बाळासाहेब आंबेडकरांच राजकारण आणि त्याग मांडणारा गायक, शाहिर पुढे येईल का ?

36

१९३५ साली येवला मुक्कामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा होती. त्या सभेत बाबासाहेब स्टेजवर येण्यापूर्वी जलसाकार भिमराव कर्डक यांचा संच जलसा चालू होता. त्यावेळी बाबासाहेब भाषणात म्हणाले, ” माझ्या चार भाषणाची बरोबरी भिमरावांचा एक जलसा करतो एवढी ताकत आह भिमरावांच्या गितांमध्ये.पुढे बाबासाहेबांच्या विचारांची, चळवळ शाहिरिच्या माध्यमातून बळकट करण्यासाठी भिमराव कर्डक यांच्यासह भाऊ फक्कड ,सेवादास शाहीर, केसूबुवा घेगडे,केरुबुवा गायकवाड ,भिमराव आडागळे अर्जुन हरी भालेराव, केशव सुखा आहेर या मंडळींनी स्वतःच्या घरची मीठ भाकरी खाऊन बाबासाहेबांचा विचार जनमाणसात पोहोचवला आहे.

पुढे १९५६ नंतर म्हणजेच महापरीनिर्वाणा नंतर ही आंबेडकरी चळवळ गतिमान झाली पाहिजे यासाठी मोठमोठ्या चित्रपटासाठी आलेल्या संधी नाकारून महाकवी वामनदादा कर्डक यांनी ही प्रबोधनाची चळवळ जिवंत ठेवत पुढाकार घेतला कुठेही स्वतःची विक्री होऊ दिली नाही स्वतःकडे प्रचंड मोठी प्रतिभा असून सुद्धा वैचारिक बांधिलकी जोपासली त्यांच्या सोबतच जंगम स्वामी,राजानंद गडपायले, बी कासिनंदा,गोविंदा म्हशिलकर, हरेंद्र जाधव,विठ्ठलशिंदे,विठ्ठल उमप,सांतरामनांदगावकर, विश्वनाथ भोसले, कृष्णा शिंदे, लक्ष्मण केदार, विजयानंद जाधव, समदुर सारंग, प्रतापसिंग बोदडे, प्रभाकर पोखरीकर, बाबुराव जाधव, यांच्या सारख्या सच्चया वारसदार शाहिरांनी या चळवळीला कलंक न लावता ही विचारधारा कायम जपली.

या सगळ्या कार्यकाळात कौटुंबिक जीवनात या मंडळींना आर्थिक अडचणींना अनेकदा तोंड दयावे लागले. वामनदादांच तर सूत्र सरळ होत आपल्या पोटाला लागेल तेवढे खायला मिळाले तरी चालेल पण. इमल्यावर इमले चढवण्यासाठी ब्राह्मणवाद्याच्या आणि भांडवलदारांच्या स्टेजवर जाणार नाही , म्हणूनच देशभरातील आंबेडकरी समाजाच्या घरात वामनदादांचा फोटो सापडतोच. १९८० च्या दशकात महाराष्ट्रात एड. बाळासाहेब आंबेडकरांनी राजसत्ता सर्वसामान्य लोकांच्या घरी नेण्यासाठी अकोल्यातून विविध प्रयोग सुरू केले. त्या प्रयोगात सुद्धा जलसाकार लोककलावंत कुठेही मागे नव्हते.त्यात सुद्धा शाहीर दिनबंधू गुरुजी, वसंतदादा मानवतकर, नागसेन सावदेकर, देवा अंभोरे,मधुकर इंगळे, लुकमानशा प्रतापसिंग बोदडे,सत्यपाल , शाहिर भगवान गावंडे , डॉ विलासराज भद्रे, रविंद्र गवारगुरू,डी आर इंगळे,विजय मांडकेकर, रत्नमाला गवई,विजय सातोरे यांच्यासारखी मंडळी पुढे आली.

मागील काही वर्षापासून कार्यक्रम भीमजयंतीचा, कार्यक्रम स्थळ आंबेडकर वस्ती किंवा परिसर, आयोजक भीमसैनिक श्रोतावर्ग भीमसैनिक, वर्गणीदार भीमसैनिक, गायक भीमसैनिक, आणि उद्घाटक काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजपची घराणेशाही, पोसनारी ब्राह्मणवादी भांडवलवादी आणि रोमारोमात जातीवादाच बीजारोपण झालेलं असतं. अशी उद्योजक नेते मंडळी असते. मग भीमसैनिक गायक त्यांची स्तुती करतात, आयोजक त्यांच्या पाया पडतात, श्रोते-माहिला टाळ्या वाजवतात हे चित्र आंबेडकरी चळवळीत काम करणार्‍या प्रामाणिक कार्यकर्त्याला गंभीर आणि अस्वस्थ करणार असतं. असं वामनदादा कर्डक किंवा भीमराव कर्डक यांच्या कार्यकाळात झालं होतं का ? आमच्या बापाच्या जयंती च्या कार्यक्रमात आमच्या श्रमाच्या पैशांनी उभा केलेल्या कार्यक्रमात आमच्या वस्तीतील कार्यक्रमात या मनुस्मृतीच्या समर्थकांना आम्ही उरावर का घेतो ?यांच्या साठी गायकांनी कार्यक्रमाची तारीख का द्यावी ? हा प्रश्न माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पडतो.

व्यवसायीक गायक कलावंत आणि चळवळीशी बांधिलकी जपणारा गायक, कलावंत कोण यातील फरक कार्यक्रमाचे आयोजक आणि गायक, शाहिर , कलावंत यांना समजु नये. म्हणजे किती मोठा धोका म्हणावं ?
यावर आपण चिंतन करणार आहोत की नाही ? जर हे संविधान संपविणारी भांडवलवादी नेते आंबेडकरी समूहांना जवळचे वाटत असतील तर काय समजायचे ? भाजप आणि काँग्रेस कधीच वेगळे नव्हते आणि नाहीत.त्यांना खरंच बाबासाहेबांचा आदर आहे असं वाटतं असेल तर मग यांनी पक्षाच्या वतिन कधी जयंतीचा कार्यक्रम घेतला का ? आपल्या समूहाला या पक्षांनी नगरसेवक, जी. प.सदस्य याच्या पलीकडे येऊ दिले नाही. ही वास्तविकता आपण का विसरतो ?
ज्या भारतीय जनता पार्टीने संविधान संपून. हिंदूराष्ट्र निर्मितीची ची भूमिका घेतली.

संसदेच्या परिसरात संविधान जाळले.त्यावेळेस सत्तेचा अविभाज्य घटक शिवसेना सुध्दा होतीच न ! संसदेच्या परिसरात संविधान जाळणार्या भाजप सोबत जाऊन भल्या पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन केले होतेच न ! संविधान जाळताना शिवसेना भाजपच्या सत्तेत होतीआणि त्या शिवसेनेचच उष्ट काॅंग्रेस खातच आहे. यावर आंबेडकरी कलावंतांनी विचार करणे गरजेचे आहे .अशी अपेक्षा करणे स्वाभाविक आहे.सत्तेत भाजप आहे काय अन् महाविकास आघाडी आहे काय ? आमच्या जगण्या मरण्या वर काहीही परिणाम नाही. ज्या दिवशी या देशात शिक्षणाचे खाजगीकरण करून. शिक्षण सम्राट निर्माण केल्या गेले त्याच दिवशी संविधान संपवण्याची पहिली पायरी पूर्ण झाली.कारण तुम्हाला शाळा- कॉलेज मध्ये प्रवेश घेण्याकरिता मुख्याध्यापक- शिक्षणा अधिकाऱ्याकडे जाण्याऐवजी संस्थाचालकांना मुजरा करावा लागतो. तिथेच सर्व संपलं. कुठे आहे शिक्षण मोफत आणि सक्तीचे ? भारतीय लोकशाहीचा खुण करून संविधान जाळणारे भाजप-काॅंग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी या ब्राह्मणवादी आणि भांडवलवादी पक्षांच्या स्टेजवर आंबेडकरी शाहिर ,गायक गातात तेव्हा मन अस्वस्थ होतं.

परंतु या सगळ्या सम्राटांना लगाम घालून वंचितांच्या हातात सत्ता देण्यासाठी अँड बाळासाहेब आंबेडकरांनी जो स्वत:सत्तेचा त्याग स्विकारला, जे समुह राजकीय अस्पृश्य होते त्यांना संधी उपलब्ध करून देत वंचित चा जाहीरनामा प्रकाशित केला. की, आमची सत्ता आल्यास kg ते Pg शिक्षण मोफत करू, किमान वर्षाला १५ लाख रुपये मिळतील असा रोजगार मिळवून देणार दर्जेदार शिक्षण देऊ अशी ऐतिहासिक भूमिका घेणारे बाळासाहेब आपल्या गायकांना महत्त्वाचे का वाटत नाहीत ? त्यांना अजूनही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपच तारणहार का वाटतात ? ही गायक मंडळी वामन दादाची तर बहुदा गाणी गातात, मग यांना समजत नाही का ? वामनदादानी कुणाचे जोडे उचललेले होते का ? मग यांना वामनदादा चं गाणं गाण्याचा नैतिक अधिकार आहे का ? अशी अनेक प्रश्न उभे राहतात.

ज्या गायकांचा मोठ्याप्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादी भाजप-सेनेच्या मंडळीने वापर करून घेतला. प्रचंड पैशाचे आमिष दाखवून आपल्याकडे वळवले. बाबासाहेबांच्या जयंतीच्या अनुषंगाने तर हे लोक वापरतात पण अनिरुद्ध वनकर सारख्या प्रतिभावान आणि जनाधार असलेला गायक तर नांदेड मनपा निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते थेट.”आता कुणाला चिड यायला पाहिजे” ?याचा अर्थ काय ? बर त्यांना हे सगळं माहित आहे २०१४-आणि २०१९ला बाळासाहेबांचे उमेदवार सुद्धा होते . तरी पण अशोक चव्हाण जवळचे का वाटतात ? हा प्रश्न मी जरी विचारला असेल तरी पण हा प्रश्न जागरूक आंबेडकरवाद्यांना दररोजच पडतो .ते नांदेडमध्ये विनोदाने म्हणतातही ‘कशाचा वादळवारा? हा तर अशोक चव्हाणचा गदळवारा आहे’.

आज जयंती त्या निमित्ताने यावर आपण विचार करणं गरजेचं आहे.पैसे मिळाले की देवी-देवतांचे वर्तवैकल्याची गाणी म्हणणारी माणस कोणता आंबेडकरवाद रुजवणार आहेत? खिशात काँग्रेसच्या पैशाचे पाकीट घेऊन भाजपला शिव्या देत कोणता आंबेडकरवाद रूजवणार आहेत ? आंबेडकरी चळवळ हे ब्राह्मणवाद आणि गांधीवादाची आर्थिक गुलामगिरी करणे शिकवत नाही.

कलावंताचे दोन भाग व्यवसायिक कलावंत आणि चळवळीचा कलावंत.व्यावसायिक कलावंतांना कोणत्याही बाबतीची बंधन नसतात.कोणाच्याही स्टेजवर, कोणतीही गाणी,कितीही रुपये ते घेऊ शकतात. लाखानं रुपये मिळत असतील तर पार मुळव्याध बाहेर येईपर्यंत कोणाचंही गुणगान गातात,कसलही नाटक करतात.कारण त्यांच धैय अमाप पैसा कमविणे असते. पैसा आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी” ते ” आपण किती कट्टर आंबेडकरवादी आहोत हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही टोकाला जातात. पार बाबासाहेब,रमाई, आणि जमेल तितक्या महामावांना जनु काय हे सकाळ संध्याकाळ फोन वर बोलुनच आपलं ‘मनोरंजन’ करतात.अशी मोठी गायक मंडळी आपल्या इमारतीच्या इमल्यावर इमले चढवण्यासाठी कट्टर आंबेडकरवाद काॅंग्रेस , राष्ट्रवादी,भाजप, शिवसेना आणि तस्सम विचारधारेच्या स्टेजवर येथेच्छ गाणी गातात आणि बाबासाहेबांच भांडवल करून निव्वळ नफा मिळवितात.

चळवळीचा कलावंत म्हणजे जो गाव गाड्यात फक्त चहा पाण्यावर राञभर बाबासाहेबांचा जिवण संघर्ष सांगतात.आपल्या मिळेल तेवढे मानधनात चळवळ बळकट करण्यासाठी स्वत: वाटेल तसा संघर्ष पत्करतात.कारण त्यांच धैय विषमतावादी व्यवस्था बुडापासुण उखडून फेकणे असते. म्हणुन ते वामनदादा कर्डक यांचा वसा चालवतात.या विषयावर काही गायक मंडळीशी मी चर्चा केली आणि त्यांना विचारलं असं का तर त्यांनी सांगितले दोन महिने गायचं आणि १२ महिने जगायचं परत संच सांभाळायचा म्हणून आम्हाला असं करावं लागतं. एका गायक मित्राने याचे उत्तर दिले आम्हाला जगायला आणि जीवनमान उंचवायला जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे आंबेडकरवादी समाज आम्हाला केव्हाही देतो.

आम्ही जर प्रामाणिकपणे विचारधारा सांगत असेल तर आम्हाला बाबासाहेबांचा समाज काही उपाशी मरु देणार नाही. यावर आमचा विश्वास आहे.त्यामुळे आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादी सेना-भाजप वाल्याकडून भाड खाण्याची आवश्यकता नाही. आमच्या कलेचा उर्जास्त्रोत बाबासाहेब आणि प्रेरणा वामनदादा असेल तर
आम्हाला कशाचीही कमतरता पडत नाही. आणि दान करणाऱ्या परंपरेत सर्वात पहिला नंबर आंबेडकरी समूहाचा आहे. म्हणून आम्ही चिंता करत नाही.अंन गांधीवादी ब्राह्मणवादी लोकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची तारीख सुध्दा घेत नाही. आम्हाला आमच्या इमारत आणि श्रीमंतीचा थाट बघायचा नाही तर आंबेडकरी चळवळ भक्कमपणे स्वतच्या मतांवर सत्तेत गेलेली बघायची आहे.आम्ही बांडगुळ नाही कि या .पांढरपेशांच्या पैशावर आमचं भवितव्य उज्वल होईल म्हणून. आमचा बाबासाहेबांच्या विचारांवर आणि समाजावर विश्वास आहे. तेच आमचं बळ आहे.

डाँ . बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक अस्पृश्यता संपण्यासाठी संपूर्ण आयुष्य घातलं.अगदी त्याच प्रमाणे. बाळासाहेब आंबेडकरांनी राजकीय अस्पृश्‍यता संपण्यासाठी आपलं स्वतःचं आयुष्य पणाला लावलं हे आपण समजून घेतले पाहिजे ( गायकांनी ) सातत्याने लोकसभेत पराभाव पतकारला व पचवला पण या संविधान संपवणार्यां पुढे गुडघे टेकविले नाही. परत चिंतण केले, संघटना बांधली आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे वंचितांना सत्तेत घेऊन जाण्यासाठी जीवाचं रान केलं. हा त्याग आपल्याला का दिसत नाही ? एक राजू शेट्टी जुळवाजुळव करून स्वतःच्या पक्षाकडून सतत खासदार होतो तर स्वतःसाठी बाळासाहेब स्वाभिमानाने जुळवाजुव करून खासदार होऊ शकले नसते का ? परंतु बाळासाहेब म्हणतात ,’मी एकटा नको त्या लोकांशी हातमिळवणी करून खासदार होण्यापेक्षा ” जिसकी जितणी संख्या भारी, उसकी उतणी भागीदारी,अगर नहीं भी होंगी संख्या भारी तो भी मिलेगी भागीदारी” या सुञावर आधारीत स्वाभिमानाचं राजकारण करायचं.

ज्यांना राजकीय अस्पृश्य ठेवत आहात त्यांना घेऊन सत्तेत जातो.खुल्या पदावर बौद्ध सामाजाला जिल्हा परिषद अध्यक्ष करणारा देशातील पहिला नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर,नाभिक समाजाचे अवघे दोनच मत असतांना सुध्दा नाभिक समाजाच्या सौ.साधनाताई इंगळे यांना तेल्हारा नगरपरिषद मध्ये पाणीपुरवठा सभापती करणारे बाळासाहेब, छोट्य जातीची माणसं प्रत्यक्ष निवडणुकीत निवडून येऊ शकत नाहीत म्हणून स्विकृत नगरसेवक करणारे आणि त्यासाठी भूमिका घेऊन स्वतःच्या सर्व सुखसोयीचा त्याग करून वंचितांना सत्तेत घेण्याची लढाई लढत आहेत. हे आपण समजून घ्यावं.
५५० पेक्षा जास्त छोट्या जातींना बाळासाहेबांनी सत्तेत बसवले हा इतिहास आहे. कैकाडी, शिंपी डीवर, वडार,होलार यांना लोकसभेची तर नाभिक समाजाला विधाण परिषदेची उमेदवारी देणारा देशातील पहिला नेता बाळासाहेब आंबेडकर आपल्यासाठी लढतो असे असे आंबेडकरी गायकांना वाटत नाहीत का ? माझ्या माहितीप्रमाणे अकोल्यात शाहीर वसंतदादा मानवतकर यांनी, ” “आले किती गेले किती असे परंतु ,आम्ही नेता मानला बाबासाहेबांचा नातु.”हे गाण घेऊन या वंचिताच्या लढ्याला बळ दिले.

मग तिथून अनेक गायकांनी पुढे गाणी गायली.बाबासाहेबांचे नातू म्हणून तर आम्हाला बाळासाहेबांचा अभिमान आणि आदर आहेच परंतु बाळासाहेबां एवढा त्याग करणारा आपणास एकही नेता सध्या शोधून सापडणार नाही . वंचितांना सत्तेत पाठवण्यासाठी घराणेशाही,आणि भांडवलशाहीच्या प्रचंड मोठ्या बुरुजाला रक्तबंबाळ होईपर्यंत बाळासाहेब धडका देत आहेत. गेल्या ५० वर्षांपासून हा त्याग कशासाठी ? त्यावर आपण चिंतन करणे गरजेचे आहे.

२०१९ च्या लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाने बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पैसाही दिला अन मत हि दिलं, ४२ लाख अन् २५ लाख अशी मत देऊन वंचित बहुजन आघाडी राज्यातील वजनदार आणि महत्त्वाचा राजकीय पक्ष म्हणून समोर आणला याच सर्व श्रेय माझ्या मतानुसार महाराष्ट्रातील कष्टकरी,मजुरदार आणि कामगारांना जाते की ज्यांनी बाळासाहेबांच्या शब्दाला सर्वस्व मानलं. हे जर समाजाला कळले असेल तर गायक कलावंतांना कळले नाही का ? जर समाजाने एकजुटीचे भूमिका घेऊन या महाराष्ट्राचा इतिहास बदलला तर हा इतिहास आता सर्वात प्रथम गायकांनी जपला पाहिजे. आंबेडकरी समूहातील जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
सतत महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ सांगणारा जो गायक कवी,शाहीर, व्याख्याता, श्रद्धेने बाळासाहेबांचा त्याग आणि भूमिका आपल्या प्रबोधनातून मांडेल तोच आमचा शाहीर अन् तोच आमचा गायक बाकीच्यांना भीम जयंती मंडळाचे निमंत्रण व मानधन अजिबात मिळणार नाही.

अशी रोख-ठोक भूमिका कट्टर आंबेडकरवादयांनी घेतली तर अकोला पॅटर्न सारखा “बाळासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र पॅटर्न “उदयाला यायला वेळ लागणार नाही. यासाठी फक्त आयोजकांची ठामेठोक भूमिका गरजेची आहे, गायकाची सकारात्मकता आणि समाजाने पुढे येण्याची गरज आहे, जे जे म्हणून बाबासाहेबाचं नाव घेऊन गाणं म्हणत पोट भरतात. त्या सर्वांनी आपलं उर्वरित आयुष्य फक्त बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका समाजात पेरण्यासाठी पुढं यावं. झोकून देण्याची तयारी ठेवावी हीच अपेक्षा करतो.

‘ जर मां. काशीराम आणि बहण मायावती यांचा राजकीय जीवन संघर्ष प्रचंड ताकतिने मांडणारा राहुल अन्विकर आपली वैचारिक व राजकीय बांधीलकी जोपासत असेल तेही कोणत्याही प्रलोभनाला बळी नपडता( सध्या बोलवतील त्यांच्या स्टेजवर जातात म्हणे) तर मग आपल्यातील अनिरुद्ध बनकर किंवा तत्त्सम गायकांनी बाळासाहेबांचा त्याग, राजकारण,
आणि भूमिका मांडण्यासाठी पुढाकार घेतला तर कुठे बिघडणार ?
यावर जनाधार आणि प्रचंड प्रतिभा असणाऱ्या कलावंत शाहीर गायकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी अकोला जिल्ह्यातील एक हजार गावात जाऊन प्रबोधन करणारा तरुण आणि विद्रोही गायक आदेश आटोटे यांच्यासह प्रकाश मामा प्रधान, राजकुमार दामोदर, हितेश जामनिक, नितेश किर्तक, संजय हिवराळे ,माधुरी हिवराळे, विनय वरठे ,रवींद्र गवई, जगन मामा, ही सगळी मंडळी घरच्या भाकरी खाऊन फिरली. हा सुद्धा अलीकडचा इतिहास आहे.

पुढे वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन मेळाव्यात संपूर्ण राज्यभर कशाचीही अपेक्षा न करता छोटंसं बाळ उन्हातान्हात घेऊन. शाहीर शीतल साठे, सचिन माळी, नवयान महाजलसाची सर्व टीम, शाहीर मेघानंद जाधव, सागर गोरखे, सुवर्णा साळवे यांच्यासह अनेक जण या क्रांतीच्या महासागरात आपापल्या परीने योगदान देऊन क्रांतीचा ज्वाला पेटवत ठेवत होता.
नवयान महाजलश्याच्या माध्यमातून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जवळपास 14 ते 15 गाणी फक्त वंचित बहुजन आघाडीसाठी बनवली. यात वंचितच्या जाहिरनाम्याला मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेवून शिक्षण, बेरोजगारी, दुष्काळी भागातील पाणीप्रश्न, मुंबईतील SRA चा प्रश्न जवलंत गाण्याच्या माध्यमातून मांडला. ह्या गाण्यांनामुळे वंचित ची भूमिका लोकांना सोप्या शब्दांत गाण्याच्या माध्यमातून समजली.
लोकसभा निवडणुकीत वंचितच्या सांस्कृतिक समितीत जवळपास ८५ तरुण मुलं-मुली स्वतःचा जॉब सोडून संपूर्ण लोकसभेच्या प्रचारात उतरली होती.

वंचितच्या यशस्वी वाटचालीत मोठा वाटा उचलणारी होती . वंचितसाठी दमदार गाणी उत्कर्ष शिंदे, मिलिंद शिंदे, मधुर शिंदे, संतोष संखद , विनल देशमुख, अनिकेत मोहिते, राहुल शिंदे, रोहित जगताप या मंडळींनीसुद्धा गायीली व योगदान दिले. मधूर शिंदे आणि शीतल साठे यांनी ‘ ‘आली वंचित आघाडी हे गाणं तर महाराष्ट्राने पार डोक्यावर घेतले. मुंबईच्या सभेत लॉन्च केलं आणि पुढे पक्षाचा मुख्य गीत बनलं हा इतिहास याच महाराष्ट्राने बघितला आहे. आता वेळ आली ती हा इतिहास जतन करण्याची महाराष्ट्रात अनेक मोठी गायक मंडळी आहेत की ज्यांनी शक्य तेव्हा आणि शक्य तिथे बाळासाहेबांची भूमिका विषद करणारी गाणे गायलीत . या सर्वां कडुन एकच अपेक्षा व्यक्त करतो. निष्ठच उदाहरण म्हणून वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेबांना सोडलं नाही वसंतदादा मानवतकरांनी यांनी शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांच मांडले.

आणि राहुल अन्विकर यांनी ज्या प्रतिभा आणि निष्ठेने मा.कांशीराम आणि मायावती मांडतात अगदी त्याच ताकदीने आणि निष्ठेने बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका,त्याग आणि राजकारण मांडणारा गायक, शाहीर ,कलावंत आपल्यात निर्माण कराल हिच अपेक्षा !ज्यांना वाटते कि बाळासाहेब आंबेडकर आम्हाला सत्तेत घेऊन जाऊ शकत नाही त्या सर्वपक्षिय आंबेडकरी तरुणांना राहुल अन्विकर सांगतात…

“ये सोच भिम के बेटे
तु कदम बढा हर पल,
सपणा होगा हमारा पुरा
आज नहीं तो कल,
दिखा बहुजन का बल
दिखा बहुजन का बल “!

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मानव मुक्तीची चळवळ आणि तिचा विचार घराघरात पोहचवणारे तत्कालीन तमाम जलसेकारांना विनम्र जय भिम !
त्यांच्याच मार्गावर आपण शाहिर, गायक आणि कलावंत तथा प्रबोधणकारांनी चालण्याचा संकल्प करु या.

✒️लेखक:-गोविंद दळवी
( लेखक हे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते व प्रचारक आहेत.)मो:-९८८१२८३८०२

▪️संकलन:-नवनाथ पौळ( केज तालुका प्रतिनिधी)मो:-80809421850