शिक्षकांवरचा अविश्वास का वाढतो आहे?

29

खरं तर सकाळी सकाळी हा विषय घेऊन लिहायचं खुप कठीण आणि वेदनादायी आहे. सर्वात प्रथम प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांची माफी मागतो.कारण मी पण एक शिक्षकच आहे. पण मी शिक्षक असलो म्हणून शिक्षकी पेशात जे अवगुण वाढत आहेत किंवा शिक्षकी पेशाची इभ्रत वेशीवर टांगण्याचे प्रकार जर शिक्षकांकडूनच होत असतील तर मला ते दुर्लक्ष करण्यासारखे वाटले नाही म्हणून हा प्रपंच. मान्य आहे की असे शिक्षक अपवादात्मक किंवा बोटावर मोजण्या इतके असतील. पण त्या बोटावर मोजण्या इतपत असणाऱ्यांनीच आपल्या ठळक कार्यानी प्रामाणिक शिक्षकांच्या मेहनतीवर पाणी फिरवण्याचे काम चालू केले आहे. जे शिक्षक शाळा,मुले या साठी सतत झटत असतात, नवीन काहीतरी शिकून मूलांच्या पुढ्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात .अशा शिक्षकांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे. त्याच्या कामाची प्रशंसा झाली पाहिजे जेणेकरून त्याला प्रेरणा मिळून तो आणखी चांगले काम करण्याचा प्रयत्न करेल.

पण माझा आजचा विषय अपवादात्मक शिक्षकांचा आहे. त्यांच्यामुळे इतर शिक्षकांना समाजाच्या अविश्वासाला सामोरे जावे लागत आहे. काही मुद्दे आहेत ते आपल्या निदर्शनास आणू इच्छितो.

चारित्र्य:-

आपण मुलांना नैतिकतेच्या गोष्टी सांगतो, धडे देतो. पण काही वेळेस एखाद्या शिक्षकाच्या हातूनच घ्रणास्पद,वांछनिय,लज्जास्पद घटना घडते. (मी असे शिक्षक पाहिलेत.काही निलंबित आहेत. काही तुरुंगात आहेत.)त्यावेळेस फक्त त्या शिक्षकावर शिंतोडे उडवले जात नाहीत तर संपूर्ण शिक्षकांना संशयास्पद नजरेने पाहिले जाते. त्यामुळे आपण काय काम करत आहोत याची स्वतःला जाणीव असली पाहिजे.

राजकारण:-

काही शिक्षक हे शिकवण्याचे काम सोडून राजकारणात सतत कार्यरत असतात. शिक्षकांनी राजकारण करणे त्याविषयी मत व्यक्त करणे हे मान्य करु शकतो पण आपला पेशा बाजूला सोडून राजकारणात नको तेवढे स्वतःला गुंतवून घेणे म्हणजे त्या पेशाशी आपल्या हाताखाली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी विश्वासघातच आहे. तुमचे काम ज्ञानदानाचे आहे. ते पहिले करुन मग राहिल्या वेळेत तुम्ही बाकीचे छंद जोपासण्यास कोणासही हरकत नसावी.

व्यवसाय, उद्योग:-

काही शिक्षकांचे तर नोकरी सोडून इतर व्यवसाय,उद्योग आहेत. त्यामध्ये एवढे गुंतलेत की त्यांना स्वतःला आपण शिक्षक आहोत याचा विसर पडलेला आहे. कोणी एल.आय.सी एजंट,कोणी दुकानदार, कोणी हॉटेलमध्ये व्यावसायिक, कोणी इतर कोणत्या व्यवसायात गुंतलेले आढळतात. मग ही कामे करतांना आपली नोकरी, आपले काम,आपले विद्यार्थी ही दुय्यम बाजू होऊन बसते.कामाला, व्यवसायाला प्राधान्य देऊन बसतो. मग आपसुकच विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्याचे आपणास काहीही वाटत नाही.

पुढारी, नेते.कमिशनखोर:-

काही शिक्षक हे स्वतःला पुढारी नेते समजू लागले आहेत. चार दोन अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या वरदहस्ताने शिक्षकांची ऑफिसची कामे करायची त्यातही कमीशन खायचे आणि स्वतःला पुढारी म्हणून मिरवायचे.सतत ऑफिसमध्ये पडिक रहायचे.असे शिक्षक आज आपल्या मुलांना किती वेळ देत असतील हे शंकास्पदच आहे.

व्यसनी…चंगळवादी:-

आज बरेच शिक्षक हे व्यसनी आहेत. नको नको ती व्यसने ही शिक्षक करत आहेत. खरंतर त्यांनी करायला नको, पण ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ही व्यसने करताना वेळ,काळ याची मर्यादा, काही साधनशुचिता प्रत्येकाने जोपासली पाहिजे. काही शिक्षक असेही पाहिले आहेत दारू पिणे, पिऊन शाळेत जाणे,तंबाखू, गुटखा मुलांसमोर खाणे, मुलांना आणायला पाठवणे .काही महाभागांचे शाळेत पत्ते खेळणे हे पाहून मुलं काय आदर्श घेणार?आणि काय आपण पुढच्या पिढीला देणार?अहो काही महाभाग तर असे आहेत शाळेत पिऊन कडले असता गावकऱ्यांनी तक्रार केल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना येऊन त्यांना उठवावे लागले आहे. हे मी पाहिले आहे. मग हा समाज आपल्याकडे आश्वासक नजरेने पाहिल का?
म्हणून सगळीकडे आपण ऐकतो की शिक्षकांना पहिल्या सारखा मान राहिला नाही पण त्याला जसा समाज,बदलणारी संस्कृती जबाबदार आहे तसा आपला बेजबाबदार शिक्षक पण तेवढाच जबाबदार आहे. याचे प्रमाण अल्प प्रमाणात आहे. पण आपली जबाबदारी आहे की या प्रवृत्तीला प्रबळ होऊ देता कामा नये.शिक्षकांनी शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त आपल जीवन मनसोक्त आपल्या मनाप्रमाणे जगावे पण शाळेचा वेळ शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठीच द्यावा एवढीच अपेक्षा.
“शिक्षकांचं दैवत विद्यार्थी आहे आणि तेच रहावं आणि शिक्षकांनी त्यांच्याशीच आपली बांधीलकी जपावी” एवढीच माफक अपेक्षा.

                                  ✒️लेखक:-सतिश सोपान यानभुरे
                                                             शिक्षक
                                                            खेड,पुणे                                                                 मो:-८६०५४५२२७२

▪️ संकलन:-अंगद दराडे(बीड, जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

31-8-2020