कोल्हापुरच्या ‘न्युटन’ चा नवा सिध्दांत, ५ रूपयेची वस्तू पाचशेला !

102

🔸भ्रष्टाचारी बोके हसन मुश्रीफांच्या छत्रछायेखाली आहेत का ?

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

कोल्हापुरच्या छत्रपती प्रमिला राजे रूग्णालयात सर्जीकल साहित्य खरेदीत कोट्यावधीचा घोटाळा झाला आहे. एका सर्जिकल साहित्य पुरवणा-या बोगस कंपनीने अधिका-यांना हाताशी धरून सुमारे दहा कोटीचे साहित्य खरेदी केले आहे. ‘न्युटन’ एंटरप्रायजेस या कोणताही परवाना नसलेल्या कंपनीने सुमारे साडे नऊ कोटीचे सर्जिकल साहित्य खरेदी केले आहे. जगाला ‘न्युटन’ नावाचा शास्त्रज्ञ आणि त्याचा जगप्रसिध्द सिध्दांतही माहिती आहे. पण या कोल्हापुरच्या नव्या घोटाळेबाज ‘न्युटन’ ने भ्रष्टाचाराच्या बाबतीत नवा सिध्दांत मांडत मोठा घोटाळा केला आहे. त्याने सर्जिकल साहित्याच्या किंमती बाजारापेक्षा वाजवी दराने खरेदी केल्या आहेत.

पाच रूपयेची वस्तू पाचशेला खरेदी करत घोटाळा केला आहे. अशा पध्दतीने कोल्हापुरच्या सी पी आर मधला हा घोटाळा गेले महिनाभर चर्चेत आहे. विशेष म्हणजे इतका मोठा घोटाळा उघड होवून घोटाळा करणारांचे काहीच वाकडे झाले नाही. सदरची घोटाळेबाज ‘न्युटन’ कंपनी आणि तिच्या मालकावर कोणतीही कारवाई झालेली नाही. सदर घोटाळेबाज कंपनीचा मालक हसन मुश्रीफांच्या छत्रछायेत असल्याची चर्चा आहे. त्यांच्यामुळेच त्याचा बालही बाका होताना दिसत नाही.

कोल्हापुरला छत्रपती शाहू राजांचा वारसा आहे. तिथं या भ्रष्टाचारी बोक्यांची सध्या चलती होताना दिसते आहे. लोकांच्या सेवेसाठी उघडण्यात आलेले सरकारी दवाखाने या भडव्यांच्या दलालीचे अड्डे झालेत की काय ? असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय रहात नाही. सरकारी दवाखान्यात सामान्य माणूस उपचारासाठी, सुविधेसाठी तडफडताना दिसतो. तिथली व्यवस्था, यंत्रणा नीट काम करत नाही. केवळ कोल्हापुरचेच नव्हे तर राज्यभर सरकारी रूग्णालयांची हिच अवस्था आहे. सामान्य माणूस सरकारी रूग्णालयात जाताना घाबरतो आहे. तिथं जाऊन आपल्याला उपचार व्यवस्थित मिळतील ? याची त्याला खात्री राहिली नाही.

त्यामुळे अनेक खासगी डॉक्टरच्या पेशातले कसाब त्यांना लुटताना दिसत आहेत. सरकारी पगार घेवून स्वत:चे खासगी दवाखाने थाटत पैसे छापणारे डॉक्टर ढिगाने आहेत. ते सरकारी दवाखान्यात कमी आणि स्वत:च्या खासगी रूग्णालयात जास्त असतात. अशा डॉक्टरांच्यावर प्रशासन काहीच कारवाई करत नाही. मंत्र्यांची, भ्रष्ट अधिका-यांची व या सर्व दलालांची साखळी असून ते पध्दतशीरपणे सरकारला लुटत आहेत. कोल्हापुरच्या छत्रपती प्रमिला राजे रूग्णालयात हेच घडले आहे. कोणताही परवाना नसलेल्या एका बोगस कंपनीने सर्जिकल साहित्याचे टेंडर भरले आणि भ्रष्टाचाराचे शेण खायला सोकावलेल्या अधिका-यांनी ते कसलीही खातरजमा न करता मंजूर केले. दोन वेगवेगळ्या कंपनीच्या नावे खरेदी असताना आठ कोटीचे बिल एकाच कंपनीच्या नावे अधिकारी काढूनही मोकळे झाले. सी पी आर च्या घोटाळ्यातले शेण नेमके कुणी कुणी खाल्ले आहे ? ‘न्युटन’ च्या नव्या अवताराने ते कुणा-कुणाला चारले आहे ? याचा उलगडा होण्याची गरज आहे. या सगळ्या घोटाळेबाजांच्यावर कठोर कारवाई होण्याची गरज आहे.

कोल्हापुरचे माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे. त्यांनी माहिती अधिकारात सगळी माहिती मागवत या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. ते गेल्या दिड दोन महिन्यापासून या घोटाळेबाजांच्यावर कारवाई होण्यासाठी धडपडत आहेत. पण अद्याप कारवाई झालेली नाही. घोटाळा उघडकीस आल्यावर आणि माध्यमात बातम्या आल्यावर चौकशीचे ढोंग रचले जात आहे. समित्या नेमूण वेळ काढला जात आहे. बोगस कंपनीवर अद्यापही साधा गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. न्युटन नावाची कंपनी बोगस असल्याचे सप्रमाण सिध्द होवूनही त्याची काहीच वाकडी केली गेली नाहीत.

सी पी आर मध्ये घोटाळा करणारी बोगस कंपनी हसन मुश्रीफांच्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जावयाची आहे की काय ? असाही प्रश्न या निमित्ताने पडतो. घोटाळेबाज बोगस कंपनीवर आणि तिच्या मालकावर इतकी मेहरबानी का व कशासाठी ? प्रशासन घोटाळेबाजांना का पाठीशी घालत आहे ? विशेष म्हणजे राज्याचे वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफच आहेत. ते ही कोल्हापुरचेच आहेत. त्यांच्याच बुडाखाली ही बचबच आहे. तरीही हसन मुश्रीफ या कंपनीबाबत, तिच्या मालकाबाबत व भ्रष्ट अधिका-याबाबत इतके शरीफ का वागत आहेत ? ते कठोर कारवाईचे आदेश का देत नाहीत ? या घोटाळ्यात जे जे सहभागी आहेत त्यांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न का करत नाहीत ? त्यांची या घोटाळेबाजांच्यावर मेहरबानी का ? ‘न्युटन एंटरप्राईज’ ही कंपनी आणि तिच्या मालकाचे मुश्रीफांशी लागेबांधे आहेत की काय ? त्यांचाच वरदहस्त या घोटाळ्याला आहे की काय ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय रहात नाहीत.

विशेष म्हणजे कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री बंटी पाटील व त्यांचा पुतण्या ऋतुराज पाटील यावर काहीच बोलत नाहीत. “तेरी भी चुप और मेरी भी चुप” अशी त्यांची स्थिती आहे. बंटी पाटलांचे मौन का ? हा प्रश्नही सतावणारा आहे. खरेतर हसन मुश्रीफांनाच इडीच्या नोटीसा आल्याने त्यांनी कमळीला मिठी मारली आहे. कमळीच्या बाहूपाशात जावून आपली कातडी वाचविण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला आहे. अशा अवस्थेत ते सी पी आर मधल्या घोटाळेबाजांच्यावर कारवाई करतील याची शक्यता वाटत नाही. सदर कंपनीचा मालक त्यांच्याच छत्रछायेखाली असल्याची कोल्हापुरात जोरदार चर्चा आहे. असे असेल तर त्याचं काहीच वाकड होणार नाही.

सत्तेतले सरकार भ्रष्टाचा-यांना आपल्या सोबत घेत मोदी डिटर्जंट पावडरने स्वच्छ करताना दिसते आहे. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा । अशा घोषणा करणारे उघडे-नागडे झाले आहेत. त्यांचा भ्रष्टाचार विरोधाचा दांभिक चेहरा अवघा देश पाहतो आहे. अशा भामट्यांच्याकडून कशाची अपेक्षा करायची ? एक दारूची बाटली, मटनाची काळी पिशवी आणि पाचशेला आपलं मत विकणा-या जमातीच्या वाट्याला घोटाळेबाज ‘न्युटन’ आणि लबाड सरकारच येणार.