राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाचे भव्य धरणे आंदोलन

28

🔸डीबीटी योजना बंद करण्याची मागणी

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.7नोव्हेंबर):-राष्ट्रीय आदिवासी छात्रसंघाद्वारे तहसील कार्यालयासमोर डीबीटी योजना बंद करण्यासहीत विविध मागण्यांसाठी भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.
२०१५-१६ पूर्वी आदिवासी विद्यार्थ्यांना वस्तीगृहा मार्फत शैक्षणिक सोयीसुविधा, निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था मिळत होत्या. परंतु २०१५-१६ मध्ये महाराष्ट्र सरकारने यात बदल करून डीबीटी योजना सुरू केली.

या योजनेनुसार वरील सोयीसुविधा वसतिगृहा मार्फत देण्याचे बंद केले व सदर सुविधांसाठीची लागणारी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची योजना सुरू केली. परंतु या योजनेत अनेक त्रुटी आहेत. एक तर सदर रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वेळेवर जमा होत नाही .तसेच प्राप्त रक्कमेत सदर सोईसुविधांची पूर्तता होत नाही. तसेच खऱ्या व गरजू लाभार्थ्यांना रक्कम पोहोचू शकत नाही.

त्यामुळे अनेक विद्यार्थी पैशाअभावी आपल्या शैक्षणिक गरजा वेळेवर पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत खंड पडून त्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. वसतिगृह मार्फत चालणाऱ्या खानावळी बंद झाल्यामुळे सकस आहार मिळत नाही. अशा त्रुटी पूर्ण योजनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक व आरोग्यविषयक नुकसान होत आहे.

त्यामुळे शासनाने डीबीटी योजना बंद करून पूर्वीची वस्तीगृहामार्फत चालणारी यंत्रणा पूर्ववत सुरू करावी. यासोबतच थकीत डीबीटीची रक्कम त्वरित अदा करावी, विद्यार्थ्यांची नूतनीकरणाची प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन राबवावी, मागील शिष्यवृत्तीची थकबाकी रक्कम त्वरित अदा करावी, कॉलेजची फी एकरकमी न घेता त्यांना त्यांच्या सवलती प्रमाणे फी भरण्याची मुभा द्यावी आदी विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

तसेच या सर्व मागण्यांचे निवेदन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माननीय उपविभागीय अधिकारी पुसद मार्फत देण्यात आले. राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाने वरील मागण्यांसाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात धरणे आंदोलनाची घोषणा केली होती. त्याप्रमाणे पुसदसह सर्व ३६ जिल्ह्यात हे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव, दारव्हा या तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी विद्वान केवटे राज्य कार्याध्यक्ष (भारतीय विद्यार्थी मोर्चा) शिवाजी मळघणे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी छात्रसंघ पुसद) ऋषिकेश देवसरकर (राज्य उपाध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा) कुलदीप देवसरकर, विकास गावंडे? समाधान पंडागळे, आत्माराम शेळके, ज्ञानेश्वर ढाकरे, गजानन बोडके, सिद्धेश्वर मुकाडे, रामदास टारफे राजेश डाखोरे, हनुमंत पारधी, राजेश झांबरे, विकास झांबरे, श्रीरंग वानोळे, अविनाश वाळके सहीत शेकडो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.