रेशीम गाठी …सैल का होतात ?

32

Family घडवताना आणि सांभाळताना मनाचं खुप मोठं औदर्य लागतं.ते क्वचितच एखाद्या कडे असतं.नहीतर आजकाल पैसा हेच सर्वकाही समजणारे पावला पावलावर सापडतात.नात्यामध्ये संवाद असणं आणि एकमेकांना समजणं महत्त्वाचे. फक्त मी म्हणेल तेच योग्य असं अहंभाव जिथे निर्माण होतो तिथेच नातं कुचकामी होतं.नात्यामध्ये घेण्यापेक्षा देण्याने त्याला सौंदर्य लाभतं.फक्त मलाच सगळं हवं असं म्हणून वावरत राहिलो तर ते नातं औपचारिक होऊन बसतं.त्यात आसुरी प्रवृत्ती वास करते.नातं जोरजबरजस्तीने कधी निर्माण होत नाही. आणि निर्माण झालेच तर ते फार काळ टिकत नाही.

कुठल्याही नात्यामध्ये वाद विवाद असतात. एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतात. पण त्याचे रुपांतर जेंव्हा मनभेदात होते आणि नात्यामध्ये वितुष्ट येते,तेव्हा कोणीतरी एकटाच जबाबदार असतो असे समजणेच मुर्खपणा आहे. त्याला दोन्ही बाजू जबाबदार असतात.पण जेंव्हा बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न होत असतो त्यावेळेस मार्गच काढण्याचा प्रयत्न व्हावा विनाकारण उकाळ्यापाकाळ्या काढत बसलो तर मार्ग कसा निघेल?नातं टिकवण्याची जबाबदारी कधीच एकावर नसते.त्याला समोरून पण तसा प्रतिसाद पाहिजे.

माणसाचं कसं असतं बघा,कुठल्याही गोष्टीला,संयमाला मर्यादा असते.समोरच्या बाजुने फक्त आपणच बरोबर म्हणून एखाद्याला गृहीत धरून हवे तसे वागणे, हवे तसे बोलणे चालूच असतं.समोरचा ऐकून घेतो ,ऐकून घेतो.सहन करतो. ज्यावेळेस सहनशक्ती संपते तेंव्हा तो पलटवार करतो.एखादा सुज्ञ या पासून साध्य काय होणार म्हणून अलिप्त होतो.पण याने काय होणार?जे नातं आपण आपणाला समज आल्यापासून जपण्याचा प्रयत्न केला,त्याच नात्यापासून हात धुवावा लागतो.

नात्यामध्ये व्यवहार आला की नात्यांना घरघर लागली म्हणून समजा.मग ते नातं रक्ताचं असो नाहीतर मैत्रिचं असो.

आज आपल्या हातात पैसा आला म्हणजे आपण जिंकलो,आता आपल्याला कोणाची गरज नाही,फक्त स्वतःच्या पायापुरतं पाहिलं तरी आपणास कोण अडवणार याची सुरवात झाली म्हणजे आपण नात्यात शुन्य झालो म्हणून समजा.

आज मला या प्रसंगी आठवतात ते आमचे कारेगाव शाळेचे मुख्याध्यापक. ज्यांनी मला शाळेत राहण्याची परवानगी दिली आणि स्वंयपाक गृहाचा ताबा माझ्याकडे दिला.

वाळके सर,वाळके बाई,डांगे सर यांनी त्या सहा महिन्यांत जेवणाची सोय तर केलीच पण प्रसंगाला आर्थिक मदत पण केली.

माझे मित्र असतील त्यात अकरावी, बारावी ला एकत्र राहताना माझ्या छोट्या मोठ्या प्रसंगात मला मदत केली. मारोती, सुजित, रफिक,प्रताप लाला,यांनी त्यावेळेस मला सांभाळून घेतलं.

मी डि.एड ला असताना योगेश, रवि,राजपूत, सुबोध, अमोल ह्यांनी कधी मला माझ्या गरजा पुर्ण करण्यासाठी आर्थिक मदत कमी पडू दिली नाही.

आणखी अशी बरेच माणसे आहेत, कोणी रुममालक,कोणी मेसवाला,कोणी स्टेशनरी दुकानदार अशा बऱ्याच लोकांनी मला त्या त्या वेळेस सावरलं.आधार दिला.

ही बाब वेगळी की मी ते घेतले ते परत केले. पण त्या परत करण्यापेक्षा वेळेला त्यांनी मला जपलं हे महत्वाचं.
हे सांगण्याचे कारण एवढेच की आज यातले बरेच जण संपर्कात आहेत काही जण नाहीत. पण त्यांच्या सोबत जे ऋणानुबंध कायम झालेत मला वाटत नाही मी जिवंत असेपर्यंत ते माझ्या मनातून पुसले जातील म्हणून.

म्हणून नातं जपताना मनं जपता आली पाहिजेत. आर्थिक बाजू आज कमकुवत असेल,एखाद्याची बळकट असेल म्हणून त्या गोष्टी नात्यात आणू नयेत. व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार आणि नात्याच्या ठिकाणी नाते जपता आले तर माणूस म्हणून आपण नक्की यशस्वी होऊ.अन् नात्यांच्या रेशीम बंधनात बांधले जाऊ.अन्यथा जीवन असेच भरकटत राहील.

✒️लेखक:-सतिश यानभुरे
मो- 86054 52272
शिक्षक,खेड तालुका जिल्हा पुणे

✒️संकलन:-नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-8080942185

                                                          दि-3/09/2020