नेरी येथे पोलीस भरती प्रशिक्षण शिबीर संपन्न… राहुलकुमार सोनवणे मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम… यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो – लक्ष्मणराव पाटील

180

 

जामनेर — तालुक्यातील नेरी बुद्रुक येथे पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मंगल कार्यालयात पोलीस भरती पूर्व परीक्षा सराव पेपर, मार्गदर्शन, बक्षीस वितरण आणि भोजन या स्वरूपात पोलीस भरती प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व विद्यार्थांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. प्रथम सत्रात पोलीस भरती पूर्व परीक्षा सराव पेपर १०० गुणांचा घेण्यात आला यामध्ये १४४ विद्यार्थांनी पेपर दिला. द्वितीय सत्रात परीक्षेचे नियोजन कसे करावे? यासंदर्भात सक्सेस करिअर मार्गदर्शक प्रबोधिनी जळगावचे सहसंचालक लक्ष्मणराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये अभ्यासाचे विषयवार नियोजन, पेपरांचा सराव, कठीण परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न यांचे महत्व पटवून दिले. तसेच यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो कारण सातत्याने होणारे सर्वंकष प्रयत्न यशाचा राजमार्ग खुला करतात असे प्रतिपादन लक्ष्मणराव पाटील यांनी केले. मार्गदर्शन कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थांनी दिलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला व यशस्वी विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. नेरी बुद्रुक माजी विद्यार्थी ग्रुप जि.प.शाळा आणि राहुल रॉय मुळे फत्तेपुर यांच्याकडून तसेच आबासाहेब पाटील कुंभारी यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थांना रोख सुरूपात बक्षीस देण्यात आले. परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थाला १०० पैकी ८१, द्वितीय ७८ व तृतीय ७६ या पद्धतीने गुण मिळाले. शिबिराला मुलांसोबत मुलींचीही लक्षणीय उपस्थिती होती. सर्व विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी कार्यक्रम संपल्यावर खिचडीचा आस्वाद घेतला.
पोलीस भरती प्रशिक्षण शिबिरासाठी मुलांकडून १० रुपये नाममात्र प्रवेश शुल्क व मुलींना मोफत ही बहुमोल संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक राहुलकुमार सोनवणे व त्यांच्या मित्र परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. या शिबिराला जामनेर तालुक्यातील तसेच इतर तालुक्यातील आलेल्या ग्रामीण भागातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यशस्वी विद्यार्थांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, पुढचा सत्कार वर्दीवर असतांना स्विकार करू; हे बोलतांना मुलं भावनिक झाली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुलरॉय मुळे, चेतन निंबाळे, पवन वाघ, शाम बोरसे यांच्यासह चेतनकुमार सोनवणे मित्र परिवार आणि जि.प.नेरी बु.माजी विद्यार्थी ग्रुप यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राहुलकुमार सोनवणे यांनी केले.