संजय पाटील निष्ठावंत माणसं विकत मिळत नसतात !

339

 

*दत्तकुमार खंडागळे* संपादक वज्रधारी, 9561551006

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या लाटेत राजकीय नाव किना-याला लागलेले संजय पाटील सध्या भ्रमात असल्यासारखे वाटत आहेत. सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर माणसं विकत मिळतात असा त्यांचा भ्रम झाला आहे की काय ? असा प्रश्न पडतो आहे. निष्ठावंत माणस पैशाच्या जोरावर किंवा सत्तेच्या बळावर विकत मिळत नसतात, ती स्वकर्तृत्वावर, गुणवत्तेवर आणि प्रामाणिकपणावर कमवावी लागतात. सत्तेच्या व पैशाच्या बळावर जे मागे पुढे करतात, थुंकी झेलायला येतात ते हुजरे, लाचार, मतलबी, संधीसाधू व स्वार्थी असतात. अशीच माणसं मिळतात पैशाच्या जोरावर. अशा लोकांच्या गर्दीत राहून सगळेच तसे असतात असा संजय पाटलांचा समज झाला आहे की काय ? पैशाचे तुकडे टाकल्यावर विकत मिळणारी माणसं आणि प्रामाणिक निष्ठावंत माणसं यातला फरक खासदार महाशयांना कळायला हवा. सत्तेच्या व संपत्तीच्या प्रभावाने त्यांची नजर आणि विवेक बोथट झालेला नाही ना ? असा प्रश्न पडतो आहे.

आपण बदललो, आपल्या भूमिका बदलल्या म्हणजे अवतीभोवतीचे जग बदलले असे होत नाही. जगाकडे बघताना निखळ बघायला हवं. आपल्या डोळ्यांच्या बुबूळावर साचलेली घाण काढून पहायला हवं तरच स्पष्ट दिसेल. गालीबचा एक शेर आहे, “उम्रभर गालिब ये भुल करता रहा, धुल ती चेहरे पर और आयना साफ करता रहा ।” असं व्हायला नको. खासदार साहेब तुम्ही एक टर्म आमदार राहिलात, दोन टर्म खासदार राहिलात. कदाचित सत्तेच्या स्पर्शाने तुम्हाला सगळं जग तसेच भासत असेल. संधीसाधूंच्या, स्वार्थी व मतलबी लोकांच्या गर्दीत राहून जग असेच असतं याचीही खात्री झाली असेल पण खासदार साहेब सगळं जग सारखं नसतं. या जगात अजूनही आपल्या तत्वांवर प्रेम करणारी, निखळ व निस्वार्थ प्रेम करणारी, जीवाला जीव देणारी, स्वार्थाच्या पलिकडे जाऊन प्रेम करणारी असंख्य निष्ठावंत माणसं आहेत. खासदार साहेब तुमच्या राजकीय जीवनाचा पाया अशाच लोकांच्या बळावर उभारला गेला. त्या लोकांनी तुमच्यावर निखळ प्रेम केले, तुमच्यासाठी जीवाचे रान केले. त्यांनीही वैर पत्करले. कुणी केसेस, कुणी हल्ले पेलले. काही लोकांनी तर स्वत:ची धुळधाण करून घेतली. कशा-कशाचा विचार केला नाही. त्या लोकांनी तुमच्यात एक इमानदार, धडाकेबाज, लढाऊ नेता पाहिला. तत्व जपणारा, तत्वांची, परमार्थाची भाषा बोलणारा बेडर नेता पाहिला. सत्तेला भिडणारा, आवाज उठवणारा एक संघर्षशील योध्दा पाहिला. त्यासाठी विरोधकांचे वैर, पोलिस केसेस अंगावर घेतल्या. अनेक प्रसंगी डोकी फोडून घेतली. पण तुम्ही नंतरच्या काळात या सगळ्या कार्यकर्त्यांना तिथेच सोडून आर आर पाटलांना मिठी मारते झालात. असंख्य लोकांनी डोकी फोडून घेतली, स्वत:चे रक्त सांडले. त्याचे बक्षिस म्हणून तुम्हाला आमदारकी मिळाली. कॉंग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारांची भाषा बोलणारे, खुर्चीच्या मागे भलामोठा सोनिया गांधींचा फोटो लावणारे तुम्ही आमदारकीसाठी राष्ट्रवादीमय झालात. त्यानंतर २०१४ ला धर्मनिरेपक्ष विचारांच्या पताका बासनात गुंडाळत तुम्ही कट्टर भाजपवासी झालात. भाजपात जाताना तुम्हाला भाजपाचे हिंदूत्व किंवा मोदींच्या भाषणातील विकासाची तहान लागलेली नव्हती तर खासदाकीची तहान होती. त्यासाठी कमळदलात विसावला आणि मोदींच्या लाटेत तुमचे घोडे गंगेत न्हाऊन निघाले. बघता बघता दुस-यांदा खासदारकी तुमच्या पदरात पडली. या दहा वर्षात तुम्ही जिल्ह्याचा किती विकास केलात आणि स्वत:चा किती केलात ? हे कधीतर तपासा. तुम्हाला साधू-संतांचा व अध्यात्माचा नाद आहे. तुम्ही सतत साधू-संतांच्या पायाशी जाता. तिथे गेलात तर स्वत:ला काही प्रश्न जरूर विचारा. राजकारणात येताना तुम्ही जे जे बोलत होता ते ते सत्ता मिळाल्यावर केले का ? ती तत्व, ते ध्येय, ते विचार, त्या संघर्षाच्या काळातली ती माणसं जोपासलीत का ?याचं जरूर याचं आत्मचिंतन करा. मला हरिभाऊ खुजट यांचे ते शब्द आजही आठवतात. त्यांच्या वयोवृध्द चेह-यावरचा तो भाव, आत्मविश्वास आजही जशाचा तसा डोळ्यासमोर दिसतो. तुमच्याबद्दल बोलताना ते भरभरून बोलायचे. “या पो-याच्या पाठीशी उभे रहा, हा प्रामाणिक पो-या आहे, लढाऊ आहे. याला ताकद द्या, याला बळ द्या ! असं तुमच्या हाताला धरून अवघ्या जिल्ह्यात सांगणारे हरिभाऊ खुजट आज हयात नाहीत. ते आज असायला हवे होते, किमान त्यांनी तरी तुमचा कान पकडून बदलेल्या संजय पाटलांची कहाणी तुम्हाला सांगितली असती. त्यांचा तो पो-या प्रस्थापित, भांडवलदार राजकारणी व शेतक-यांना रडकुंडी आणणारा साखरसम्राट झाल्याचे पाहून त्यांना नक्कीच दु:ख झाले असते. कदाचित आपण चुकलो की काय ? असं वाटून त्यांच्या डोळ्यात आसवंही आली असती. तुम्ही जर खरोखरच आत्मचिंतन केेलेत तर तुम्हाला तो हरिभाऊंचा डोळ्यात पाणी आलेला चेहरा नक्की दिसेल. त्यांची आपण फसवणूक केली याचे भान तुम्हाला येईल.

तुम्ही १९९९ ला पहिल्यांदा विधानसभेला लढलात. अगदी थोडक्या मतांनी पडलात. त्या दिवशी माझ्या घरासह शेकडो कार्यकर्त्यांच्या घरी सुतकाचे वातावरण होते. शेकडो कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होते. त्यावेळी तुमच्यासाठी आसवं गाळणारे किती लोक आज तुमच्यासोबत आहेत ? ते तुम्हीच तपासा. पण आजच्या संजय पाटलांना ते लोक सोबत असले काय, नसले काय ? फारसा फरक पडणार नाही. कुणी दुखावलाच असेल तर त्याच्या खात्यावर पाच हजार रूपये पाठवले की तो खुष होईल, तळवे चाटायला दारावर येईल असेही वाटेल. कारण माणसं विकत घेता येतात या व्यवहारी हिशोबात तुम्ही सध्या व्यस्त आहात. परमार्थाची भाषा बोलणे आणि परमार्थ करणे यात खुप तफावत आहे. संत तुकारामांनी घरची सावकारकी बुडवून परमार्थ केला. लोकांचे येणे असलेल्या हिशोबाच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या. (देणे असलेल्या नव्हे) अध्यात्म ही जगायची गोष्ट आहे. साधू-सतांच्या सहवासात जाऊन त्यांच्यातलं काही घेता यायला हवं. केवळ तोंडात पमार्थाची भाषा ठेवून परमार्थ होत नाही. कोरोना काळात लोकांचे हालहाल सुरू होते. हजारो लोकांच्या तीन तीन दिवस चुली पेटल्या नाहीत. उपासमारीने मरायची वेळ त्यांच्यावर आली होती. परमार्थाची भाषा सतत बोलणारे तुम्ही त्या काळात किती लोकांना मदत करायला पुढे आलात ? बंद पडलेल्या चुली पेटत्या करण्यासाठी तुम्ही काय केले ? हा प्रश्न शांतपणे स्वत:लाच विचारा. त्या काळात लोकांना मदत करणे दुरच उलट जोर-बैठका मारल्याचे आणि खुराक खाल्ल्याचे व्हीडीओ काढून व्हायरल करवले गेले. इतक्या बिकट काळात मदतीचा हात देणे गरजेचे असताना जोर-बैठकांचे व्हीडीओ व्हायरल करणे म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीतल्या राणीने “भाकरी मिळत नाही तर ब्रेड खा !” असे उद्दामपणे म्हंटल्यासारखे आहे. हा प्रकार तुमच्याकडून झाला. साधू-संतांच्या पायाशी जाणारा माणूस असे करतो हे विशेष. पण याच तुम्हाला काही वाटेल, आपलं काहीतरी चुकतय असे वाटेल असं नाही वाटत. कारण १९९८-९९ चे संजय पाटील आज उरलेले नाहीत. आज तुम्ही प्रस्थापित भांडवलदार राजकारणी झालेले आहात. त्यामुळे तुम्ही देवघेवीचेच व्यवहार करणार. तुमच्या लेखी सगळे विकाऊच आहेत. जमीनीचे व्यवहार करता करता माणसंही विकत मिळतात असा समज झाल्यावर तुम्ही तर काय करणार ?

सध्या तुम्हाला तिस-यांदा खासदार आणि मंत्री व्हायची स्वप्ने पडत आहेत. कार्यकर्त्यांना असच सांगून कामाला लावत आहात पण खरं सांगा या कार्यकर्त्यांना चिरमुरे आणि फुटाण्याशिवाय तुम्ही दिलं काय ? किती रोजगार उभा केलात ? किती तरूण त्यांच्या पायावर उभे केलेत ? तुम्ही स्वत: प्रगतीच्या शिड्या सरसर चढत गेलात पण तुमचा कार्यकर्ता आहे तिथेच आहे. त्याची काय प्रगती साधली ? आर आर पाटील असते तर तुमच्या राजकीय संघर्षासाठी अजून आठ-दहा केसेस त्याच्या वाट्याला आल्या असत्या. आज या सगळ्या धावपळीत तुमच्यासोबत निष्ठावंत कार्यकर्ते किती आहेत ? त्यांची तुमच्याबाबत काय भूमिका आहे ? ते कधीतर जाणून घ्या. सत्तेच्या व संपत्तीच्या झगमगाटातून सवड मिळाली तर या सगळ्या निष्ठावंतांना भेटा, त्यांची भूमिका जाणून घ्या. त्यांच्या खात्यावर पाच हजार गुगल पे केले की यायला ते भाड्याचे बैल नाहीत हे लक्षात ठेवा. तुमचा असाच समज असेल तर हे निष्ठावंत कार्यकर्ते तुम्हाला जाग्यावर आणूही शकतील. तुम्हाला पैसा देव, जनार्दन वाटतो आहे पण तसे नाही. लोकशाहीच्या राज्यात जनताच जनार्दन आहे. दुखावलेली जनता भल्याभल्यांचा कार्यक्रम करते साहेब. डोक्यावर घेणा-या त्याच जनतेने इंदिरा गांधीचाही सुफडासाफ केला होता हे विसरू नका. या सगळ्या धकाधकीत कधीतर मागे फिरून सिंहावलोकन करा. सकाळी घरातून बाहेर पडलात की लोक तुमच्या मागे मागे पळत असतात आणि तुम्ही मंदिरातल्या देवाना नमस्कार करण्यासाठी पुढे पुढे पळत असता. आता तीच जनता पुढे पुढे पळत आहे तुम्हाला मागे मागे पळायची वेळ आली आहे. अध्यात्म म्हणजे आधी आत्म, म्हणजे आधी आपल्या आत डोकावून पाहणे, आपला आतला प्रवास करणे. तुमचा आतला प्रवास आणि बाहेरचा प्रवास कधी तर तपासून पहा. शेवटी सत्ता, सपंत्ती, पद, पैसा, प्रतिष्ठा हे क्षणभंगूर आहे. यातलं काही बरोबर येत नाही. बरोबर उरते ती आपल्या ब-या-वाईट कर्माची पुंजी. पुण्याई केवळ साधूंच्या सहवासात जाऊन नाही मिळत. ती आपल्या चांगल्या कर्मानीच कमवावी लागते. तसे असते तर चंदनाच्या झाडाला विळखा घालून बसलेला सापसुध्दा सुंगंधाने दरवळला असता. असो बाकी तुम्ही जाणते आहात. शक्य झाल तर आत्मपरिक्षण करा नसेल तर मग फोन लावून “मेल्या आईच दुध पिलो नाही ! म्हणत चार शिव्या दिल्यात तरी हरकत नाही.