संत चरणाजवळी नित्य असे दिवाळी !

29

दिव्यांच्या ओळींनी आपले घर-अंगण उजळले. बाहेर जिकडे तिकडे प्रकाशाचा झगमगाट झाला. का? तर दिवाळीच्या दिवसांत अमावास्या असते. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करता यावा म्हणून दीपकांची आरास केली जाते, दीपोत्सव साजरा होतो. कुणी म्हणेलही की हे चुकीचे उत्तर आहे. कसे? कारण हा सण ‘आनंदोत्सव’ आहे. प्रभू रामचंद्र आपल्या स्वगृही परतले. मग प्रभू दर्शनाची, ईश्वर प्राप्तीची ओढ लागली काय? नाही. फक्त सण म्हणून मौज-मस्ती केली.

बस्स एवढंच! आपल्या राहत्या घरातील, राहाटत्या खोलीतील म्हणजेच मस्तिष्क, मन व आत्मा यामधील अंधार अजूनही कायम घर करून आहे. आपण त्याला घालवू शकलो नाही. मग प्रभूमिलन कसे घडेल? प्रभू निरंकाराला प्रसन्न करणेस्तव आधी आपल्यात ज्ञान-उजाळा आणावा लागतो. असे संतश्रेष्ठ हरदेवसिंहजी महाराज म्हणतात –

संपूर्ण हरदेव वाणी : पद क्र. १५ –
निरंकार के आगे कोई दीपक क्या जलायेगा ।
तुझे परम प्रकाशी कोई क्या प्रकाश दिखायेगा ।
खत्म दीयें का तैल होता बाती भी बुझ जाती हैं ।
तेरी ज्योति ऐसी हैं जो कभी न बुझने पाती हैं ।
उजियारे के स्रोत तुझे जो पा के तुझ में खो जाता हैं ।
कहे ‘हरदेव’ जगत में वह जन आत्म प्रकाशित हो जाता हैं ।”

आपला अंतरात्मा कसा प्रकाशित करावा? याचा जीता जागताउदाहरण व प्रयोग म्हणजेच दिवाळीतील ‘दीपोत्सव’ होय. ज्ञानरूपी प्रकाशाने आपले संपूर्ण घर-अंगण उजळते. म्हणजेच स्वतःचे काया, वाचा, मन, बुध्दी, ह्रदय तथा आपले कुटुंबीय व शेजारी-पाजारी आत्मप्रकाशित-ज्ञानी करणे अभिप्रेत आहे. प्रभूप्राप्तीने आनंदीत होऊन जीवन समाधानाने निरंतर व्यतीत करत राहावे. सर्वांशी लाडीगोडी, मायाममता, प्रेमजिव्हाळ्याने मिळूनघळून वागावे. हाच मुख्य हेतू संतशिरोमणी तुकारामजी महाराज व्यक्त करतांना म्हणतात –

“साधू संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।।
दिवाळी दसरा तोचि आम्हा सण । सखे संतजन भेट देती ।।
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली। पाहातसे वाटुली पंढरीची।।
तुका म्हणे त्यांच्या घरची उष्टावळी। मज ते दिवाळी दसरा सण।।”

सासरवासीणी भगिणी जशी दिवाळी सणाची आतुरतेने वाट बघत असते. तद्वतच भक्तसुद्धा सद्गुरू व भगवंताच्या कृपाशीर्वादाची आस लावून असतात. त्यांना या सणासारख्या नेमक्या दिवसाचा काही एक नेम असत नाही. संत-सज्जनांच्या केवळ दर्शनमात्रेने ते अत्यानंदीत होत असतात. संत – सद्गुरूच्या सेवेनेच त्यांना पंचपक्वान्नांच्या गोडीची लज्जत भरभरुन मिळत असते. “हरिनाम स्मरणाची रांगोळी आपण ईश-प्राप्तीसाठी काढत आहे!” अशा संतश्रेष्ठ जनाबाई निक्षून सांगतात –

“आनंदाची दीपवाळी । घरी बोलवा वनमाळी ।।
घालिते मी रांगोळी । गोविंद गोविंद ।।”

निसर्गाने अंधार आणि उजेडाची योजना योग्य प्रकारे केली आहे. त्यांचे आपण रात्र व दिवस असे नामकरण केले. अंधारात सर्व प्राणीमात्रे गाफिल राहून आराम फर्मावत असतात. तर उजेडात तत्पर राहून आपले कार्यभाग साधून घेतांना आढळतात. पूर्व दिशेला उगविणारा सूर्यबिंब प्रकाशाचे स्रोत असल्याचे सिध्द करतो. सूर्य किरणांची चाहूल लागताच आपण खडबडून जागे होतो आणि आपल्या दिनचर्येला भिडतो. तद्वतच हे ‘प्रकाशपर्व’ ज्ञानार्जन करण्यास खुणावत असते. ज्ञान व ब्रह्मप्राप्तीने मनुष्य प्रथमतः माणुसकी शिकतो. तत्क्षणी तो बंधनाच्या सर्व तंग-चुस्त बेड्या तडतडा तोडून बंधनमुक्त व जीवनमुक्त होतो. जीवनमुक्त होणे हेच नरजन्माचे मुख्य प्रयोजन आहे. म्हणून माउली संत ज्ञानदेवजी महाराज समजावून सांगतात –

श्रीज्ञानेश्वरी : अध्याय १ ला –
“सुर्ये आधिष्ठीली प्राची। जगा जाणिव दे प्रकाशाची।।
तैसी श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।।
मी अविवेकाची काजळी। फेडूनि विवेकदीप उजळी।।
तै योगिया पाहें दिवाळी। निरंतर।।”

दिवाळीचे दिवस जवळ येताच आपण नाना प्रकारचे सुख-चैनीचे अवास्तव सामान गोळा करतो, खरेदी करतो. होता नव्हता सगळा पैसा-आडका खर्ची घालतो. प्रसंगी भिकेलाही लागतो. काही जन तर कर्जबाजारी होतात आणि आपल्या लेकी-बाळी व आया-बहिणींची अब्रू गहाण ठेवतात. हे खरेच योग्य आहे का? मोठ्यात मोठ्या – महानंदासाठी असले स्वतःचे धिंडवडे ‘दिवाळे’ काढून पस्तावत बसतात. मात्र ज्ञानी, संत, विवेकी, सज्जन, गुणीजन हे संतशिरोमणी व सद्गुरूला पाचारण करून संतसान्निध्यात “संतवचनामृत” मोठ्या श्रध्दा-भक्तिभावाने प्राशन करतात. तेच अजरामर सुध्दा होतात. या सुवर्णसंधीला ते ‘दीपोत्सव-आनंदोत्सव’ किंवा ‘दिवाळी’ साजरी केली असे अभिमानाने सांगत सुटतात. संत-कविवर्य नामदेवजी महाराज गुह्य वर्णन करतात –

“सण दिवाळीचा आला। नामा राऊळासी गेला।।
हाती धरोनि देवासी। चला आमुच्या घरासी।।”

आपल्या जीवनातील क्षण न् क्षण सज्जनांच्या पावन सहवासात घालविले. सदासर्वकाळ सत्संग, सेवा, हरिस्मरणात रममाण होत राहिले, तर मात्र बारा महिन्यांतून एकदाच येणारी ‘आनंदाची पर्वणी – महासुखराशी – दिवाळी’ ही रोजच आपल्या स्वर्गासमान घरीदारी साजरी होत राहिल. यासाठी कोणत्याच प्रकारचे धनद्रव्ये अथवा किंमती-भौतिक साधने खर्ची पाडावे लागत नाही. मात्र ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला तातडीने हुडकून शरण रिघणे अत्यावश्यक आहे. केवळ सण म्हणून गोडधोड, रंगरंगोटी, दिव्यांची आरास, फटाक्यांची आतषबाजी किंवा मनोरंजनाची धम्माल उडवली, तर त्यातूंन क्षणिक अन् आसुरी आनंदच मिळू शकेल. परंतु “ज्ञानदीप लावू जगी!” या महत्वाकांक्षेने संतमताप्रमाणे साजरी केलेली दिवाळी ही खऱ्या अर्थाने आत्मकल्याण व मानवकल्याण साधकच सिद्ध होईल, यात दुमत नाही! अशी समज ग्रंथकार संतशिरोमणी अवतारसिंहजी महाराज देतात –

संपूर्ण अवतार वाणी : पद क्र. ३६२ –
“जिस के नूर से नूर हैं तेरा नूरानी मालिक को जान।
जिस की ज्योति से ज्योति हैं तेरी महा ज्योति की कर पहचान।
निरंकार की अंश है मानव निरंकार की समज ले पा।
कहे ‘अवतार’ ज्ञान पाने को गुरू चरणों में शीश झुका।”

।। सर्वांना ही दिवाळी आनंदवर्धक व भरभराटीची जावो ।।
!! नियमित वाचत रहा रे ‘चंद्रपूर सप्तरंग’ ! नित्यनवे आपुले ठेवा रे ‘अंतरंग’ !!

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(मराठी साहित्यिक व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक)
मु. प. पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास,
रामनगर वार्ड नं. २०, गडचिरोली,
पो.ता.जि.गडचिरोली.
फक्त व्हा.नं. 9423714883.
ई-मेल : Krishnadas.nirankari@gmail.com