहाने सहभाग घेऊन विजयी झालेल्या आणि उत्साहाने सहभाग घेतलेल्या सर्वांचा या कार्यक्रमात गुणगौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डायट परभणीचे प्राचार्य विकास सलगर, तहसीलदार राजेश सरवदे, नायब तहसीलदार प्रशांत राखे, गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश नरवाडे, तालुकास्तरीय पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा यासाठी विशेष सहकार्य करणारे रमेश दरगड, सन्मानचिन्ह उपलब्ध करून देणारे संदीपआप्पा लकडे, या कार्यक्रमासाठी आपले भव्य श्री राधाकृष्ण मंगल कार्यालय उपलब्ध करून देणारे कार्यालयाचे सर्वेसर्वा कैलासराव आदमाने, अल्पोपहार व्यवस्था करून देणारे ब्रिजगोपाल तोष्णीवाल, सन्मानपत्र उपलब्ध करून देणारे लक्ष्मीकांत टाले उपस्थित होते.

या कार्यक्रमात सर्व विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते सन्मानाने प्रदान करण्यात आले. . सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या सर्व उपक्रम व स्पर्धांमध्ये ज्या अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस, सेवक या सर्वांनी महत्वाचे योगदान दिले त्या सर्वांचा सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान यामध्ये तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या शाळा, केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या शाळा यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शाळेच्या समृद्धतेसाठी ग्रामस्थ, पालक, दानशूर व्यक्ती यांच्याकडून देणगी स्वरूपात लोकसहभाग प्राप्त करणाऱ्या शाळेचा, दानशूर व्यक्तीचा, शाळा व्यवस्थापन समितीचा, मुख्याध्यापक व शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. . तालुकास्तरावर शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विशेष मार्गदर्शन तासिकेमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या तज्ञ सुलभकांचा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या ग्यानप्रकाश फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचा गुणगौरव करण्यात आला.

एकंदरीत संपूर्ण कार्यक्रमात जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा, कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेले शिक्षकांचे कवी संमेलनात सहभागी झालेले कवी, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले प्रतिभासंपन्न शिक्षक, उपक्रमशील शिक्षक, अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षणाचे सुलभक असणारे शिक्षक, यांच्यासह गुणवत्ता विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या अनेक शिक्षक बांधवांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तालुकास्तरावर घेण्यात आलेले विज्ञान प्रदर्शन, नवोदय सराव परीक्षा, चित्रकला, निबंध, वक्तृत्व, कबड्डी, खो-खो, वैयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य, वैयक्तिक गीतगायन, लघु नाटिका या स्पर्धेमध्ये विजयी झालेले स्पर्धक आणि सहभागी झालेले स्पर्धक यांनाही गौरविण्यात आले.

एकंदरीत जिंतूर तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय भव्य-दिव्य आणि दिमाखदार सोहळा सर्वांना अनुभवता आला याबद्दल वरिष्ठ कार्यालयाने जिंतूर तालुक्याचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी मयूर जोशी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केशव घुगे, मनोज तोडकर, तुकाराम चव्हाण, दिनकर चौधरी, प्रकाश चव्हाण, मधुकर घनसावंत, सुनील शंकपाळे, राम आडे, डी. जी. पोले, पांडुरंग भांबळे, मारोती घुगे, दिनकर घुगे, शंकर चव्हाण, राजेंद्र ढाकणे, चंद्रकांत मानवते, लक्ष्मण टाकणसार, विकास सातभाई, विष्णु शिंदे, शंकर माने, जयानंद मत्रे, शिवाजी तेकुलवार, भास्कर मुंडे, अनिल स्वामी, माधव गडदे, रवींद्र राठोड, हनुमान गायकवाड, सुनील फड, योगिता संगवई, रत्नमाला तोडकर यांच्यासह संपूर्ण जिंतूर तालुक्यातील शिक्षण विभागाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.