मराठा समाजाला आरक्षण का पाहिजे…??
या प्रश्नाच्या खोलात स्वत: मराठ्यांनी गेलं पाहिजे…!!
महाराष्ट्रात शासनकर्ते मराठे, कारखानदार मराठे, सहकार महर्षी मराठे, शिक्षणमहर्षी मराठे आणि जमीनदार मराठे, श्रीमंत मराठे असुनही मराठ्यांना आरक्षण का पाहिजे…???
या प्रश्नाचे उत्तर आहे सामाजिक असमतोल…!
मराठा समाजातील काही संधीसाधू लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या रयतेच्या राज्यात जी समानता आणली होती ती संपवून लोकशाही राज्यात नवे सरजांमदार, जागिरदार तयार झाले त्यांनी शासना मार्फत अमाप संपत्ती जमा केली त्यासाठी नात्यातील लोकांनाच फायदा कसा होईल याचेही नियोजन केले मात्र मराठा या समाजासाठी काहीच केले नाही परिणामी सामाजिक असमतोल निर्माण झाला आणि गरीब मराठा अधिकच गरीब झाला…!!
२०-२५ वर्षांपूर्वी सधन कास्तकार असलेला मराठा आज अल्पभूधारक शेतकरी आणि परिणामी शेतमजूर झाला हे ग्रामिण महाराष्ट्रातील वास्तव आहे…!!
मराठा समाजातील मोठा वर्ग गरीबीत ढकलल्या गेला हे वास्तव आहे आणि म्हणूनच मग मराठ्यांना आरक्षणाची गरज भासू लागली ही वस्तुस्थिती आहे…!!
ज्यांना आरक्षण पाहिजे,त्या मराठा जातीचेच पुढारी महाराष्ट्रात गेल्या ६० वर्षांपासून सत्ताधारी आहेत,जे सत्ताधारी आहेत ते घराणेशाहीचे समर्थक आहेत,त्यांना फक्त नात्यागोत्याच राजकारण अभिप्रेत आहे, समाजाला ” जाती सोबतं माती खावी ” असा साळसूद सल्ला दिला जातो आणि सत्तेची खुर्ची ऊबविली जाते मात्र आपणं सत्ताधारी असुनही आपलाच समाज गरीबीच्या खाईत कसा ढकलला गेला याचे चिंतन वा आत्मपरीक्षण कुण्याही नेत्याने केले नाही हेच वास्तव आहे…!!
मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास वर्गात ढकलल्या गेला ही वस्तुस्थिती शासना समोर मांडून त्याला सामाजिक आधार देण्याची तरतूद ही लोकशाही मध्ये राज्यकर्ते करु शकतात परंतु आजही महाराष्ट्रातील तमाम राज्यकर्ते मराठा आरक्षणा संदर्भात संवैधानिक कार्यवाही करतांना दिसत नाहीत…!!
उलटपक्षी आरक्षणधारी वर्गाच्या संदर्भात मराठ्यांच्या मनात द्वेष कसा निर्माण करता येईल याची दक्षता घेत विष पेरणी केली जाते आहे हेही लक्षात येते…!!
ज्यांचा सांसदीय लोकशाही, संवैधानिक अधिकार आणि संवैधानिक मुल्यांचा अभ्यास नाही अशा अज्ञानी वा अर्धवटरावांना हाताशी धरुन गफलत निर्माण केली जात आहे…!!
सोशल मीडियावर त्यांचे असे अनेक नमुने अनेक तर्क पाजळुन आपलं अज्ञान प्रकट करीत आहेत…!!
संविधान एका जातीसाठी एक आणि दुस-या जातीसाठी दुसरा न्याय लावते हा तर्क म्हणजेच संवैधानिक मुल्यांबाबतचे अज्ञान होय…!!
मराठा समाजातील नव्या पिढीने धुर्त राजकीय नेत्यांपेक्षा ज्यांना संवैधानिक मुल्यांची जाण आहे अशा मराठा विद्वानांची मते लक्षात घेऊन वाटचाल करावी आणि मराठा आरक्षणाबाबतचे अज्ञान घालवावे तरच योग्य दिशेने जाता येईल अन्यथा ज्या शासनकर्त्या मुठभर सत्ताधारी वर्गाने तुम्हला झुलवतं ठेवले ते यापुढेही असाच धुर्तपणा करीत तुम्हाला अंधारात चाचपडत ठेवतील हेच सत्य आहे…!!
आरक्षण हा विषय राज्यघटनेच्या तरतुदी शी संबंधित आहे म्हणून आरक्षणाचं वास्तव आणि सत्य संवैधानिक मुल्यांची जाण असणारा कायदेपंडितच स्पष्टपणे आणि सत्याशी पडताळून सांगु शकतो हा निकष लक्षात घेऊन नव्या पिढीतील मराठा समाजातील तरुणांनी न्यायमूर्ती पी.बी.सावंत, न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटिल आणि मराठा महासंघ तथा संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनांचे ऐकून पुढिल वाटचाल का करीत नाही…??
फोडा आणि राज्य करा या नितीचा अवलंब करणा-या ब्राम्हण्यवाद्यांच्या कच्छपी लागून आरक्षण मिळेल का…??
ज्यांनी स्वत:चा स्वार्थ साधतं आपल्या पोळीवर तूप ओढून गब्बर झालेतं ते राज्यकर्ते तुम्हाला आरक्षण मिळवून देतील का..???
मराठा आरक्षण मिळविण्यासाठी संवैधानिक मुल्यांची ओळख निर्माण करुन घ्या,अज्ञान टाळा, आणि संवैधानिक मुल्यांचा अभ्यास असणारालाच आपला नेता म्हणून स्विकारा आणि पुढिल वाटचाल करा…!!
अन्यथा इथे अनेकांना झुलवत ठेऊन सत्ता उपभोगण्याचा अजेंडा राबविला जातो आहे .हेही समजून घ्या…!!
जयभीम.

✒️लेखक:-प्रा.भास्कर भोजने सर
( राजकीय विश्लेषक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार,विचारवंत, जेष्ठ मार्गदर्शक अकोला जिल्हा)
मो:-99602 41375

▪️संकलन:-नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-8080942185

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED