आरळा सिद्धार्थनगर येथील पाणी प्रश्नावर रस्ता रोको आंदोलनानंतर यशस्वी तोडगा

29

🔹ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत यांचेशी विजयकुमार भोसले यांनी केली चर्चा

🔸ना.नितीन राऊत व विजयकुमार भोसले यांचे नागरिकांनी मानले आभार

✒️शिराळा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

शिराळा(दि.14ऑक्टोबर):-आरळा येथील सिद्धार्थ नगर मधील पाणी प्रश्नाबाबत स्थानिकांनी शिराळा तालुका काँग्रेस चे अध्यक्ष ऍड. रवि पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आयोजित केला होता.गेल्या तीस वर्षात अनेक नेत्यांनी सिद्धार्थ नगर येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतो अशी आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसली. सध्या पाणीटंचाईचे संकट इतके गंभीर आहे की दोन दिवसातून व कधी चार दिवसातून थोड्यावेळासाठी कमी दाबाचे पाणी येते ते कशालाच पुरत नाही, जवळ हातऊपसा पंप नाही.

एखादी व्यक्ती मयत झाली, नातेवाईक घरी असतात तर घरच्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. लॉक डाऊन मध्ये कॉरेनटाईन कुटुंबांना पाण्याविना कित्तेक दिवस घरातच तडफडावे लागले तर पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने विवाह इच्छुक मुलांना इतर गावातील लोकांनी मुली देण्याचे बंद केले आहे. ग्रामपंचायतीचे दाखले गरजेचे पडल्यास मात्र मागील सर्व पाणीपट्टी भरून घेतले जाते. सध्या जी पाईपलाईन आहे त्या पाईप लाईन ला गावात अनेक लोकांनी परस्पर छिद्रे पाडल्यामुळे अत्यंत कमी पाणी पुरवठा होतो. तर 2007 मध्ये भारत निर्माण योजना योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला केवळ कागदोपत्री पाईपलाईन झाली परंतु त्यातून पाण्याच्या थेंबाचा देखील लाभ सिद्धार्थ मधील नगर मधील नागरिकांना झाला नाही.

जवळच एक आड आहे तो जरी दुरुस्त झाला तरी सातशे लोकवस्तीच्या सिद्धार्थ नगरला स्वतंत्र पाणी व्यवस्था होऊ शकली असती,असे अनेक विचार पोटतिडकीने मांडले होते.
यावेळी ऍड.पाटील यांनी नागरिकांना पाणी, रस्ते, गटर, दिवाबत्ती इत्यादी व्यवस्था होण्यासाठी 1955 ला आरळा ग्रामपंचायतीची स्थापना झाली. दलित वस्ती सुधारणा योजनेखाली कित्येक लाख रुपयांचा चुराडा झाला परंतु या नगरातील नागरिकांना त्याचा फायदा झाला नाही. मध्यंतरी आपण शेकडो स्थानिक नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सरपंच यांना देऊन देखील स्थानिक प्रश्नाबाबत सिद्धार्थनगर येथे विशेष ग्रामसभा घेण्याचे त्यांनी टाळले.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न न सोडता पाणीपट्टी मात्र पुरेपूर भरून घेऊन घेतली जाते या सर्वातून आपले जीवन सुसह्य करणारे प्रशासन हेच आपले शोषण करत आहे हे स्पष्ट होते.
गेल्या पंचवीस तीस वर्षात उशाला चांदोली धरण व वारणा नदी बारमाही वाहत असताना पिण्याचे पाणी न मिळणे याच्या इतका लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा असूच शकत नाही.

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आता गोरगरीब वंचित व पीडितांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरला आहे. हाथरस येथील राहुल गांधींच्या योगदानातून काँग्रेसने देशाला हाच संदेश दिला आहे.त्याच धर्तीवर मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शिराळा तालुका कमिटी सिद्धार्थनगर येथील शेकडो महिला पुरुष नागरिकांना घेऊन पाणीप्रश्नावर चांदोली शिराळा रस्ता, आरळा येथे अडवून रस्ता रोको आंदोलन केले.

यावेळी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने सिद्धार्थनगर आरळा येथे एक दिवस आड दिड तास मुबलक पाणी पुरवठा करणेत येईल, सध्या कार्यरत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विस्तारित योजनेतून सिद्धार्थनगर करिता मुबलक पाण्याची सोय करण्यात येईल, तसेच आपणाकडून सिद्धार्थ नगर जवळ ५० फूट असले आडातून सौर ऊर्जेद्वारे सिद्धार्थनगर करिता कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे करिता अनुसूचित जाती योजनेतून, दलित योजनेतून अथवा शासनाकडून होणाऱ्या योजनेतून निधी उपलब्ध व्हावा म्हणून आरळा ग्रामपंचायत सर्व तो पाठपुरावा करेल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे पाणीप्रश्नावरचे आंदोलन संस्थगित करून त्याची यशस्वी सांगता झाली.

दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाने पूर्तता न झाल्यास संबंधित सरपंच, उपसरपंच यांच्या दारात बोंब ठोकण्याचे आंदोलन करणार असल्याचे ॲड. पाटील यांनी ठणकावून सांगितले. यावेळी सांगली जिल्हा कांग्रेस कमेटी चे सचिव सुरेश कांबळे,तालुका काँग्रेसचे रामचंद्र तात्या नाईक ,तुकाराम चव्हाण, सुनील घोलप, राजाभाऊ चरणकर, राजेंद्र माने तसेच सिद्धार्थनगर येथील शेकडो महिला पुरुष, सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तसेच कोकरूड पोलिस स्टेशनचे निरीक्षक कदम पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जमलेल्या आंदोलकांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या अनुसूचित जाती विभागाचे राज्य समन्वयक कुंभोज येथील विजयकुमार भोसले यांचे विशेष आभार मानले श्री भोसले यांनी सिद्धार्थ नगर मधील पाणीप्रश्नावर तात्काळ महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधून विशेष निधी देण्याबद्दल आग्रह केल्यामुळे मंत्रीमहोदयांनी सिद्धार्थ नगर करता स्वतंत्र पेयजल व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले असून त्याची कार्यवाही देखील लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.