कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती वर प्रशासकीय संचालक मंडळ नेमण्याच्या हालचालींना आला वेग

37

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.24ऑक्टोबर):- तालुक्यातील कुंडलवाडी
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती वर लवकरच अशासकीय प्रशासकीय संचालक मंडळ नेमण्यात येणार आहे. याबाबत प्रशासनाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. सभापती,उपसभापतीसह १७ संचालक मंडळाची अंतिम यादी तयार करण्यात आली असून लवकरच याची घोषणा होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती ही तालुक्यातील फार जुनी समिती असुन १९५१ साली स्थापना झाली आहे. सन २००२ वर्षी विभाजन करून बिलोली कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली. कुंडलवाडी बाजार समितीत पुर्वी ४५ गावे समाविष्ट होती.त्यानंतर यातील ८ गावे धर्माबाद बाजार समितीला जोडण्यात आली.

सद्यस्थितीत या बाजार समितीत ३५ गावांचा समावेश आहे. सद्याची बाजार समितीची परिस्थिती पाहता आर्थिक डबघाईला आली आहे. गत चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे पगारी झाले नाहीत.त्यातच केंद्र शासनाच्या नविन कृषी धोरणामुळे बाजार समित्या उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

येथील बाजार समितीची शेवटची निवडणूक २००८ साली झाली होती.त्याचा कार्यकाळ २०१४ ला संपुष्टात आला होता.पण तत्कालीन सरकारने दोन वर्षाची मुदतवाढ दिली होती. यानंतर २०१६ ला एक वर्ष प्रशासकाची नेमणूक होती.त्यानंतर १४ आँगस्ट २०१७ ते ७ जानेवारी २०२० पर्यंत प्रशासकीय अशासकीय मंडळाची नेमणूक करण्यात आली होती. आता पुन्हा वरिष्ठ पातळीवर प्रशासकीय संचालक मंडळ नेमण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

याबाबत आ.रावसाहेब अंतापुरकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांना संचालक मंडळ नेमण्यासाठी यादी सुद्धा पाठवली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे ही यादी पाठवुन दिली आहे. पणन विभागाकडून ती यादी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सुद्धा प्राप्त झाली.

असल्याची माहिती असुन लवकरच प्रशासकीय अशासकीय संचालक मंडळाच्या नियुक्तीची घोषणा होणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांद्वारे मिळाली आहे. या नियुक्तीत महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांना समान संधी देण्यात येणार असुन प्रशासनाच्या पातळीवर याबाबत वेग घेतला असल्याचे दिसून येत आहे.