निरोगी आयुष्यासाठी स्वयंशिस्तीसह सुरक्षित वर्तणुकीचे आई रेणुका सर्वांना बळ दे ! – पालकमंत्री अशोक चव्हाण

35

🔸नांदेड जिल्ह्यातील माहूरगडाचे प्रवेशद्वार भक्तांसाठी खुले

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.17नोव्हेंबर):- बहुप्रतिक्षेनंतर सर्व धर्मियांच्या प्रार्थना स्थळांना दर्शन व प्रार्थनेसाठी खुले करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील माहूरगड व श्री सचखंड गुरुद्वारा याकडे भाविकांना विशेष ओढ लागली होती. काल दि. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. शासनाने दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करीत माहूर गड येथील रेणुका देवी संस्थांने सर्व भक्तांसाठी अत्यंत साध्या पद्धतीने शासनाच्या निर्देशांचे पालन करीत प्रवेशद्वार सर्वांसाठी खुले केले.

गडावरील रेणुकामातेने भक्तांमध्ये कोणताही भेदभाव केला नाही. पंचकुशितील गोरगरिबांसह विविध जात, धर्म, पंथातील भक्तांना रेणुकामातेने आपल्या कवेत घेतले आहे. नांदेड जिल्ह्यासह विविध राज्यात असलेल्या असंख्य भक्तांच्या सुरक्षिततेसाठी कोविड-19 अंतर्गत ज्या काही गोष्टी कटाक्षाने पाळव्या लागतील त्या सर्व बाबींची पुर्तता प्रशासन व संस्थानातर्फे केली जाईल या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भक्तांना आश्वस्त केले.

याच बरोबर वेळेच्या नियोजनासाठी व अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था व यंत्रणा तातडीने कशी उभारता येईल याबाबत प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी संस्थांना दिले आहे.

महाराष्ट्र शासनाने निर्णय जाहिर केल्याप्रमाणे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळे खुली करतांना एका आदेशाद्वारे नियम व अटींसह मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याच्या शर्तीसह परवानगी दिली. ही परवानगी दिल्यानंतर माहूर येथील रेणुका संस्थानाने गडावर चढाव्या लागणाऱ्या पायऱ्या व इतर बाबी लक्षात घेऊन भक्तांच्या दर्शनासाठी विशेष नियोजन केले. रेणुका देवी संस्थांचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, कोषाध्यक्ष तथा माहूरचे तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर, संजय कान्नव, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्या उपस्थितीत माहूर गडाचे मुख्य प्रवेशद्वार सकाळी 11 वा. खुले करण्यात आले.

दर्शनाच्या पहिल्याच दिवशी नागपूर व विदर्भातून मोठ्या प्रमाणावर भाविक आले होते.

🔺असे आहेत नियम

1) भक्तांनी दर्शनास जातांना 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि दहा वर्षाखालील लहान मुलांना प्रवेश नाही याची नोंद घ्यावी.

2) धार्मिक, प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थानांवर कोव्हीड 19 विषाणू संसर्गाबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी.

3) सर्व उपायांचे पालन सर्व धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे या ठिकाणी कार्यरत सर्व कामगार, सेवेकरी, अभ्यागत, भाविक यांचेकडून पूर्णवेळ पालन करणे बंधनकारक.

4) या सर्व ठिकाणी शक्यतोवर वैयक्तिक कमीत कमी 6 फूट शारिरिक अंतर राखणे आवश्यक.

5) चेहरापट्टी / मास्क यांचा वापर करणे बंधनकारक.

6) सर्व ठिकाणी अल्कोहोल युक्त हॅण्ड सॅनिटायझरचा वापर आवश्यक (किमान 20 सेंकदापर्यत).

7)सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध. उल्लघंन केल्यास स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई.

8) सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझर डिस्पेंसर तसेच थर्मल स्क्रिनिंगची सोय करणे संस्थानांना, प्रार्थनास्थळ प्रशासनाला बंधनकारक.

9) धार्मिक, प्रार्थना स्थंळाच्या ठिकाणी फक्त लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल.

10) सर्व व्यक्तींना चेहरा पट्टी, मास्कचा वापर केला असेल तरच प्रवेश. (No Mask – No Entry)

11) पादत्राणे स्वत:च्या गाडीतच ठेवणेबाबत भाविकांकडून अपेक्षित.

12) धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या परिसरातील तसेच आवारा बाहेरील सर्व दुकाने, स्टॉल, कॅफेटेरिया या ठिकाणी पूर्णवेळे सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक.

13) धार्मिक, प्रार्थना स्थंळाच्या परिसरामध्ये भाविकांच्या रांगांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि योग्य सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी हवे जागो-जागी योग्य मार्किग.

14) धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी करणेस परवानगी असणार नाही.

15) रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याथचे दृष्टी्ने एकत्रितपणे गायले जाणारे भजन आरत्या शक्यतो टाळण्याचे आवाहन.

16) धार्मिक प्रार्थनेसाठी एकत्रित येवून एकच चटई, अंथरूणचा वापर करणेस परवानगी नाही. भाविकांनी त्यांची स्वतंत्र चटई किंवा अंथरूण आणावा जो कि प्रार्थनेनंतर ते परत घेवून जातील.

17) धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या आत मध्ये प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी सारख्या शारिरिक अर्पणांना परवानगी असणार नाही.

18) धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी असलेले कम्युनिटी किचन, लंगर, अन्नदान, अन्नछत्र इत्यादी ठिकाणी अन्न तयार करताना व वितरण करताना योग्य शारिरिक अंतर राखावे.

19) धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, सेवेकरी यांची आठवडयातून एकदा कोव्हीड -19 चाचणी करणे आवश्यक.