आपला प्रिय राष्ट्रीय झेंडा : तिरंगा !

94

भारताचा राष्ट्रीय ध्वज हा भगवा- केशरी, पांढरा आणि हिरवा असा क्षैतिज आयताकृती तिरंगा आहे. त्याचबरोबर त्याच्या मध्यभागी अशोकचक्र आहे. आपला प्राणप्रिय राष्ट्रध्वज- तिरंगा हा दि.२२ जुलै १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या चोवीस दिवस आधी अंगीकारला गेला. इंंग्रजांनी २४ मार्च रोजी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला होता. स्वतंंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज कसा असावा? हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रभृृती होते. त्यांनी ठरवले की काँग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिन्ह ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे.

घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली आणि दि.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या अधिपत्याखालील अधिकृत राष्ट्रध्वज झाले. त्यानंतर तोच भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून कायम ठेवण्यात आला. भारतीय राष्ट्रध्वजाने राष्ट्रगीतांप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य काळातही भारतीयांना प्रेरणा दिली आहे. विवीध साहित्यात व राष्ट्रभक्ती गीतांमध्येही त्यास गौरवले गेल्याचे दिसून येते. हिंदी कवी श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांनी लिहिलेल्या-

“विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊंचा रहे हमारा।”

या गीतास सन १९३८च्या काँग्रेस आधीवेशनात ‘झेंडा गीत’ म्हणून स्वीकारले गेले.कायद्याने हा राष्ट्रध्वज खादीपासून बनवावा आणि खास प्रकारच्या सूती कापडाचा किंवा रेशमाचा असावा. यासाठी महात्मा गांधी यांनी लोकप्रिय केलेली खादी वापरली जाते. राष्ट्रध्वज निर्मितीची प्रक्रिया व वैशिष्ट्ये भारतीय मानक कार्यालयाद्वारे ठरवली जाते. तो तयार करण्याचा अधिकार खादी विकास व ग्रामोद्योग आयोगाकडे आहे. तो अधिकार विभागीय गटांना वाटून दिला जातो. सन २००९पर्यंत कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ हा एकमेव निर्माता होता. राष्ट्रीय ध्वजचा वापर भारतीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय चिन्हाशी संबंधित इतर कायद्यांद्वारे केला जातो. मूळ संहिता स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिन यांसारखे राष्ट्रीय दिवस वगळता खासगी नागरिकांकडून त्याचा वापर करण्यास मनाई होती. सन २००२मध्ये खासगी नागरिकाकडून केलेल्या अपिलाच्या सुनावणीवर भारतीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या वापरास परवानगी देण्यासाठी कायद्यांचा संग्रहमध्ये बदल करण्याचे निर्देश भारत सरकारला दिले. त्यानंतर भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने मर्यादित वापरास परवानगी देण्यासाठी कायद्यांच्या संग्रहामध्ये सुधारणा केली. स्वांत्र्य लढ्यासाठी लिहिलेल्या प्रेरणादायी गीतात बा.भ. बोरकरांनी-

“चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण,
कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान

अशी त्यांनी गीतातून गर्जना केली.
ध्वजातील गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ: केशरी रंग- त्याग व शौर्यास प्रेरणादायी आहे. पांढरा रंग- शांती व सुख प्रस्थापित करण्यास खुणावतो. हिरवा रंग- हरित क्रांतीतून समृद्धीकडे वाटचाल दर्शविते. तर निळ्या रंगातील आरे- तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या २४ सत्यांचे ते प्रतिक आहे. याद्वारे दु:खाचे कारण व त्यावर योग्य उपचार करण्यास सुचवितात. भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा आणि निळा. त्यामुळे आपला प्राणप्रिय राष्ट्रध्वज हा रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे. दि.२२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत ‘तिरंगी ध्वज’ भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र अर्थात धम्मचक्र असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला २४ आरे आहेत. मच्‍छलीपट्टणम येथे जन्मलेल्या पिंगली वेंकय्या यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण २:३ असे आहे. तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा, असा सरकारी नियम आहे.

“अजिंक्य भारत, अजिंक्य।
जनता ललकारत सारे।
ध्वज विजयाचा उंच धरा रे!” अशी ललकारी कवी योगेश्वर अभ्यंकरांनी दिली.

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे असे विशद केले- १) ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. २) वरच्या भागात गडद केशरी रंग आहे. या रंगातून त्याग व धैर्य याचा बोध होतो. ३) मधल्या भागात पांढरा रंग आहे. या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य व पावित्र्याचा बोध होतो. ४) खालच्या भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंग निसर्ग व भूमीशी असलेले नाते दर्शवितो. तसेच निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.

५) निळ्या रंगाचे अशोकचक्र हे सागराप्रमाणे अथांगता, कालचक्र व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धम्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र’ या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय!’ हे घोषवाक्य भारतीय संसद सभापती स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे. भारतीय संविधानात नमूद नागरीकांच्या कर्तव्याप्रमाणे भारतीय नागरीकांनी राष्ट्रगीतासोबतच राष्ट्रध्वजाचा सुद्धा आदर होणे अभिप्रेत आहे.
!! शान न इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए… झंडा उँचा रहे हमारा !!


✒️शब्दांकन:-‘कृगोनि’- श्री कृ. गो. निकोडे.(भारतीय इतिहास अभ्यासक व मराठी साहित्यिक.)मु. रामनगर वॉर्ड क्र.२०, गडचिरोली.जि. गडचिरोली (७७७५०४१०८६).