उमरखेड येथे अतिक्रमणित जागेवरून झालेल्या वादात चाकू हल्ला (युवक जखमी)

223

✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(दि.२७ फेब्रुवारी):-शहरातील रस्त्याच्या बाजूला अतिक्रमणित जागेवर असलेला ठेला बाजूला ढकलून दिला.या कारणावरून झालेल्या वादात युवकावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना पोलीस स्टेशन समोरील ढाणकी रोडवर काल दिनांक २६ च्या रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली.

क्षुल्लक कारणावरून पोलीस स्टेशनच्या समोर चाकू हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
सय्यद तसलीम सय्यद मुसा वय ३५ रा आझाद वार्ड उमरखेड असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव असून यातील आरोपी सय्यद सद्दाम सय्यद रशीद वय २७ याने सदर युवकाच्या दुकानासमोर टीन पत्राचा बनवलेला पानपट्टीचा ठेला आणून ठेवल्याने जखमी व आरोपीमध्ये वाद होऊन नंतर आरोपीचा ठेला बाजूला ढकलून दिल्याने चिडून जाऊन आरोपी सय्यद सद्दाम सय्यद रशीद याने जवळचा चाकू काढून तसलीम याच्या कानाच्या वर कपाळावर डोक्यावर वार करून जखमी केले.

सदर घटना पोलीस स्टेशनच्या अगदी समोर घडत असल्याने तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले आहे.जखमी युवकास येथील खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर त्यास नांदेड येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.

सदर घटना शासकीय जागेवर अतिक्रमण करत असताना व पोलीस स्टेशनच्या समोर झाल्याने उमरखेड मध्ये पोलीस प्रशासनाचा वचक संपल्याचे या घटनेवर दिसत असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणाचा तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी निलेश सरदार करीत आहे.

चौकट :- शहरातील चौकाचौकात अतिक्रमणाने विळखा घातला असल्याने रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना व पादचारी प्रवाशांना वाहतुक कोंडीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.अतिक्रमणामुळे जिवघेण्या हल्ल्याच्या घटना घडत असल्याने प्रशासनाने रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या ठेल्यांचे अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करावे अशी मागणी सदर घटनेवरून समोर येत आहे.