प्रेमळ सहवास

31

“स्वारीचं लक्ष कुठाय? मी केव्हाचाच आलोय ” अबोलीच्या चेहऱ्यावरचा दुःख मिश्रित आनंद पाहून आणि तिच्या मानेभोवती विळखा घालत म्हणाला. अगं खुशीत पण दिसतेस ! विजय आला होता काय ? हो रे, पण तुला कसं कळलं ? अबोलीच्या आश्चर्याला अवी उत्तरादाखल म्हणाला,’ अगं वेडे, तो कसा येईल ? तो राहिला बेंगलोरला. आणि आत्ता आत्ताच तर जॉईन झालाय ना कंपनीत ? रजा टाकून तुला भेटायला थोडास तो येईल ? गम्मत केली गं मी ! अरे, गंमत नाही, खरच दादा आला होता. कंपनीच्या कामानिमित्त पुण्यात यावं लागलं. काम झाल्यावर मला भेटायला मुद्दामहून आला. म्हणाला, तायडे , मुक्काम नाही होणार, मला आज रात्रीच इथून निघायचय. न कळवताच आलाय. बघताक्षणी काय सूचनाच मला ! आम्ही खूप गप्पा मारल्या. आई बाबांच्या आठवणी निघाल्या. बोलत- बोलत त्याच्या आवडीचा खाऊ केला आणि प्रवासासाठी थोडा डब्यात बांधला. तू तुझी पण आठवण काढत होता आत्ताच दहा मिनिटांपूर्वी बाहेर पडला. तुला पण नेमका आजच उशीर झाला ऑफिसमधून यायला. मनात आलं फोन करूया पण एकेकदा डिस्टर्ब होतोच ना, म्हटलं राहू दे.

बरं, हे बघ काय आणलंय तुझ्या- माझ्या आवडीचा खाऊ ? पिशवीतले खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू बाहेर काढत असतानाच हाताला ओलसर कागद लागला. काय हे ? कागदी उघडताच अबोली- मोगर्‍याचा हा- मोठा गजरा दिसला. क्षणातच अबोलीचे डोळे डबडबले. अवि हे पाहून न पहिल्या सारखा करत फ्रेश होण्यासाठी गेला देखील. तिकडे अबोलीचं मन माहेरी जाऊन धडकलं…… आई-बाबा ती आणि विजय चौकोनी कुटुंब.आहे त्या परिस्थितीत काटकसरी राहून स्वतःचे दुःख मुलांना न दाखवता त्यांना शिक्षण देऊन सुसंस्कारी करण्याचा कसोशीने प्रयत्न केला होता. वाढदिवसाला शाळेतल्या मैत्रिणींना भारी भारी वस्तू मिळायच्या. आई फक्त मोठासा गजरा आणायची. मुळात बहिण-भाऊ हट्टी कमीच. त्यामुळे आईबाबांना आणखीनच कससच वाटे. अपराध्यासारखी आपण मुलांना महागड्या आणि त्यांच्या इच्छेच्या वस्तू देऊ शकत नाही याचं शल्य असे. बीकॉम पदवी घेतल्यानंतर चांगलं स्थळ येताच थोड्याफार रितीभाती सांभाळत लग्न करून दिले. खूप खुश होती सगळी. पाठवणी करताना किती रडली दोघं ! तिकडे घरातील सर्व इतकी चांगली माणसे मिळाली की जणू माहेरच. नियतीला ही हे पटले असावे. काळाने झडप घातली. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच एका मोठ्या अपघातात आई-बाबांचे निधन झाले. काय बघितलं त्यांनी ? काहीच नाही. विजयच तर अजून लग्नही नाही झालय. पूर्ण कोलमडलो पोरके झालो. नवरा माझा देवमाणूसच. सासर्‍यांनी मला हे भलं थोरलं दुःख जाणवू दिलं नाही. लेक समजूनच वागतात ती माझ्याशी.आणि विजयन ही मला बहीण-भावांचा पवित्र नातं अखंड अबाधित राहील असं जणू वचनच दिलं.

आज विजय तो गजरा आठवणीने आपल्यासाठी आणलेला पाहून अबोलीच्या दुःखांचा बांधच फुटला. आई बाबांचा आपल्याला किती कमी सहवास लाभला ! अवि तेथे केव्हाच आला होता फ्रेश होऊन पण आई वडील गेल्यानंतर अबोलीला विजय रूपात प्रथमच माहेर भेटलं होतं त्यामुळे तिला त्याने मन भरे तो अश्रू गाळू दिले. त्याला अबोलीचं अंतर्मन जाणवत होतं. तिला त्याने प्रेमाने जवळ घेतले समजावले- मी आहे ना ? मग ? अगं त्यानं मला मेसेज केलाच होता, आणि तो मगाशी मला ऑफिसमध्ये भेटून पण गेला, मीच मुद्दाम उशीर केला घरी यायला. बहिण भाऊ निवांत बसूदेत. आपण मध्ये त्यांना डिस्टर्ब नको करायला. कळलं ? चल, तुझ्यासाठी मी छान चहा बनवलाय. तोंड धुऊन फ्रेश हो आधी. मी येतोच चहा आणि खायला घेऊन आणि हा….. आपण पुढच्या आठवड्यात दोघेही विजय इकडे जाऊया. दोन दिवसाची रजा काढलीय सोबत शनिवार-रविवार. म्हणजे चार दिवस आपण त्याच्याकडे रहावयास जाऊ.
अश्रू भरल्या डोळ्यांनी कृतकृत्य नजरेने अबोली अविची पाठमोरी आकृती पाहतच राहिली…

✒️लेखिका:-सौ. स्वाती सुरेश कोरगावकर
                   जिल्हा- कोल्हापूर

▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620