विश्वजीत कदम पतंगराव कदमांचे पुत्र शोभलात !

148

 

*दत्तकुमार खंडागळे* संपादक वज्रधारी, मो.9561551006

परवा सांगलीत झालेला कॉग्रेसचा मेळावा विश्वजीत कदम यांनी गाजवला. त्यांच्या भाषणाची चर्चा जिल्हाभर आहे. त्यांचे सदर मेळाव्यातले उग्र व आक्रमक रूप जिल्ह्याने पहिल्यांदाच अनुभवले. परवा ते जे बोलले व ज्या पध्दतीने बोलले ते पाहता सांगलीतल्या कॉंग्रेसला एक आश्वासक चेहरा मिळाल्याची खात्री वाटते आहे. ते ज्या पध्दतीने व्यक्त झाले, गेल्या काही दिवसात ज्या पध्दतीने त्यांनी राजकारण केले ते पाहता विश्वजीत कदम पतंगराव कदमांचे पुत्र शोभले. पतंगराव कदम कॉंग्रेसचे मोठे नेते. शुन्यातून विश्व निर्माण केलेला सरळमार्गी व बंडखोर नेता. त्यांनी जे काम उभा केलय ते अख्यायिका वाटावं असं आहे. कॉंग्रेस पक्षाला त्यांची गरज असताना त्यांचे निधन झाले. हा कॉंग्रेससाठी मोठा धक्का होता. त्यांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातली कॉंग्रेस गर्भगळीत झाली होती. वसंतराव दादा पाटलांचा हा जिल्हा कॉंग्रेसचा हुकमी एक्का होता. दादांनी जिल्हाभर कॉंग्रेस रूजवली. आणिबाणीत इंदिरा गांधी पराभूत झाल्या पण सांगलीत कॉंग्रेसचा बुरूज भक्कम होता. जिल्हाभर कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत. कॉंग्रेसचा विचार माणणारे लोक आहेत पण गेल्या काही वर्षात त्यांना खमक्या नेता नव्हता. सगळे कार्यकर्ते विस्कटलेले, विखुरलेले होते. अवसान गळालेले होते. पतंगराव कदम असते तर कॉंग्रेसची ही अवस्था झाली नसती. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर विष्णू अण्णा पाटील, मदन पाटील, आर आर पाटील ही मंडळी राष्ट्रवादीत गेली. जिल्ह्यातले बहूतेक मात्तबर नेते राष्ट्रवादीत गेले पण तरीही कॉंग्रेसची ताकद कधीच कमी झाली नाही. सातत्याने जिल्ह्याने कॉंग्रेसचे किमान दोन-तीन आमदार तरी निवडूण दिले. मोदींच्या झंजावातातही इथली कॉंग्रेस विझली नाही. लोकसभेला सांगली पडली. पण विरोधकांच्या शक्तीपेक्षा आप-आपसातील कुरघोड्या, हेवेदावे, गटतट यातच कॉंग्रेस पडली. कॉंग्रेसचा पराभव भाजपने केला नाही तर कॉंग्रेसनेच केला. कॉंग्रेस सोबत मित्रपक्ष म्हणून असणारा राष्ट्रवादी पक्ष व त्याचे नेेते नेहमीच कॉंग्रेससोबत घातपाताचे राजकारण करत आले. पण पतंगराव कदम होते तोवर ते, “ये जयंत तुला काय कळतं तु गप्प बस !” असे म्हणत ते सर्वांना गप्प बसवत होते. कुणाचा टाप चालू देत नव्हते. त्यांच्यानंतर मात्र कॉंग्रेस दिशाहिन वाटत होती. गर्भगळीत वाटत होती. पण या दिशाहिन गर्भगळीत झालेल्या कॉंग्रेसच्या शिडाला विश्वजीत कदम सुरक्षित किना-यावर नेतील, जिल्ह्यात परत एकदा कॉंग्रेसचे स्थान भक्कम करतील अशी आशा वाटू लागली आहे.

कॉंग्रेसमध्ये दादा गट आणि कदम गट असे दोन गट होेते. या दोन गटात मोठा वाद होता. या वादातही कॉंग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. विश्वजीत कदमांनी या वादाला मुठमाती देत विशाल पाटलांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला. विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आणि सगळे वातावरणच बदलून टाकले. विश्वजीत कदमांचे हे बदलते रूपडे जिल्ह्याला एक नवा नेता देणारा आहे. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील ही जोडगोळी जर भक्कमपणे एकत्र राहिली, जिल्ह्यात सक्रीय राहिली तर जिल्ह्याचे चित्र बदलू शकते. या दोघानी तळा-गाळातल्या कॉंग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला भेटून त्याच्या पाठीवर थाप टाकली तर पुन्हा एकदा हा सांगली जिल्हा कॉंग्रेसच्या झेंड्याखाली भक्कपणे उभा राहिलेला दिसेल. तेवढी क्षमता विश्वजीत कदमांच्या नेतृत्वात नक्कीच आहे. फक्त त्यांनीच स्वत:च्या कक्षा रूंदावण्याची गरज आहे. कृष्णेला पुर आल्याच्या काळात त्यांनी ज्या तडफेने मदतीचे काम केले ते जबरदस्त होते. त्यांची त्यावेळची ती धडपड पतंगराव कदमांचा वारसा सिध्द करणारी होती. परवा त्यांनी, “आपल्यात पतंगराव कदमांचे गुण आहेतच पण विश्वजीत कदम म्हणून माझेही काही गुण आहेत. तेव्हा कुरघोड्या करणारांना सोडणार नाही. भविष्यात त्यांना नक्की धडा शिकवू ! असे खुले आव्हान दिले आहे. विश्वजीत कदमाचा हा आक्रमक पवित्रा नककीच कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याना उर्जा देणारा, ताकद देणारा, दिलासा व लढायला बळ देणारा आहे. गेले चार दिवस जिल्हाभर विश्वजीत कदम यांच्या या बदलत्या रूपड्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे.

भाजपाने विश्वजीत कदम यांच्याभोवती सापळा लावला आहे. हा सापळा देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आहे. तेव्हा ,”दादा माझ्या रक्तात कॉंग्रेस आहे !” असे सांगत कॉंग्रेस पक्षावरील निष्ठा त्यांनी दाखवून दिली होती. त्याचवेळी कॉंग्रेसच्या फांदीवर सत्तेची पिकलेली फळं खाणारे सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे भाजपात गेले. पण विश्वजीत कदम गेले नाहीत. फडणवीसांनी त्यांना भाजप प्रवेशाची ऑफर केली आहेच. त्यासाठी केंद्रीय संस्थांचा वापरही केला जात आहे. त्यांच्यावर दडपण ठेवले आहे. पण अजून तरी विश्वजीत कदम त्या दबावाला बळी पडलेले नाहीत. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अधूनमधून होते पण परवा कॉंग्रेसच्या मेळाव्यात त्यांनी या चर्चा निरर्थक असल्याचे दाखवून देत कॉंग्रेस पक्षावरील निष्ठा अभंग असल्याचे व भविष्यात जिल्ह्यात कॉंग्रेसचे काम ताकदीने करणार असल्याचे सांगितले. परवा त्यांनी घेतलेला पवित्रा बघून ते कॉंग्रेस सोडतील असे वाटत नाही. विश्वजीत कदमांनी कॉंग्रेस नाही सोडली तर सांगली जिल्ह्याला नेता मिळेलच पण कॉंग्रेसमध्ये त्यांना भविष्य आहे. भविष्यात त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधीही मिळू शकते. भाजपात गेले तर त्यांना वापरून घेतील आणि बाद करतील. भाजपाने आजवर भले भले मातीत घातले आहेत. इकडे वाघ म्हणून वावरणारे अजित पवार भाजप सोबत गेले तरी शेळपटले आहेत. मग विश्वजीत कदमांचे काय होणार ? सध्या विश्वजीत कदम ज्या पध्दतीने राजकारण करत आहेत ते पाहता त्यांच्याकडून भाजप प्रवेशाची शक्यता वाटत नाही. सध्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या तिकीटावरून जे रामायण झाले ते कॉंग्रेस पक्षाची, नेत्यांची व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची कोंडी करणारे होते. कॉंग्रेसची कोंडी करणा-या जयंत पाटलांना विश्वजीत कदमांनी नाव न घेता थेट अंगावर घेतले आहे. त्याना थेट खुन्नस देत भविष्यात याचा वचपा काढणार असल्याचे खुले आव्हान त्यांनी दिले आहे. विश्वजीत कदमांची ही हिम्मत कॉंग्रेसचा हात आणि त्यांचे स्वत:चे नेतृत्व बलदंड करणारी आहे. फक्त विश्वजीत कदमांनी हा धडाका कायम ठेवावा. चार्ज झालेला कॉंग्रेस पक्ष व कार्यकर्ता असाच भक्कमपणे उभा करावा. गेल्या काही वर्षात जिल्ह्याला नेता नाही. येणा-या काळात विश्वजीत कदम सांगली जिल्ह्याचे नेते म्हणून ताकदीने पुढे येवू शकतात. तशी संधी त्यांच्या समोर हात जोडून नक्कीच उभी आहे.