मराठा आरक्षणाचा विचार करताना ओ बी सी संवर्गाला धक्का लागु देऊ नका

25

🔸ओ बी सी संघटनेचे कवडू लोहकरे यांची मुख्यमंत्री यांचे कडे मागणी

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.19सप्टेंबर):- ओ.बी.सी हा बहुसंख्य समाज आहे. यात ३६० पेक्षा जास्त जाती व उप जातीचा समावेश आहे. सर्वात मोठा समाज ओ बी सी च आहे. सध्या मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. मोर्चे, आंदोलन, रास्ता रोको या माध्यमातून लढाई सुरू आहे. सध्या सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे.

त्यामुळे मराठा समाजाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देतांना ओ बी सी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मराठा समाजाला आरक्षण ओ बी सी संवर्गातुन न देता स्वतंत्र देण्यात यावे. ओ बी सी समाजाचा कोटा सुरक्षित ठेवण्यात यावा.५२ टक्के ओ बी सी समाज असतांना १९ टक्के ही आरक्षण दिले जात नाही. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे आरक्षण दिल्या जात आहे. चंद्रपूर ११ टक्के, यवतमाळ १४ टक्के, गडचिरोली ६, नंदुरबार, नाशिक, रायगड, पालघर ९ टक्के अशाप्रकारे आरक्षण विसंगती दिसुन येत आहे. संविधानाची कलम ३४० नुसार संविधानामध्ये ओ बी सी जनगणनेचा घटनात्मक अधिकार दिला आहे पण सरकार ला जनगणना करायचीच नाही आहे.१९३१ पासुन भारतात ओ बी सी ची जनगणना झालीच नाही.

त्यामुळे ओ बी सी समाजाची शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक पिळवणूक व शोषण केल्या जात आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही पण ओ बी सी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी मागणी ओ बी सी संघटनेचे कवडू लोहकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे करण्यात आली.

“मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. त्यांचा तो अधिकार आहे. ओ बी सी चा कोटा सुरक्षीत ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु”
कवडू लोहकरे (कोषाध्यक्ष — राष्ट्रीय ओ बी सी कर्मचारी महासंघ चिमुर)