संवेदनशील काळजाचा उस्फुर्त हुंकार म्हणजे मराठी……

98

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला. २७ फेब्रवारी हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण मराठी भाषेचा सन्मान सोहळा साजरा करतो. या दिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने सर्व मराठी भाषिकांनी आपल्या मातृभाषेचे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे. मराठी भाषेमधून सातत्याने काळजाचा काळजाशी संवाद चालू असतो. या भाषेत काहीही अर्थ नसणाऱ्या साध्या हुंकारामध्ये सुद्धा भावना गच्च भरलेल्या असतात.

एवढी संवेदनशील आणि भावनिक मातृभाषा मराठी ही आहे. म्हणून मराठी ही आपली मातृभाषा आणि राजभाषा असल्याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान असला पाहिजे. सातत्याने आपण सर्वांनी आपल्या मराठी भाषेचा अभिमान आणि मराठी विषयीचे प्रेम जपले पाहिजे. खऱ्या अर्थाने आपल्या मराठी राजभाषेच्या संगोपन आणि संवर्धनासाठी प्रत्येक मराठी माणसाने पुढे आले पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजेत. तरच अत्यंत रसाळ, भावनिक आणि हृदयस्पर्शी मराठी राजभाषेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार होणार आहे. मराठी ही केवळ आमची मातृभाषाच नाही तर खऱ्या अर्थाने संवेदनशील काळजाचा हुंकार आहे हे माझ्या या कवितेतून मला सांगावे वाटते…

मराठी आमुचा स्वाभिमान आहे….

शब्दसौंदर्याने नटलेली
मराठी भाषा आमचा मान आहे
मराठी आहोत मराठीच बोलू
मराठी आमुचा अभिमान आहे….

मराठी राजभाषा म्हणजे
केवळ आपली मातृभाषा नाही
तर तो मराठी काळजातल्या
भावना जाग्या असल्याचे भान आहे….

भेट क्षणाची तुझी नि माझी
संवाद राहतो स्मरणामध्ये
अतुट ठेवते बंध मनाचे
मराठी आमुची शान आहे….

राग-लोभ अन् चूक-भूल ही
संपवून टाकते गोड शब्दांनी
माणूस जोडते माणसाला
मराठी नात्याचाही प्राण आहे….

ज्ञान घेतले विविध भाषेचे
बहुभाषिक झालो आम्ही
तरी जाणतो महत्व माईचे
मराठी आमुचा स्वाभिमान आहे….

मराठी भाषेला खूप मोठी साहित्यिक परंपरा आहे. मराठी भाषेतील ऋषीतुल्य साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी, लेखक, साहित्यकार, नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस त्यांच्या विलोभनीय मराठी साहित्य कृतीमुळे मराठी राजभाषा दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिनानिमित्त मराठीतील या ऋषीतुल्य साहित्यिकास त्रिवार वंदन….!

अनेक संत आणि प्रसिद्ध साहित्यिकांनी मराठी भाषा प्रचंड समृद्ध केली आहे. मराठी भाषे एवढे भावस्पर्शी, हृदयस्पर्शी, काळीज हेलावून टाकणारे, प्रत्येक मानवी मनाला संवेदना शिकवणारे लोभस, रसाळ साहित्य इतर कोणत्याही भाषेमध्ये एवढ्या विपुल प्रमाणात नसेल. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजासह अनेक दिग्गज साहित्यिकांनी आपल्या अलौकिक लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेमध्ये अविस्मरणीय आणि जगाला चिरंतन प्रेरणा देणारी साहित्य निर्मिती केली आहे. मराठी भाषेतल्या फक्त कविता या साहित्य प्रकाराचा विचार केला तरीही किती मोठा साहित्यिक वारसा मराठी भाषेला आहे हे लक्षात येईल. कवितेमध्ये अभंग, भारुड, ओव्या, भजन, पद, गीत, लोकगीत, गझल, कविता यासारख्या कितीतरी साहित्य प्रकारात विपुल आणि उदबोधक लेखन झालेले आहे.

या दैदीप्यमान परंपरेचा वारसा आजही अनेक दिग्गज सारस्वत मंडळी कडून जोपासला जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक हृदयांला स्पर्श करणाऱ्या, माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या, सबंध मानव जातीला उद्बोधक विचार देणाऱ्या साहित्यकृती निर्माण होत आहेत. हे खऱ्या अर्थाने मराठीचे सदभाग्य आहे. त्याचबरोबर आवर्जून नोंद करावी वाटते की, आजच्या आधुनिक काळात गरजेनुसार आवश्यक त्या प्रत्येक भाषेचा अभ्यास करा. प्रत्येक भाषा शिका..‌‌.. बहुभाषिक व्हा… विविध भाषेमध्ये असणाऱ्या ज्ञानाने समृद्ध व्हा… पण त्याबरोबर आपण मराठी मातीत जन्माला आलो आहोत. मराठी भाषेचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे याचे जाण आणि भान प्रत्येक व्यक्तीने ठेवले पाहिजे. कारण कायम लक्षात असावे इतर कोणत्याही भाषेवर कितीही प्रभुत्व मिळवले तरी सुख-दुःख आणि भावना व्यक्त करायला मातृभाषेचाच आधार घ्यावा लागतो. म्हणून या लेखाचा शेवट माझ्या मराठी भाषेवरील कवितेने करणे योग्य वाटते.

माझी मराठी मराठी….

माझी मराठी मराठी
जीवनाचा खरा श्वास
माणसांना जोडणारी
संवादाची भाषा खास…….

माझी मराठी मराठी
ज्ञान सागर अफाट
परी मायेचा ओलावा
भावनांचा उंच घाट……

माझी मराठी मराठी
जशी अमृताची गोडी
तिच्या रसाळ शब्दांनी
बोलणारी भाववेडी……

माझी मराठी मराठी
आहे लावण्याची खान
वर्ण स्वरांचे सौंदर्य
उच्चरांचे ठेवा भान……

माझी मराठी मराठी
आहे परंपरा थोर
ओवी, अभंग, भारुड
नानाविध आविष्कार…….

माझी मराठी मराठी
परिपुर्ण भावस्पर्श
व्यक्त होती इथे सारे
राग, लोभ आणि हर्ष…..

माझी मराठी मराठी
नाही व्यवहारी भाषा
थोर संस्कृती विश्वाची
अभिजात राजभाषा……

✒️मयुर मधुकरराव जोशी(ग्रीन पार्क जिंतूर जि परभणी)मो:-9767733560,7972344128 (calling)