आरक्षण गैरसमज आणि अज्ञान

13

✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
मोबा: ९१३०९७९३००

सदर पोस्ट फक्त समाजात आरक्षणाचा अपप्रचार करून द्वेष पसरवणाऱ्या लोकांसाठी आहे. मराठा आरक्षणाला कोणताच समाज विरोध करत नाही तरी सामाजीक तणाव निर्माण करण्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यांना हे उत्तर- हल्ली मराठा आरक्षणाच्या मागणीने खुप मोठा जोर धरलेला आहे. हल्ली आरक्षण आणि सामाजिक न्याय ह्या गोष्टी फक्त निवडणुकिचे मनोरंजक मुद्दे राहीलेले आहे हे सत्य नाकारता येणार नाही. आरक्षणाविषयी सोशल मिडीयावर एक पोस्ट फिरत आहे. ती अशी तांदूळ आणि गहु मिळवण्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे नाही, घोड्याच्या शर्यतीमध्ये गाढव पुढे जात आहे म्हणून आरक्षण पाहिजे अशा प्रकारची पोस्ट फिरवून समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बरं आरक्षणाला गाढव म्हणून आरक्षण मिळावे ही मागणी करणाऱ्या लोकांना किती बुद्धी असेल. अशा प्रकारच्या पोस्ट करणाऱ्या लोकांच्या डोक्यात जातीवादाची प्रंचड घाण असुन मेंदुचा वापर बंद झाल्याचे दिसते आहे. तांदूळ आरक्षण बघून नाही तर राशन कार्ड बघून दिले जातात हेही काही विद्वांना माहिती नाही, आणि राशनकार्ड सर्वांकडे असते. आरक्षण म्हणजे काय हेच ज्यांना माहिती नाही ते विषमता पसरवून सामाजिक वातावरणात दूषित करण्याचे प्रयत्न करत आहेत. अशा लोकांनी एकदा आरक्षण समजून घेणे गरजेचे आहे.

दुसरी गोष्ट आपण विरोध मुळात करतो कोणाला याची जाणीव कुणाला राहली नाही. म्हणून आपल्याच हाताने आपल्या बु्द्धीचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुळात एका माणसाला घोडा आणि एका माणसाला गाढव म्हणून विषमता व द्वेष भावना दिसुन येते.* माणसाला उपमा द्यायची तर घोडा किंवा गाढव या पैकी कोणतीही उपमा देऊन आपण समता प्रस्थापित करू शकतो. परंतु माणसालाच एकाला घोडा आणि गाढव म्हणून तुलना केली जाते तेथे द्वेष व जातीवाद दिसून येतो. आरक्षणा विषयी प्रंचड चिड / तिरस्कार असलेले आणि बुद्धीचा वापर करत नसलेले अनेक लोक आरक्षणाचा फायदा घेतात पण त्याची जाणीव ठेवत नाहीत. आरक्षणाचा द्वेष करणारे लोक स्वत:ला घोडा समजतात व आरक्षणाचा फायदा घेणाऱ्याला गाढव तर यात अवमान व द्वेष कोणाचा आहे याचा विचार कधी केला जात. आरक्षणाची सुरवात राजर्षी शाहु महाराज या मराठा राजाने केली. आणि आरक्षणाचे महत्त्व समजून सांगताना त्यांनी घोड्याचेच उदाहरण दिले होते. ताकदवान घोडे दुबळ्या घोड्याला खाऊ देत नाहीत, दुबळ्या घोड्याच्या वाट्याचे सर्व ताकदवान घोडा खाऊन घेतो म्हणून दुबळा घोडा हा दूबळाच राहते ताकदवान होण्यासाठी त्याला संधीच मिळत नाही अशा आशयाचा संदर्भ राजर्षी शाहु महाराज देऊन आरक्षण समजून सांगतात आणि आपण आरक्षण समजून न घेता फक्त द्वेष भावनेतून घोडा आणि गाढव शब्दप्रयोग करून सामाजिक वातावरण दुषित करतो.

आजही लक्षात घेण्यासारखे आहे आरक्षणाला विरोध म्हणजे मराठ्यांचे जनकल्याणकारी राजे राजर्षी शाहु महाराज यांच्या विचाराला व कार्यांला विरोध होय. आणि आरक्षणामुळे घोड्याच्या शर्यतीत मध्ये गाढव पुढे जात आहे म्हणजे आरक्षणावाले गाढव आहेत तर मग आरक्षण मागुन पुन्हा गाढव होण्याची इच्छा का आहे? (सदर प्रश्न मराठा आरक्षणाचे समर्थन करणाऱ्यांना नाही तर आरक्षण म्हणजे गाढव असे म्हणणाऱ्या अज्ञानी लोकांना आहे.) राजर्षी शाहु महाराज यांच्या मते कमकुवत घोडा म्हणजे जातीव्यवस्थेच्या उतरंडी मध्ये ज्या जातीला प्रगती करण्याची संधीच नव्हती ते सगळे कमकुवत घोडे. कारण जातीमुळे त्यांना विकासाची संधी निर्माण झाली नव्हती त्यांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रभावी उपाय म्हणजे राजर्षी शाहू महाराज होत.

आरक्षणा विषयी अनेक गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. कधी वाचन नाही, सत्य समजून घेणे, कधी समिक्षा नाही, मेंदुला चालना नाही असे लोक आरक्षण म्हणलं तर फक्त पुर्वाश्रमीचे महार आणि आजचे बौद्धच आरक्षणाचे लाभार्थी दिसत आहेत. एवढे संकुचित ज्ञान असलेल्या व्यक्तीने आरक्षण विरोधी पोस्ट शेअर करणे म्हणजे आपण आपली मानसिक कुवत दाखवणे होय. तर आरक्षण फक्त बौद्धांना नसुन OBC, SC, ST या प्रवर्गातील जातींसाठी आहे. ओबीसी मध्ये सर्व जाती ह्या हिंदु धर्मातील आहे जसे कुणबी, तेली, साळी, माळी, कोळी या जाती OBC मध्ये आहेत आणि एवढ्याच जातीला आरक्षण नाही तर महाराष्ट्रात OBC मध्ये दोनशे पन्नास पेक्षा जास्त जाती आहेत आणि त्यांना आरक्षण आहे. OBC ची कँटँगरी बघितली तर अनुक्रमांक सत्तर मध्ये कुणबी, लेवा कुणबी, लेवा पाटील याचा उल्लेख आढळतो म्हणजे यांना आरक्षण आहे. SC मध्ये बौद्ध सोडून ईतर पन्नास पेक्षा जास्त जाती हिंदु धर्मीय आहेत. ST मध्ये असलेल्या सर्व जाती ह्या हिंदु मध्ये आहेत. मग आरक्षणाचा फायदा फक्त SC मधील बौध्दांनाच नाही तर सर्व OBC, SC, ST या सर्वांना आहे. ही बाब समजून घेणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाला सामाजिक पातळीवर कोणाचाच विरोध नाही. परंतु सरकार आरक्षणाची ढाल बनवून निवडणूक मजबूत करण्याचा प्रयत्न नेहमीच करत आलेली आहे. कोणताही समुह मराठा आरक्षणाला विरोध करत नसतानाही आरक्षणा विषयी चुकीची व द्वेषात्मक भावना समाजात पसरवने म्हणजे नैतीकता आणि नितीमत्ता लयास जाणे होय. *बहुसंख्य आमदार आणि खासदार खासदार मराठा असताना एकही नेता मराठा आरक्षणावर बोलत नाही, याचा अर्थ आमदार आणि खासदार हेच मराठा बांधवांना आरक्षण देण्याच्या बाजुने नाहीत. बहुसंख्येने असलेले आमदार खासदार एकमताने आरक्षणाची बाजु उचलून धरत नसतील तर याचा विचार जनतेने करणे गरजेचा आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव चा कार्यक्रम नक्कीच नाही तर प्रतिनिधित्वाचा विषय आहे. जातीच्या नावाखाली आज पर्यंत बहुसंख्य जातींना प्रवाहामध्ये येण्यापासून रोखल्या गेले होते. प्रत्येक समुहाच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून आरक्षणाची निर्मीती झाली. आणि आरक्षण प्रत्येक समुहाला आहे जो प्रवाहापासून दुर होता.जसे आजही महाराष्ट्रात मराठा बांधवांचा विचार केला तर मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि कुणबी यांना ओबीसी मध्ये आरक्षण आहे. *राणे समितीच्या अहवाला नुसार कुणबी आणि मराठा एकच असताना मराठा यांना वेगळे आरक्षण देण्याची गरज नाही. मुळात हा प्रश्न आहे की मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे का? तर हो ज्या ठिकाणी मराठ्यांना आजही मराठा आहे म्हणून डावलले जात असेल तर आरक्षणाची गरज आहे. मराठा म्हणून मराठा समुहाचे प्रतिनिधित्व नाकारले जात असेल तर मराठ्यांना आरक्षण गरजेचे आहे. पण हे आरक्षण घेतांना कायदेशीर बाजु मजबूत पाहिजे. पहीली गोष्ट मराठा कुणबी एकच कि वेगळे हे स्पष्ट व्हावे. जर मराठा कुणबी एकच असतील तर सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून गणणा करून संख्येच्या प्रमाणात आरक्षण माघावे. किंवा कुणबी आणि मराठा वेगवेगळे असतील तर तसे पुरावे सादर करावे. कारण महाराष्ट्रामध्ये मराठ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र असल्याने ओबिसीचे आरक्षण लागु होते. तरी मराठा नावांना आरक्षण मिळण्यासाठी कायदेशीर लढाई लढून, सरकारला धारेवर धरून ते नक्कीच मागावे. परंतु आरक्षणा विषयी द्वेषभावना, इतर जातीबद्दल हीनभावनेने आरक्षणावर टिप्पणी करताना ती टिप्पणी आपल्या स्वतः ला ही लागु होते याची जाणीव असणे गरजेचे आहे. कोणताच समुह मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत नसताना किंवा मराठा आरक्षणाला विरोध करत नसताना एकिकडे आरक्षण माघायचे आणि दुसरीकडे आरक्षणाला दोष देऊन मोकळे व्हायचे अशी दुटप्पी असणाऱ्या लोकांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. आरक्षण हे प्रतिनिधित्व बहाल करते गरिबी दुर करण्यासाठी नाही तर प्रतिनिधित्व मिळून सर्वांना एकत्र करण्यासाठी आरक्षणाची निर्मिती झाली ही गोष्ट प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. आज पर्यंत संविधान कधी न वाचलेल्या आणि समताधिष्ठित समाजव्यवस्था मान्य नसलेल्या लोकांनी संविधान व आरक्षण चुकिच्या पद्धतीने सांगितले, आणि आपणही कधी वाचले नाही म्हणून जास्त गफलत झाली. एक साधा विचार करावा संविधान आणि आरक्षण चुकिचे आणि एकाच वर्गासाठी असते तर त्यावेळच्या लोकांनी का स्विकारले? तेव्हाच्या तज्ञ लोकांना संविधान कळत नव्हते का? काही गोष्टींवर टिका टिप्पणी करून देशाची अस्मिता आणि आपल्या पुर्वजांची बुद्धीमत्ता यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करतो एवढे शहाणे लोक आपण आहोत. म्हणून आरक्षण समजून घेताना एक गोष्ट लक्षात घ्यावी ओबिसी मध्ये दोनशे पन्नास पेक्षा जास्त जातींना आरक्षण आहे याचा अर्थ आपल्या आजुबाजुला असलेल्या सर्वांना आरक्षण आहे. एससी, एसटी मध्ये सुद्धा सर्व जन हिंदु आहेत. आरक्षणामुळे हिंदुना प्रतिनिधित्व मिळाले आहे. म्हणून आरक्षणाला विरोध म्हणजे हिंदुना विरोध आहे. आणि आरक्षण फक्त बौद्धांनाच आहे हे सर्वांचे अज्ञान आहे. लिहायला शिकलो तर आपण वाचायला पाहिजे, वाचले तर कळायला पाहिजे. समाजात आरक्षणाचा अपप्रचार करताना अगोदर आपला विचार करायला पाहिजे मी आरक्षणाचा लाभार्थी तर नाही ना! आरक्षण द्वेष करून नाही तर कायदेशीर मार्गाने मिळते म्हणून द्वेष करणाऱ्या लोकांवर, आरक्षणा विषयी अफवा पसरवणाऱ्या लोकांवर योग्य ती कारवाई होणे गरचेचे आहे. आरक्षण देण्याची नियत सरकारकडे नाही आणि आमचेच तरूण समाजात इतर जातीबद्दल द्वेष घेऊन फिरत आहेत. हे थांबवून आरक्षणावर जणजागृती करून प्रत्येक जण आरक्षणाचा लाभार्थी आहे याची जाणीव करून देणे गरजेचे आहे.