राशनकार्ड धारकांनी स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल करावी

67

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.12नोव्हेंबर):-माहे नोव्हेंबर 2020 मध्ये सर्व अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांना 2 रुपये प्रति किलो प्रमाणे 10 किलो गहू, 1 रुपये प्रति किलो प्रमाणे पाच किलो मका व 3 रुपये प्रति किलो प्रमाणे 20 किलो तांदूळ तसेच साखर प्रति शिधापत्रिका 20 रुपये प्रति किलो दराने 1 किलो मिळेल.

प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 2 किलो गहू दोन रुपये प्रति किलो दराने,1 किलो मका एक रुपये प्रति किलो प्रमाणे , तांदूळ 3 किलो प्रति व्यक्ती 3 रुपये प्रति किलो व साखर प्रति शिधापत्रिका 1 किलो 20 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळेल. यासोबत केंद्रशासनाच्या प्राप्त निर्देशानुसार उपरोक्त दोन्ही योजनेच्या कार्डधारक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत माहे जुलै 2020 ते नोव्हेंबर 2020 पर्यंत दर महिन्यात प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ व प्रति शिधापत्रिका एक किलो चणाडाळ मोफत वाटप करण्यात येणार आहे.

तसेच उर्वरित एपीएल केशरी कार्डधारकांना माहे जुलै महिन्याचे नियतन माहे नोव्हेंबर या महिन्यात गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो या दराने प्रतीमाह प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे पाच किलो अन्नधान्य संबंधित स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत आहे.

तरी सर्व पात्र कार्डधारकांनी नेमून दिलेल्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपले रेशन कार्डवर देय असलेल्या संपूर्ण धान्याची उचल करावी. धान्य घेतेवेळी पिओएस मशीन मधून निघणारे बिल घेऊन त्या बिला प्रमाणेच पैसे द्यावे. दुकानात एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे सर्वांनी मास्कचा वापर करावा. दुकानदारांनी कार्डधारकांना हात धुण्यासाठी पाणी व साबणाची व्यवस्था करावी.

मिळणाऱ्या धान्याबाबत किंवा दुकानदाराबाबत काही तक्रार असल्यास कार्डधारकांना 1800-22-4950 किंवा 1967 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल, असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेंद्र दांडेकर यांनी केले आहे.