शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार! अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी 153 कोटींचा निधी आला

30

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

गेवराई(दि.13नोव्हेंबर):-जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील शेतपिके उध्वस्थ झाली. प्रशासनाने पंचनामे करुन झालेले नुकसान व त्यासाठी लागणार्‍या मदतीचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला. त्यानंतर आता ही मदत कधी मिळणार, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून होते. शासनाने शेतकर्‍यांना दिवाळी सणाचा दिलासा दिला असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी 153 कोटी 37 लाख 69 हजारांचा निधी पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाला वर्ग केला आहे.

हा निधी सर्व तहसीलदारांपर्यंत वितरित झाला असून लवकरच वितरण प्रणालीव्दारे तो शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी ही माहिती दिली. परतीच्या पावसाने यंदा बीड जिल्ह्यात खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झाले. सर्वच शेतपीकांसह फळबागांनाही पावसाचा मोठा फटका बसला, त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते.

मंगळवारी (दि.10) अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या मदतीचा 135 कोटी 37 लाख 69 हजारांचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून हा निधी जिल्ह्यातील 10 तालुक्यांच्या तहसीलदारांकडे वर्ग करण्यात येणार आहे.