नवीन शैक्षणिक धोरण २०२० – भ्रम आणि वास्तव

41

✒️संदिप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००

🔸प्रस्तावना🔸
देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा महामार्ग म्हणजे शिक्षण.शिक्षणाच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्था बळकट होत असते.देशातील प्रत्येक घटकाला योग्य न्याय देणारे शिक्षण हा भारतीय लोकांचा मुलभूत अधिकार आहे.शिक्षण प्रणालीमधून वर्तमान समस्येचे निदान करून भविष्याचा उन्नत मार्ग निर्माण करणे हे शिक्षणाचे ध्येय असते.शिक्षण म्हणजे सर्व प्रक्रियाचे एकत्रिकरण होय.क्षमता व अभिवृत्ती यांचा सामाजिक वर्तणुकीत बदल करण्याची पहिली पायरी म्हणजे शिक्षण .शिक्षणातून विद्यार्थांचा सामाजिक,आर्थिक ,शारिरीक,भावनिक,राजकिय,संविधानिक,मानसिक इ.विकास व्हावा ही भूमिका शिक्षण धोरणाची असते.भविष्यातील विद्यार्थी हा देशाचा खरा शिल्पकार असतो.त्याला आपण कोणत्या स्वरूपाचे शिक्षण देतो यावर शिक्षण धोरणाचे यश अवलंबून असते.

आज डिजिटल शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमाने ज्ञानाचे क्षेत्र मुक्त झाले असून,मोबाईलच्या छोट्या स्क्रिनवर क्षणात नवीन ज्ञानाचे दालन उघडे होते.नव्या तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थांला होते.या डिजिटल क्रांतीने जग जेवढे जवळ आले तेवढेच माणसातील मानवता कमी झालेली दिसते.समाजाप्रती संवेदना कमी झालेल्या दिसतात.या क्रांतीने जगात विषमतेची नवी संस्कृती उदयास आली आहे.यामध्ये गरीब विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या स्तरातून पुर्णपणे बाद होत आहे.शिक्षणाचे जे उद्दिष्ट ठरविले होते ते उद्दिष्ट आपण विसरत चाललो आहोत.खाजगीकरणाच्या माध्यमातून सरकारी शाळेची दुरावस्था राजकारण्यांनी केली आहे.आज बेराेजगाराचा दर आकाशाला भिडला असतांना वर्तमान शासन योग्य उपाययोजना न करता धार्मिकतेचा उन्मादाचा फिवर माजवून तरूणाईचं डोकं धर्माधिष्टित करत आहे.नवे शैक्षणिक धोरणात समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारे असावे ,तरच देशाचा विकास होऊ शकतो.

🔹शिक्षणाची व्याख्या🔹
‘Education’ या शब्दाची उत्पती लँटिन भाषेपासून झाली आहे.
Educare: to rear, to nourish,to bring up.पालनपोषण करणे,वाढविणे,संबंधित करणे.

“Education is that which realised person” Dr.Babasaheb Ambedkar

“Education is the development of all those capacity in the individual which will enable him to
control his environment and fulfill his possibilities” john Deway

“निरोगी शरीरात निरोगी मनाचा विकास करणे म्हणजे शिक्षण” अँरिस्टाटल

“संपूर्ण जीवनाची तयारी म्हणजे शिक्षण” हरर्बाट स्पेन्सर

शारिरीक व मानसिक दृष्ट्या विकसित झालेल्या सुजाण मानवाचे आपल्या बौध्दिक ,भावनात्मक व संकल्पनात्मक परिसरांशी होणारे समव्यवस्थापन म्हणजे शिक्षण.” प्रा.हॉन

🔸शिक्षणाचा खरा अर्थ🔸

१)ज्ञान प्राप्त करणे.
२)ज्ञानाचे उपयोजन करणे.
३)ज्ञानाच्या पराकाष्ठातून समाजाचा व राष्ट्राचा विकास करणे.
४)वैैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे.
५) संविधानात्मक संस्कृतीचा प्रचार व प्रसार करणे.
६)मानवातील उच्च आदर्शाची जोपासणा करणे.
७)विषमतामूलक समाजव्यवस्था व राज्यव्यवस्थेला हद्दपार करणे.
८) लोकशाही मूल्यांची पेरणी करणे.
९)स्वः जाणीवांचा विकास करणे.

🔹शिक्षणाचे उद्दिष्ट्ये🔹

१) सर्वांना समान शिक्षण देणे.
२)शारिरीक,मानसिक,बौध्दिक,
नैतिक शक्तीचा विकास.
३) सामाजिक जबाबदारीची जाणीव व राष्ट्रीयत्वाची जाणीव.
४)बालकेंद्रीत शिक्षण प्रणालीचा वापर.
५) सृजनत्व निर्मितीचा ध्यास.
६) आधुनिक विचारसरणीचा उपयोग.
७) धर्मनिरपेक्ष व सामाजिक न्याय या तत्वाविषयी बांधिलकी.
८)विज्ञान व तंत्रज्ञानाची जोपासना.
९) पारंपारिक अवडंबराचे उच्चाटण .
१०) संविधानाच्या प्रीयेम्बलचा उपयोग.

*शिक्षणातून समाजपरिवर्तन :*
शिक्षण फक्त स्वः विकासाचे माध्यम नसून ते समाज परिवर्तनाचे खरे क्रांतीसुत्र आहे. शिक्षणातून अज्ञानाचा अंधकार नाहिसा करता येते .राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणाचा खरा अर्थ सांगताना म्हटले आहे की,

“विद्ये विना मति गेली
मती विना निति गेली
निती विना गती गेली
गती विना वित्त गेले ,
वित्त विना शुद्र खचले ,
इतके अनर्थ एका अविद्येने केले.”

अज्ञानाने न ब्राम्हणी ग्रंथाने येथिल बहुसंख्य समाजाला गुलामगिरीत ठेवले. नवे ज्ञान आत्मसात करून मेंदूच्या गंजलेल्या नुरान्सला प्रकाशमान करणे हाच शिक्षणाचा खरा अर्थ आहे.
शिक्षणातून मानवाचा सामाजिक,आर्थिक,राजकिय विकास होत असतो.त्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर करावा ही नवी दृष्टी मिळते.शिक्षणातून लबाडी करणाऱ्या कावेबाजाचे मूल्यांकन करता येते .समाजाप्रती आपली भूमिका विशद करता येते.शिक्षण हे पैसा कमविण्याचे साधन नसून आपल्या जीवनाला फुलवणारा महागंधकोष आहे.ज्ञानाशिवाय मनुष्य क्रांती करू शकत नाही.ज्ञानाशिवाय आदर्श समाज निर्माण होऊ शकत नाही. म्हणून खऱ्या समाजाचे परिवर्तन करण्यासाठी शिक्षण हे मुख्य प्रयोजन आहे.

*लोकशाही व्यवस्थेची सुदृढता:*
भारत लोकशाही प्रधान देश अाहे.देशातील सर्व नागरिकांचा योग्य विकास व्हावा अशा शिक्षण धोरणाची देशाला गरज आहे.भारताने संविधान अमलात आणल्यापासून शिक्षण धोरणावर लोकशाही मूल्याचा प्रभाव पडला आहे.भारतीय संविधानातील उद्दिष्टाचा सखोल विचार शिक्षण धोरणात झालेला आहे.लोकशाही जीवनमूल्यांचा विद्यार्थी जीवनावर मोठा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो.स्वातंत्र्य ,समता, न्याय व बंधुभाव र्निमाण करण्याची कार्यशाळा म्हणजे शिक्षण.या कार्यशाळेतून तयार होणारा विद्यार्थी लोकशाही टिकविण्यासाठी झटेल असा आशावाद होता.पण आजच्या बदलातून असे वाटते की सनातनीवृत्तीची मशागत भरपूर झाली व मोठे पीकं आलं आहे.त्यामुळे काही अलोकशाहीवादी लोक संविधान व्यवस्था समाप्त करण्याचे डावपेच आखत आहेत पण भारतीय लोक त्याची जागा नक्कीच दाखवणार आहेत कारण ‘हे पब्लिक है सब जानती है.’भारताचे सच्चे नागरिक लोकशाही सुदृढतेसाठी योग्य शिक्षणाचा वापर करतील.

🔸अवैज्ञानिक विचारसरणीला मूठमाती🔸
भारत हा जातीचा आगर असलेला देश होता /आहे.जात या समाजव्यवस्थेच्या रूढीने येथिल समस्त समाजाला नागवले आहे.बहुसंख्य मानवाचे नैसर्गिक अधिकार हिरावून घेतले होते. खोट्या कल्पनानी भरलेल्या भाकडगोष्टीच्या ग्रंथानी ८५% जनतेला शिक्षणाची बंदी घातली होती.अशा काळात अवैज्ञानिक विचारांचे प्राबल्य वाढले होते त्यात जादूटोना,अंधश्रध्दा,देवधर्म,व्रतवैकल्य,उपासतापास,भानामती ,यज्ञयाग,ज्योतिष्य,राशीभविष्य याचे अवास्तव प्रस्थ माजले होते.सारा देशच अज्ञानाच्या खाईत लोटला होता.आज काही शाखा अवैज्ञानिक ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय लोकांच्या मनावर विषमतेची पेरणी करत आहेत हे देशासाठी फारच घातक आहे.धर्मवादी शिक्षणाच्या माध्यमातून चातुर्वर्ण्य व्यवस्थेची चौकट मजबूत करण्याचे काम आजही मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे भारतीय जनतेने सावध असावे.विज्ञानाचा योग्य वापर करून घडणाऱ्या घटनांचे योग्य कार्यकारणभाव लक्षात घ्यावे. शिक्षणातून बंधूभाव निर्माण व्हावा .समाजातील विषमतेची विषवृक्षांची मुळे नष्ठ व्हावी . शिक्षणाच्या राष्ट्रीय धोरणातून अवैज्ञानिक विचारसरणीला मूठमाती द्यावी.

🔹धार्मिक असहिष्णूता समाप्त करणे🔹
भारतीय समाजव्यवस्थेत धर्माला मोठे स्थान आहे.अनेक धर्म भारतीय भूमीत विकसित पावले आहेत.पण प्रत्येक धर्माचे मूल्ये वेगवेगळे आहेत.अनेक शतकात धर्माचा कायदा हा श्रेष्ठ ठरत होता पण प्रबोधनाच्या माध्यमातून धर्माची चिकित्सा केली गेली .अनेक धर्माचा पाया हा ईश्वर या शब्दावर उभा आहे.धर्माच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीला ढवळाढवळ करता येणार नाही असा दंडक होता.धर्म जे सागेल ते श्रेष्ठ अशी धारणा धर्मपंडिताची होती.प्राचिन,मध्ययुगीन व आधुनिक काळात धर्माच्या वाईट प्रथावर आसूड ओढल्या गेले.धर्माच्या नावाने होणारे शोषण थांबविले.तथागत गौतम बुध्द यांनी आपल्या तत्वज्ञानातून मानवमुक्तीचा नवा ज्ञानमार्ग दाखवला.माणसातील विषमता नष्ट करून समतेचा मानव धम्म दिला.अत्त दीप भवः चा नारा दिला.भारतीय संविधानाने समानतेच्या सुत्राने देशाला एका धाग्यात गुफंले आहे.शिक्षणाच्या माध्यमातून धार्मिक उन्मादाचे उच्चाटण करता येते हे आजच्या भारताला कळून चूकले आहे.तरी काही अंधभक्त धार्मिकतेचा बुरखा ओढून असहिष्णूता वाढवत आहेत यापासून आपण सतर्क राहायला हवे.

🔸नवीन शैक्षणिक धोरण -२०२०🔸

केद्रिंय महामंडळाच्या बैठकीत बुधवारी २९ जुलै२०२० ला नवीन शैक्षणिक धोरणाला मंजूरी देण्यात आली. तब्बल ३४ वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण इस्रोचे माजी संचालक डॉ .के .कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला.पहिले शैक्षणिक धोरण १९८६ ला लागू करण्यात आले.पूढे १९९२,२००९,२०१३ या वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रात फार मोठे बदल करण्यात आले होते.नवीन शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करण्यात आला आहे.पण या धोरणाचा फायदा भांडवलदारी व्यवस्थेच्या अनुसार करण्यात आल्याने हे फारसे यशस्वी होऊ शकणार नाही.या धोरणात ५+३+३+४ हा आकृतीबंध देण्यात आला आहे.बोर्डाचे महत्व कमी करण्यात आले आहे.या धोरण सारा अभ्यासक्रम एन. सी. ई . आर .टी.तयार करणार आहे.

या धोरणात व्होकेशनल अभ्यासक्रम वर अधिक भर देण्यात आला आहे.शालेय रिपोर्ट कार्ड मध्ये बदल करण्यात येणार आहे.उच्च शिक्षणात मोठे बदल होणार आहेत.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ‘ग्लोबल ‘ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत असणार आहे.सेमिस्ट पँटर्नवर भर देण्यात आला अाहे एम.फिल.पदवी कायमची बंद करण्यात येणार आहे.या धोरणात वर वर पाहता हे धोरण फायदेशीर वाटत असले तरी या धोरण तयार करणाऱ्या यंत्रणेने स्वः धर्म वाढविण्यासाठी व प्राचिन विकृत अजेडाचा सृप्त शिरकाव करून विद्यार्थांला संविधानात्मक जबाबदारीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.ज्या महामानवाने शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्या महामानवाच्या विचाराचे साधे दर्शनही दिसत नाही ही या धोरणाची शोकांतिकाो आहे.हे धोरण कारपोरेट कंपण्यांनी स्वतःच्या व्यवसायभिमुख बनविले आहे.या धोरणाने समानता हे मूल्य समाप्त करून श्रीमंत व ब्राम्हणी विचारशीलतेच्या जन्मजाणीवेचे धोरण तयार केले आहे.या धोरणात जाती व्यवसायाला घट्ट करण्याचे काम केले असून कच्चे कामगार निर्माण करणारे हे धोरण भारतासाठी धोकादायक ठरू शकते.वर्तमान शासनाचे पतन झाल्यानंतर या धोरणाचा बोजवारा वाजणार यात शंका नाही.

🔹नवीन शैक्षणिक धोरणातील भ्रम🔹
१) विद्यार्थांचा सर्वांगीण विकास करणे.
२)कौशल्य व व्यवसायभिमुख विद्यार्थी निर्माण करणे.
३)मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण.
४)परदेशातील विद्यापीठांना मुक्त प्रवेश.
५)स्वायतता विद्यापीठांची निर्मिती.
६) कारपोरेट शाळांची निर्मिती.
७)पाली व इतर भाषांचे संवर्धन.
८)शिक्षणात पारदर्शिकता आणने.
९)प्राचिन सभ्यतेचा गौरव.
१०) आधुनिक व वैज्ञानिक विचारसरणीला प्राधान्य.
११)डिजिटल क्रांतीचा उपयोग.
१२)समानतेचे शिक्षण .
१३)व्यवसायानुसार विद्यार्थी विभागणी.
१४) पारंपारिक वडिलोपार्जित व्यवसायाना प्रतिष्ठा.
१५)उच्च शिक्षणाचे बाजारीकरण.
१६)शिक्षणाचे केंद्रिकरण करणे.
१७) संस्कृतीभिमुख मेंदूची निर्मिती करणे.
१८) विश्व मानव व महामानव तयार करणे.

🔸नवीन शैक्षणिक धोरणातील वास्तव🔸
१) शैक्षणिक धोरणातून सांस्कृतिक रूढी -परंपरा अधिक घट्ट करणे.
२) संविधानात्मक तरतुदीना फाटा देणे.
३) प्राचिन ग्रंथाचा उदो उदो करून , मनुव्यवस्थेचा जयजयकार करणे.
४) बहुजन विद्यार्थांला उच्च शिक्षणातून बाहेर फेकणे.
५) चातुर्वर्ण्य व्यवस्थेची चौकट मजबूत करणे.
६)वंचित व मागासवर्गीय समाजावर चाकरी व सेवा करण्याचा डाव आखणे.
७)इतर भाषेच्या नावावर संस्कृत भाषेचा पाया मजबूत करणे.
८)शिक्षणातून देशाभिमान निर्माण न करता धर्माधिष्टित मूल्यांची पेरणी करणे.
९) विश्व मानव व महामानव बनविण्याचे अवास्तव दिवा स्वप्न दाखविने.(उदा.आजपर्यंत या व्यवस्थेला एकही व्हाल्टेअर निर्माण करता आला नाही.)
१०)शिक्षणाचे बाजारीकरण करणे.धनाड्य लोकांच्या दावनीला शिक्षण बांधणे.
११)या धोरणातून समता नष्ट होऊन माणसात उच्च निच भेदभाव करणारं माध्यम वाटते.
१२)विदेशी विद्यापीठांच्या आमंत्रणामुळे देशी विद्यापीठांचे खच्चीकरण करणे.
१३) विद्यार्थांचे आंदोलनांना दाबून टाकणे.
१४)नव्या गुलामीचा नवा मनू म्हणजे आजचे नवीन शैक्षणिक धोरण आहे.
१५) शिक्षण सम्राटाची निर्मिती करणे.
१६) आँनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल कंपण्यांचा फायदा करणे.
वरील भ्रम व वास्तव यांचा विचार संसदेत करून हे धोरण लागू करावे .या धोरणातील सुप्त अजेंडाचा बुरखा फाडून नवे तंत्रज्ञानी व संविधानिष्ठ शिक्षण धोरणाची बांधणी करावी.तरच देश प्रगती पथावर चढेल . भांडवलदारी मालकांच्या शाळेतून येणारे विद्यार्थी गुलामगिरीच्या चक्रव्युहात फसणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे.नव्या धोरणातील खासगीकरण समाप्त करून सरकारी मालकीचे शिक्षण निर्माण व्हावं यातच देशाच व समाजाच भलं आहे.याशिवाय दुसरा चांगला मार्ग नाही.