त्यागमूर्ती रमाई आंबेडकर!!

60

जिव्हाळ्याच कारुण्य, ममतेचा पाझर.. त्याग मूर्ती रमाई आंबेडकर यांना जयंती निमित्य त्रिवार आभिवादन!!
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वनंद गावी भिकू धुत्रे व रखुमाईच्या पोटी एका मुलीचा जन्म झाला ती मुलगी म्हणजेच भागीरथा ,रामीबाई, रमाई…. रामीबाई चे वडील भिकू धूत्रे दाभोळ बंदरावर मासोळ्या ची टोपली वाहण्याचा कष्टाचे काम करून मिळणाऱ्या पैशावर कुटुंब चालवीत असे. आई रखुमाई अगदी साधी राहणी. एकट्या पतीच्या जीवावर संसार कसा चालणार म्हणून रानात शेण गोळा करणं आणि गौर्या थापून वाळल्यावर विकून संसाराला हात भार लावीत होती. रामीबाई ला गौरी व शंकर नावाची दोन भावंडे होती. आई कामावर गेली असता भावंडांचा सांभाळ करणे, घरातील इतर काम करणं इत्यादी काम रामीबाई करत असे .आईने केलेल्या संस्काराची शिदोरी रामीबाई कडे होती.

‌ एके दिवशी शेजारच्या बाईने दुकानातून सामान आणायचे सांगितले . रामीबाई दुकानातून सामान आणून दिले . म्हणून शेजारच्या बाईने रामीबाई ला एक पैसा दिला तो पैसा आईला दाखवला आई खूप रागावली आणि पैसे परत करण्यास सांगितले . रामी बाईने पैसे परत केले . आपण गरीब असले म्हणून काय झाले आपला स्वाभिमान कधीच गहाण ठेवायचा नसतो . असे संस्कार रामीबाई वर झाले होते.एकेदिवशी आजारपणात रामीबाई च्या आईचा मृत्यू झाला. रामीबाई व दोन भावंडांना सोडून आई गेली . पुढे काही काळाने भिकू धूत्रे चा मृत्यू झाला .लहान दोन भावंड रामीबाई पोरकी झाली होती .मुलाच्या पंखात बळ भरण्याआधी आई-वडील रामीबाई ला सोडून गेले होते. पुढे रामीबाई व तिच्या दोन भावंडांना रामीबाई चे मामा मुंबईला घेऊन गेले. आई वडिलांच्या मृत्यूमुळे खूप लहानपणी रामीबाई वर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

सुभेदार रामजी आंबेडकर भीमराव साठी मुलगी बघत होते. भीम रावांसाठी रामीबाईची निवड केली. आई वडील लहानपणी सोडून गेल्यामुळे रामीबाई मामाकडे राहत होती. मुलगी शिकलेली नाही. परंतु हीच मुलगी आपल्या भिमरावा साठी योग्य आहे. रामजी आंबेडकर यांनी विचार केला. लग्न वेळी रामीबाई च वय नऊ वर्ष भीमरावांचे वय 14 वर्ष होतं. लग्नानंतर रामी बाई रमाबाई झाल्या. रमाबाई चा विवाह भीमराव आंबेडकरां सोबत झाला म्हणजे तिच्या जीवनाचा परीस होणार पण जीवनाचा परीस होण्यासाठी आयुष्यभर रमाबाई चंदनाप्रमाणे झिजत राहिल्या.1907 साली भीमराव आंबेडकर दहावी परीक्षा उत्तीर्ण झाले‌. भीमराव आंबेडकर मॅट्रिक पास झाले तेव्हा रमाबाई म्हणाल्या, “ तुम्ही खूप मोठे व्हा ! सगळ्यांपेक्षा मोठे व्हा”.

1912साली भीमराव आंबेडकर बी ए ची परीक्षा पास झाले.अस्पृश्य समाजातून बी ए होणारे ते भारतातील पहिलेच विद्यार्थी ठरले होते. रमाईची साथ असल्यामुळे यशाचे एक-एक शिखर भीमराव आंबेडकर पार करत होते. वडिलांची खूप तळमळ होती . मुलाच्या शिक्षणासाठी रामजी आंबेडकर अहोरात्र परिश्रम घेत. 21 डिसेंबर 1912 रोजी भीमराव आंबेडकर यांना मुलगा झाला . रमा आता रमाई झाली होती. मुलाचं नाव यशवंत ठेवलं होतं . पती ज्ञानपिपासू असल्यामुळे आता रमाईची जबाबदारी आणखी वाढली होती. एकीकडे मुलाचा सांभाळ करायचा आणि दुसरीकडे पतीची सेवा करायची अशी दुहेरी भूमिका पार पाडत होत्या.दोन फेब्रुवारी 1913 रोजी रामजी आंबेडकर वारले. भीमरावांचे पितृछत्र हरवले. दुःख कळा सोसणाऱ्या पतीला रमाईने धीर दिला या दुःखातून उभे राहण्याचे बळ दिलं.4 जून 1913 रोजी बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला जाण्यास निघाले. रमाई त्यावेळी गरोदर होत्या. त्या डगमगल्या नाही.

कारण घराचा आधार रमाई होत्या. रमाईने काळजावर दगड ठेवून बाबासाहेब आंबेडकरांना निरोप दिला. रमाई बाबासाहेबांना पत्र पाठवीत. “ आपण शिका ही माझी कामना आहे. मी तुमच्या पाठीशी उभी राहील. काय वाट्टेल ते कष्ट करीन पण मागे हटणार नाही.” पत्रातून रमाई बाबासाहेब आंबेडकरांचे मनोधैर्य वाढवीत. पतीच्या प्रगतीची आस धरुन रमाई संसाराचा गाडा ओढत होत्या. जीवनाशी झगडत होत्या . कितीही संकट आली तरी अश्रूंना वाट मोकळी करून त्या पुन्हा नव्या दमाने कामाला लागत . प्रचंड जिद्द व सहनशील होत्या रमाई!!
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला जाताना रमाईच्या पोटात बाळ वाढत होते. त्याचा जन्म झाला . नाव रमेश ठेवले . परंतु रमेश दीड वर्षाच्या असताना तो मरण पावला. बाबासाहेब आंबेडकर परदेशात असताना आपला पोटचा गोळा गेला याच प्रचंड दुःख त्यांना झाले . त्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिले होते.‌ “तुमच्या अभ्यासात गुंतलेल्या मनाला झळ पोहोचू नये. म्हणून आपणाला कळविले नाही. तुम्हाला एवढीच विनंती की हे दुःख माझ्यावर सोपवून द्या ”. मुलाच्या मरणाच डोंगराएवढे दुःख रमाईने सोसलं. या नंतर थोड्याच दिवसांनी बाबासाहेबांचे बंधू आनंदराव आप्पासाहेब यांचे आजाराने निधन झाले. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई मुलगा मुकुंद यांची जबाबदारी रमाई वरच होती.

संपूर्ण घराची जबाबदारी रमाई होती. रमाईने कष्ट करून गौर्या थापुन सरपण विकून आपल्या कुटुंबाची आर्थिक गरज भागवली. कोणापुढे हात पसरले नाही . परिस्थितीला निर्भिडपणे तोंड देत जगत होत्या. आपली बिकट परिस्थिती पतीलाही कळू नये याची त्या काळजी घेत .बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी कष्ट करण्याची तयारी रमाईने केली होती. युगानुयुगे दारिद्र्यात खितपत पडलेल्या समाजाला मुक्त करण्यासाठी रमाई बाबासाहेब आंबेडकरां बरोबर प्रत्येक दुःखात त्यांची साथ देत होत्या. किंबहूना बाबासाहेब आंबेडकर भारतात नव्हते तेव्हा त्यांची मुलं औषध पाण्यावाचून मरण पावली. रमाईने कितीही दुःख झाले तरी बाबासाहेब आंबेडकरांना त्याची झळ पोहोचू नये याची दक्षता त्या घेत. 1923 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार होणार होता . सत्कार समारंभाला घालून जाण्यासाठी रमाई कडे एकही चांगली साडी नव्हती, म्हणून त्या बाबासाहेबांना सत्कार प्रसंगी मिळालेला एक फेटा नेसून कार्यक्रमात गेल्या. पतीसाठी एवढा त्याग व समर्पण करणारी पत्नी रमाई!!

बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण त्यांचे ध्येय सिद्धीस जावे यासाठी रमाई सर्व हाल-अपेष्टा सहन करत होत्या. एकदा रमाईने महिला मंडळा समोर भाषण केले होते त्या भाषणात रमाई म्हणतात, “ पतीने ज्या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली असते. त्याच कार्याला सहधर्मचारिणी म्हणून पत्नीनं सुध्दा खांदा लावायचा असतो” तसाच काहीसा प्रकार रमाईच्या बाबतीत घडला होता . रमाईने प्रत्यक्ष असा त्याग केला. त्या अनुभवाचे बोल त्या सांगत होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक चळवळी, सत्याग्रह , सभा यामध्ये व्यस्त राहत असत . त्यामुळे रमाईंना बाबासाहेब आंबेडकरांची काळजी वाटायची चिंता करत असायच्या. समाजकंटकांकडून धमकीची पत्रे येत. वाचून रमाईंना धडकी भरत असे. कधी एकदा बाबासाहेब आंबेडकर घरी सुखरूप येतील याची त्या सतत काळजी करायच्या.1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राउंड टेबल कॉन्फरन्स यशस्वी करून विलायतेहून मुंबईत आले होते.

त्यामुळे त्यावेळी अनुयायांचा समुदाय बाबासाहेबांच्या स्वागतासाठी उभा होता. रमाई लांब उभ्या होत्या. त्यांनी सर्वात शेवटी बाबासाहेब आंबेडकर यांच्या गळ्यात हार टाकला . त्यांची नजर बाबासाहेबांच्या पायाकडे होती. जनता पत्राचे संपादक सहस्त्रबुद्धे यांनी रमाईंना प्रश्न केले की, आपण सर्वात शेवटी बाबासाहेबांना हार का घातला. व तेव्हा तुमची नजर बाबासाहेबांच्या पायाकडे का होती? रमाईने भाषणातून या प्रश्नांची उत्तरे दिली त्या म्हणाला की , “ सर्व अनुयायांना बाबासाहेबांचे दर्शन व्हावं. अनुयायांना ती संधी देणे हे माझं कर्तव्य होतं. माणुसकीचं व सौजन्याच होतं. तेव्हा मी सर्वांना संधी दिली मग मी हार घातला दुसरा असं की, बाबासाहेबांनी हातात दीनदलितांच्या उद्धाराचा काकण बांधलं आहे . त्याला माझी नजर लागू नये म्हणून माझी नजर त्यांच्या पायाकडे वळवली”वसतिगृहातील मुलांना जेवण मिळावे म्हणून स्वतःचा दागिना देऊन स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून सर्व मुलांना जेऊ घालणारी रमाई दुसऱ्यांना सुख मिळावे म्हणून नेहमी झटत राहणारी रमाई धन्य!

22 मे 1935 रोजी रमाईची तब्येत खूपच बिघडली होती . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जवळ बसून होते . रमाईने आपल्या कुटुंबासाठी खाल्लेल्या खस्ता, कष्ट, दुःख , दारिद्र्य याची आठवण त्यांच्या डोळ्यासमोर होती . रमाईला आपण सुख देऊ शकलो नाही, वेळ देऊ शकलो नाही याची बाबासाहेब आंबेडकरांना खंत होती. अखेर 27 मे 1935 रोजी रमाई ची प्राणज्योत मावळली. बाबासाहेब आंबेडकरांसाठी हा फार मोठा आघात होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात रमाई साठी एक खास जागा होती. त्यांनी आपल्या ‘ थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ रमाईंना अर्पण केला त्यात बाबासाहेब आंबेडकर लिहितात, “जिच्या अंतःकरणाचा चांगुलपणा , तिच्या मनाचा उद्दात्त पणा, चारित्र्याचा निष्कलंक पणा त्याचप्रमाणे ज्यावेळी कोणी मित्र उरला नव्हता . पोटा पाण्याचा विवंचनेचा काळ होता. असे दिवस आमच्या दोघांच्या वाट्याला आले असता. जिने ते दिवस मूकपणाने सहन केले व माझ्याबरोबर ते दुःख सहन केले. आणि मजबरोबर तसले हि दिवस कंठ ले म्हणून तिच्यावरील सद्गुणांची आठवण ठेवण्यासाठी हा ग्रंथ तिच्या स्मृतीस अर्पण करीत आहे.

एका ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “रामू तू मला सोडून गेली. तुला मी काही सुख दिले नाही . तू माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या. तिची खूप उधारी आहे माझ्यावर . मी कधीही फेडू शकणार नाही. तिने माझ्यासाठी अपार कष्ट सहन केले. उपास काढले. एका वस्त्रानिशी घरात राहिली. मला आमच्या मुलांना वाचविण्यासाठी काही करता आले नाही. हे समाजक्रांतीचे वृत्त मी स्वीकारले आहे . मी माझ्या बौद्धिक व मानसिक शक्ती वाढविण्यासाठी एखाद्या योग्याच्या निष्ठेने समाजाच्या उन्नतीला आवश्यक असणाऱ्या
सर्वांगीन अभ्यासाची समाधी लावली. वीस-बावीस तास अभ्यास केला. पदव्या मिळविल्या. मी प्रकांड पंडित झालो. पण कुटुंबासाठी मी काहीच करू शकलो नाही.” खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजासाठी , देशासाठी आपल्या जीवनाचे महत्त्वाचे क्षण खर्ची घातले. रमाई आंबेडकरांनी खूप मोठा त्याग केला. या त्यागाची आठवण आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, रमाई म्हणजे कारुण्य…. जिव्हाळा… प्रचंड कष्ट.. मेहनत.. रमाई म्हणजे स्वाभिमान.. रमाई म्हणजे नवकोटीची माता.. रमाई म्हणजे त्याग.. अशा या त्यागमूर्ती रमाई ना विनम्र अभिवादन.. शतशा प्रणाम!! 🙏

✒️लेखिका:-श्रीमती.मनीषा अंतरकर
saiantarkar@gmail.com(मो:-7822828708)