देवेंद्रजी, कोश्यारींच्याकरवी चालवलेल्या हलकट उचापतींना आवरा

28

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यपालांचे माकडचाळे जोरात सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची परस्थिती बिकट आहे. जन-सामान्यांचे जिणे हराम झाले आहे. लोकांच्या हाताला काम नाही. आधी नोटबंदीने आणि आता लॉकडाऊनमुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे. मोदी शेठच्या करामतींनी अर्थव्यवस्था शेवटचे आचके देते आहे. टाळ्या वाजवल्या, दिवे लावले पण अजून कोरोना आटोक्यात आलेला नाही.

शेतक-यांचे, कामगारांचे, व्यापा-यांचे प्रश्न अधिक किचकट होत आहेत. कोरोनाच्या संकटानंतर अवघे राज्य आणि राज्याचे अर्थकारण गोठून गेल्यासारखी स्थिती आहे. अशा काळात या राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भगतसिंह कोश्यारी यांना राजकारणाचे मुळव्याध उठले आहे. या दोघांनी मिळून राज्याच्या राजभवनास कपट-कारस्थानाचा अड्डा बनवले आहे. हे राजभवन आहे की कट-कारस्थानाचा अड्डा झालेला पेशव्यांचा शनिवार वाडा आहे ? असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय रहात नाही.

महाराष्ट्रात १९४८ साली राज्यपाल असलेले जॉन कॉलव्हील, राजा महाराज सिंह यांच्यापासून ते कोश्यारींच्या आधीचे भाजपाचेच असलेले विद्यासागर राव यांच्यापर्यंत जवळपास बावीस राज्यपाल झाले. या बावीस राज्यपालांनी महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून काम करताना कधीही त्या पदाची गरिमा संपुष्टात आणली नाही. पण महाराष्ट्राचे तेविसावे राज्यपाल म्हणून आलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी त्या पदाची गरिमा धुळीस मिळवली आहे. विद्यासागर राव भाजपाचेच होते पण त्यांनीही या पदाची प्रतिष्ठा जपली होती.

ते कधीच राजभवनातून फालतूच्या राजकीय उचापती करत बसले नव्हते. ते भाजपाचेच होते पण भाजपाच्या कार्यकर्त्यासारखे कधीच वागले नाहीत. राज्यपाल म्हणून आले आणि राज्यपाल म्हणूनच परत गेले. कोश्यारींनी त्या सगळ्या मर्यादा सोडल्या. त्यांनी कंबरेचे सोडले आहे आणि फडणवीसांच्या डोक्याला गुंडाळले आहे. शहिद भगतसिंग यांच्या बलिदानानंतर अवघ्या बारा-तेरा वर्षानी जन्माला आलेल्या या माणसाचे नाव भगतसिंग ठेवताना त्यांच्या आई-बापांनी कदाचित शहिद भगतसिंगाचा विचार डोळ्यासमोर ठेवला असेल, त्यांचे कार्य-कर्तृत्व डोळ्यासमोर ठेवूनच त्यांचे नाव भगतसिंग ठेवले असेल.

पण “नाव मोठं आणि लक्षण खोटं !” अशी अवस्था कोश्यारींची आहे. शहिद भगतसिंग कधीच धर्मांध, जातीयवादी आणि कारस्थानी नव्हते. त्यामुळे हे कोश्यारी महाशय भगतसिंग या नावालाच कलंक वाटतात. तसेच वर्तन हा माणूस करताना दिसतो आहे. कोश्यारींनी उध्दव ठाकरेंना पत्रातून जो सवाल केला आहे तो त्यांच्या धर्मांध विकृतीचा पुरावा आहे.

सध्या राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रावरून वादंग माजले आहे. मंदिर उघडण्यावरून कोश्यारी यांनी उध्दव ठाकरेंना जे पत्र लिहीले आहे ते राजकीय विकृतीचा आणि कारस्थानी प्रवृत्तीचा उत्तम नमुणा आहे. खरेतर राज्यपाल हे पद संविधानाला बांधिल आहे. ते तटस्थ आणि नि:पक्ष असते. हल्ली राज्यपाल हे संविधानाऐवजी पक्षाला बांधिल असतात. सर्वात पहिले कॉंग्रेसनेच या नालायकीची सुरूवात केली. राज्यपालांच्या हस्ते राजकीय उचापती करण्याची परंपरा त्यांनीच निर्माण केली आहे.

हे जरी खरे असले तरीही कोश्यारी ज्या थराला जात आहेत त्या थराला आजवर कुणीच गेले नाही. राजभवनात बसून कोश्यारींच्या राजकीय उचापती जोमात सुरू आहेत. खरेतर भगतसिंह कोश्यारी या उचापती करत आहेत असे वरकरणी दिसत असले तरी ते फक्त चेहरा आहेत. ख-या अर्थाने या सगळ्या भानगडी, उचापती आणि कट-कारस्थानं देवेंद्र फडणवीस, चंदू पाटील आणि त्यांची सोनेरी टोळी करते आहे. जे सुरू आहे ते खुपच हलकट प्रकारात मोडणारे आहे. देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद गेल्यापासून हा माणूस निखळपणे हसताना एकदाही दिसलेला नाही. त्यांना प्रचंड नैराश्य आले आहे आणि याच नैराश्यातून ते असल्या हलकट उचापती करताना दिसत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना ते प्यादं म्हणून वापरत आहेत.

कोश्यारींच्या आडून देवेंद्र फडणवीस यांचेच हे खेळ चालू असावेत असा दाट संशय येतो आहे. सरकार स्थापन करते वेळीही या माणसाने पहाटे पहाटे फडणवीसांना शपथ दिली. त्यांनाच पुरक काम केले. विरोधी पक्षांची सत्ता स्थापन होवूच नये यासाठी आडकाठी आणली. दुसरे सरकार शपथ घेते वेळी हा माणूस शपथ घेणा-या मंत्र्यांना नियमाची व संविधानिक तरतुदींची आठवण करून देत होता. स्टेजवरच मंत्र्यांना झापताना दिसत होता. आज हाच माणूस त्याच घटनात्मक चौकटीचा भंग का करतो आहे ? हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. या सगळ्याचा बाराकाईने विचार केला तर या सगळ्या उचापती देवेंद्र फडणवीस करत असावेत अशी शंका येते. फडणवीस इतक्या खालच्या थराला जातील असे वाटले नव्हते. पण सत्ता गेल्याच्या नैराश्यातून ते सर्व करत असावेत असे वाटते. कोश्यारी राज्यपाल आहेत.

हे पद घटनात्मक चौकटीची जबाबदारी बाळगणारे आहे. राज्यपाल कोश्यारींनी उध्दव ठाकरेंना पत्र लिहीताना जी भाषा वापरली आहे ती संविधानावरच हल्ला करणारी आहे. मंदिराच्या आडून धार्मिक राजकारणाला फुस लावणारी आहे. या प्रकाराचा निषेध करावाच लागेल. मंदिराची उठाठेव करणा-या कोश्यारींना व त्यांच्या फडणवीस नावाच्या बापाला राज्यातल्या शेतक-यांचे, कामगारांचे आणि बेरोजगारांचे प्रश्न दिसत नाहीत का ? या सर्वांच्यापेक्षा त्यांना दानपेटीवर पोसलेल्या भटांचीच चिंता जास्त लागली आहे की काय ? हिंदुत्वाचा पुरस्कार करणा-या शिवसेनेची आणि उध्दव ठाकरेंची अडचण व्हावी, समाजात धार्मिक तेढ निर्माण व्हावी या उद्देशानेच कोश्यारींनी गरळ ओकली आहे. ही गरळ कोश्यारींच्या तोंडातून आली असली तरी ती फडणवीसांच्या सुपिक डोक्यातून आली असण्याची शक्यता अधिक आहे. महाभारतात शिखंडीच्या आडून जसे युध्द लढले गेले तसे सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्या वेळचा शिखंडी पातळात होता आणि आताचा शिखंडी धोतरात आहे इतकाच काय तो फरक दिसतो.

देवेंद्र फडणवीसांनी हे सगळे हलकट राजकारण आणि उचापती आवराव्यात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या माध्यमातून चालवलेले माकडचाळे बंद करावेत. ते स्वत: मदारी झालेत आणि कोश्यारींचे त्यांनी माकड केले आहे. माकड ते माकडच असते. त्याला योग्य अयोग्य काय कळणार ? मदारी नाचवेल तसे ते नाचणारच. त्यात सत्तेची आणि अधिकाराची दारू प्यायलेले असेल तर ते अधिक बेफाम झाल्याशिवाय कसे राहिल ? सध्या नेमके असेच घडते आहे. कोश्यारींच्या या माकडचाळ्यांची इतिहासात नक्की नोदं होईल.

कोश्यारींच्या माकडचाळ्यांची जशी इतिहासात नोंद होईल, त्याचप्रमाणे ती देवेंद्र फडणवीसांच्या खुज्या व संकुचित राजकारणाचीही होईल. फडणवीसांनी मध्यंतरी मी “ब्राम्हण” जातीचा आहे म्हणून मला त्रास दिला जातोय असे बोलून दाखवत जातीयवादी पिचकारी मारली होती. या राज्यात मनोहर जोशी हे ही ब्राम्हण मुख्यमंत्री होवून गेले पण त्यांची जात ना त्यांना स्वत: ला आठवली ना लोकांना आठवली. पण गेल्या पाच-सहा वर्षात फडणवीसांचे चमचेही तेच बोलत होते आणि ते स्वत:ही तेच बोलले. मुख्यमंत्रीपद गेल्यापासून त्यांनी जे राजकारण केले आहे ते सगळे रडीच्या डावात मोडणारे आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी अधिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. पण ते पक्षातल्या चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या चेल्या-चमच्यांना घेवून राजकीय कट-कारस्थानं करण्यात व्यस्त आहेत. यातून ते अधिकाधिक लोकांच्या मनातून उतरत आहेत. त्यांच्या आजूबाजूचे चेले-चपाटे त्यांना हे सत्य सांगणार नाहीत. पण फडणवीस महाराष्ट्राच्या मनातून झपाट्याने उतरू लागलेत हे सत्य आहे. कॉग्रेस-राष्ट्रवादीतली भानगडबाज, भ्रष्ट पिलावळ दावणीला आली म्हणजे सर्व जनता मागे आली असे होत नाही. फडणवीसांनी आत्म चिंतन करायला हवे. नैराश्यातून चालवलेल्या हलकट उचापतींचे खेळ त्यांनी आटोपते घ्यावेत. ते वेळीच शहाणे नाही झाले आणि राजभवनाच्या माध्यमातून चालवलेले माकडचाळे आवरले नाहीत तर राज्यातली जनता त्यांना योग्य तो धडा नक्की शिकवेल.