संभाव्य पूरसदृश्य परिस्थितीतून सावरण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा

15

🔹डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात व्यापक बैठक संपन्न

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.18सप्टेंबर):-मराठवाड्यातील जायकवाडी, माजलगाव या मोठ्या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जायकवाडीच्या वर असलेले मुळा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणातील पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणात, जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात, माजलगाव धरणातील पाण्याचा विसर्ग सिंधफना नदीच्या पात्रात सोडल्यामुळे गोदावरी नदीतील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीकडे सरकत चालली आहे.

सदर पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन संभाव्य पूर परिस्थिती निर्माण झाली तर गोदाकाठच्या जिल्ह्यातील सुमारे 337 गावांवर याचा परिणाम होऊ शकतो. ही सर्व शक्य अशक्यता लक्षात घेता आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात जिल्हा प्रशासनातील संबंधित विभाग प्रमुखांची आणि लोकप्रतिनिधींची व्यापक बैठक घेऊन विविध उपाय योजना करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले.

या बैठकीस आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे आदी संबंधित विभागाचे प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

जायकवाडी प्रकल्पातून 17 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजल्यापासून 1 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, माजलगाव धरणातून 42 हजार 900 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तसेच पुर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिद्धेश्वर पाणलोट क्षेत्रातून 5 हजार 824 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू आहे. हे सर्व पाणी गोदावरी नदीला येवून मिळत असल्यामुळे याचा सर्वाधिक संभाव्य धोका नांदेड शहराच्या सखल भागात व गोदावरी काठच्या गावात होऊ शकतो. याच बरोबर नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमाड धरणसुद्धा 100 टक्के भरले असून तेथून 1 लाख 50 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग चालू आहे. पोचमाड प्रकल्प 100 टक्के भरल्यामुळे गोदावरी नदीत फुगवटा निर्माण झाल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. सद्यस्थितीत विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाच दरवाजातून 95 हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे. येत्या काही दिवसात अतिवृष्टी झाली तर सध्या नांदेड शहरातील गोदावरी नदीचे पाणी धोक्याची पातळी गाठू शकते. सध्या जुन्या पुलावर 344 पाणी पातळी असून इशारा पातळी 351 मीटर आहे. धोका पातळी 354 मीटर इतकी असून सद्यस्थितीत पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीपर्यंत असाच पाऊस चालू राहिला तर गाठू शकेल अशी भिती असल्याने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन पुढील नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याचे पाटबंधारे विभागाचे सचिव एन. व्ही. शिंदे यांनी संपर्क साधून संभाव्य पूर परिस्थितीची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड-19 चा संसर्ग लक्षात घेता याबाबत आरोग्याच्या वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात हे लक्षात घेऊन आरोग्य विभागालाही त्यांनी पूर्व तयारी करण्याबाबत सूचित केले. विशेषत: नांदेड शहरातील गोदावरी काठावर असलेल्या गोवर्धनघाट येथे पाणी पातळी वाढल्यास इतर ठिकाणी काय सुविधा उपलब्ध करता येतील याबाबत नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या अतिवृष्टीमुळे अनेक सखल भागात शेतकऱ्यांच्या हातचे पीक धोक्यात आले असून याचा मोठा आर्थिक उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक भागात शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून त्याचे त्वरीत पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले.