अशी पाखरे येती

31

दिवसामागून दिवस निघून जातात. महिने-महिने करत वर्ष ही जाते. अनेक वर्ष होतात. माणसाच्या आयुष्यात, वेगवेगळ्या वळणावर, वेगवेगळी माणसे येतात आणि जातात. याच अनेक माणसांमध्ये काही माणसं हृदयाच्या तळापर्यंत पोहोचतात. काहीचा सहवास हवाहवासा वाटायला लागतो. काही मात्र क्षणभराच्या सहवासासाठी ही नको वाटतात. अनेक माणसे, अनेक स्वभाव. ‘मूर्ती तितक्या प्रवृत्ती.’ प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार. माणसं आणि त्यांचा स्वभाव आवडण्यासाठी किती क्षणाचा सहवास अपेक्षित असतो…? हे निश्चित सांगता येत नाही. कुणाचा क्षणभराचा सहवास ही सुखावून टाकतो. कायम स्मरणात राहतो.

 

हा स्नेह वंचना की,

काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी….

मी रिक्तहस्त आहे

 

कोण कोणासोबत किती काळ राहीले…? याला फारसं महत्त्व नसतं. तर त्याच्या असण्याने, त्याच्या वागण्याने-बोलण्याने माणसाच्या मनावर किती खोलवर परिणाम झाला. हे महत्त्वाचं असतं. कोणताच माणूस चांगला किंवा वाईट नसतो. ती आपली संकल्पना असते. तो आपला दृष्टिकोन असतो. त्याच्या वागण्या-बोलण्याचे पडसाद असतात. सगळीच माणसं, सगळ्याच परिस्थितीत, सारखी वागत नाहीत. तसंच प्रत्येक माणूस प्रत्येकाशी सारखा वागत नाही. व्यक्ती-व्यक्तीनुसार, विविध घटकानुसार, त्याचं वागणं-बोलणं बदलत असतं. माणसाचा स्वभाव वस्तुनिष्ठ नसतो, तर व्यक्तिनिष्ठ असतो. म्हणूनच एकाच माणसाबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात.

 

काटा रुते कुणाला,

आक्रंदतात कोणी
मज फूल ही रुतावे…..

हा दैवयोग आहे

बारीक-सारीक प्रत्येक गोष्टींचा हिशोब आपण ठेवतो. ईश्वराने दिलेल्या ‘अमूल्य भेटी’चा हिशोब आपण ठेवत नाही. खरंतर ईश्वराची ‘अमुल्य भेट’ म्हणजे आपलं ‘जीवन’. ते वारेमाप पद्धतीने आपण उधळत असतो. ‘टाईमपास’ या नावाखाली वाट्टेल ते करतो. कधी विचारच करत नाही की, आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण किती महत्त्वाचा आहे. दिवसा दिवसांनी संपत जाणारी गोष्ट म्हणजे आयुष्य. प्रत्येकाचेच आयुष्य मर्यादित आहे. मर्यादित आयुष्यात जेवढं चांगलं वागता येईल, तेवढं वागलं पाहिजे. जेवढे भरभरून बोलता येईल, तेवढं बोललं पाहिजे. साधं-साधं, सोपं- सोपं, सरळं-सरळं, जीवन जगलं पाहिजे. विनाकारण गुंतागुंत वाढवायची नाही, जेवढे गुंते सोडवता येतील तेवढे सोडवायचे. काही समस्या सुटत नाहीत… तिथे विनाकारण वेळ वाया घालवायचा नाही. आयुष्यात अनेकांच्या स्मरणात राहू, असं जीवन जगायचं.

 

हसून पहावं, रडून पहावं.

जीवनाकडे माणसाने डोळे भरून पाहावं…

काहीतरी द्यावं, काहीतरी घ्यावं

आपण गेल्यावर….

आपली नाव कोणीतरी काढावं…

 

एवढं तरी चांगलं जीवन आपण नक्कीच जगायला पाहिजे. आपल्या अनुपस्थितीत आपलं नाव काढल्याने कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू यावं. आपण गेल्यावर चार माणसांच्या तरी डोळ्यात पाणी यावं.. शेवटी औटघटकेचे राज्य आहे. कधीतरी जाणार…. म्हणून जमेल तेवढे चांगलं वागा.

माणसाला माणसाच्या आयुष्यात कशाची भुरळ पडेल. हे त्याचं त्यालाही माहीत नसतं. म्हणून तर माणसं वहावत जातात. तरीसुद्धा ते आपल्या भ्रमात असतात. प्रवाहासोबत वाहत असले, तरी “माझ्यामुळेच हा प्रवाह आहे.” हा भ्रम असतो. प्रवाह ओसरल्यावर कळतं, आपल्यामुळे प्रवाह नव्हता. आपण प्रवाहासोबत होतो. हे कळल्यावरही, माणसं जागी होतातच, असं नाही. पुन्हा दुसऱ्या प्रसंगातही ते तसेच वागताना दिसतात. हाच खरा ‘मनुष्य स्वभाव’ आहे. पुन्हा-पुन्हा चुका होऊ नयेत, म्हणून माणसाने घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाकडून, घटनेकडून काहीतरी शिकलं पाहिजे.

कोणती माणसं आपल्या आयुष्यात यावीत, येतील. किती दिवस एकमेकांचा सहवास लाभेल….? हे सगळं सुनिश्चित असतं. तेवढेच दिवस आपण एकमेकांच्या संपर्कात येतो. एकमेकांशी संवाद साधतो. विचारांची देवाण-घेवाण करतो. सुनियोजित दिवशी पुन्हा वेगवेगळ्या रस्त्याने प्रवास सुरू करतो. सोबत राहतात, त्या फक्त आठवणी. त्या एकमेकांची शेवटपर्यंत सोबत करतात. ह्या आठवणी कुणी सांगतो, तर कुणी अजिबात सांगत नाही. याचा अर्थ असा नाही त्यांना काही आठवतच नाही. याउलट असंही असतं…. त्या आठवणींनी त्यांचे मन आजही विचलित होत असतं. म्हणून ते घाबरत असतात त्या आठवणींना… त्या आठवणीतल्या दिवसांना. अर्थात आठवणीसोबत असणाऱ्या त्या माणसाला…..

खरं तर काहीच कारण नसेल, किंवा काही घडलेच नसेल, तर त्याविषयी बोलायला काय हरकत आहे. ज्याअर्थी आपण तो विषय, ती व्यक्ती टाळण्याचा प्रयत्न करतो…. त्याअर्थी त्या विषयाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार असतात. अनेक प्रकारच्या भावना, संवेदना असतात. आजही त्यांना तेवढेच महत्त्व असतं. म्हणून आपण टाळत असतो त्या आठवणींना… आठवणीतल्या व्यक्तींना….

बऱ्याच वेळी बोलण्यामुळे होणाऱ्या जखमेपेक्षा, अबोल्याने झालेल्या जखमा अधिक त्रास देतात. एखाद्या माणसासोबत आपण बोलतो… यामागे जेवढे प्रेम, आपुलकी, माया, जिव्हाळा असतो त्याहीपेक्षा ज्या माणसासोबत आपण अबोला धरतो त्यामध्ये या सर्व भावनांचा जास्त समावेश असतो.

 

काही करु पहातो,

रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणे ही…..

विपरीत होत आहे

जसं विनाकारण आपण कुणाला भेटत नाही; तसं विनाकारण आपण कुणाला टाळतही नाही. भेटण्याला जेवढं महत्त्व असतं; त्याहीपेक्षा जास्त महत्त्व टाळण्याला असतं. या सगळ्या भावना आपल्याला अपराधीपणाची जाणीव करून देत असतात. आपल्या चुकांची, आपण केलेल्या अन्यायाची जाणीव करून देतात. समोरच्या निरागस माणसाला आपण कसं फसवलं….? याची आठवण देतात. पैसा, प्रतिष्ठा आणि व्यवहार यापेक्षा भावना फार महत्त्वाच्या असतात. ते आज कळत असतं. आपली ‘मतलबी भूमिका’ आज ध्यानात आलेली असते. खरंच आपल्या मनात काही नसेल तर आपण खूप मनमोकळेपणाने वागतो.

मनात खोलवर रुजलेल्या अशा जखमांवर कितीही पट्टी बांधली. अशा जखमा कितीही झाकल्या, तरी त्या वेदनाच देतात. जखम असणाऱ्यांना तो दाह कायमच राहतो. जखमेची ठसठस तशीच राहते. त्या आठवणींच्या जखमांवर फक्त आठवणीतलाच माणूस मलम लावू शकतो, फुंकर घालू शकतो. आपण कितीही सुखात असलो. तरी ते सुख त्या माणसाकडे अभिव्यक्त केल्याशिवाय अपूर्ण असतं. अशीच माणसाच्या आयुष्यात आलेली, आणि कायम घर करून गेलेली माणसं… कितीही दूर असली, तरी ती आठवणीच्या रूपात आपल्या सोबत असतात. त्यांचे हे अमूर्त वास्तव्य आपण जपायचं. फक्त कुठल्याच आठवणींची ‘जखम’ होऊ द्यायची नाही..

 

सांगू कशी कुणाला…?

कळ आतल्या जिवाची
चिरदाह वेदनेचा….

मज श्राप हाच आहे.

 

याउलट या आठवणींचं बळं निर्माण करायचं. आठवणींना आणि आठवणीतल्या माणसांना कायम स्मरणात ठेवायचं. मात्र एकमेकांच्या चुका विसरून जायचं. माणसं म्हटली की, चुका होणारचं. त्या चुकांना आज काहीच अर्थ नसतो. दोघेही एकमेकांच्या जीवनात सुखी असतात. उगीच त्याच-त्याच गोष्टी उगाळत बसण्यात काहीच अर्थ नसतो. भरभरून बोलुन मन मोकळं करून टाकायचं. मनसोक्त हसायचं. कुणाचं कुणावर किती प्रेम होतं…? याला आज काहीच अर्थ नाही. आजच्या आयुष्यात आपण सुखी आहात का…? हेच महत्त्वाचं आहे. आठवणींना जपा…..आठवणी ताज्या करा…. आणि मनापासून म्हणा… “अशी पाखरे येती… आणिक स्मृती ठेवुनी जाती… दोन दिसाची रंगत-संगत…. दोन दिसाची नाती….”

✒️लेखक:-श्री. मयूर मधुकरराव जोशी(ग्रीन पार्क, जिंतूर. जिल्हा परभणी)मो:-9767733560,7972344128