मा.श्रीमती.भुवनेश्वरी एस. (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी- स्मार्ट सिटी नागपूर तर्फे जैवविविधता नकाशाचे लोकार्पण

33

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.27नोव्हेंबर):-मा. श्रीमती. भुवनेश्वरी एस. (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एन.एस.एस.सी.डी.सी.एल.) च्या यांच्या हस्ते नागपूरच्या शहरातील जैव-विविधता नकाशाचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. आय.सी.एल.ई.आय दक्षिण एशिया (ICLEI South Asia) ही संस्था नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट सिटी पर्यावरण विभाग यांच्या सहकार्याने नागपूर शहरासाठी जैवविविधता नोंद वही (पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर -पी.बी.आर.) तयार करण्याचा उपक्रम राबवित आहे. सदर उपक्रमा अंतर्गत, हा नकाशा तयार करण्यात आला आहे.

पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर चे उद्दीष्ट लोकांमध्ये सभोवतालच्या वनस्पती व प्राणी याबद्दल ची माहिती तसेच त्यांचे संरक्षण याच बरोबर नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग या विषयी जनजागृती करणे आहे. या कार्यक्रमा अंतर्गत नागपूर शहरासाठी स्थानीय ज्ञानाचे प्रमाणबद्ध पद्धतीने नोंदणी, नैसर्गिक संसाधन उपयोगीतेबद्दल लोकांचा दृष्टिकोण व आकलन करून याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्यात येत आहे.

पी.बी.आर.चा एक भाग म्हणून, ICLEI-SA ने शहरातील जैवविविधता संपत्तीची तपशीलवार यादी तयार केली आहे. सदर जैवविविधता नकाशामध्ये महत्वाची स्मारके, सार्वजनिक स्थाने, पक्षी निरक्षणाच्या जागा, तलाव अशा विविध ठिकाणांची माहिती अतिशय दर्शनीय पद्धतीने मांडण्यात आली आहे. नागपूर शहर वाघ तसेच संत्र्यासाठी जगप्रसिद्ध आहे ही बाब लक्षात ठेऊन हा नकाशा तयार झालेला आहे.

या प्रसंगी मा. सी. ई.ओ. आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स (एन.एस.एस.सी.डी.सी.एल.) यांना स्मार्ट सिटी पर्यावरण विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या नागपूर शहरातील जैवविविधता माहितीबद्दलचे छायाचित्रांकीत कॉफीटेबल पुस्तक, डॉ. प्रणिता उमरेडकर (जी.एम. (प्र.) पर्यावरण विभाग) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थितांमध्ये श्रीमती. नेहा झा (सी.एफ.ओ.), श्रीमती. भानुप्रिया ठाकूर (सी.एस.), श्री. राजेश दुफारे (जी.एम-मोबिलिटी), डॉ. शील घुले (जी.एम.-इ- गव्हर्नन्स), श्री. राहुल पांडे (शहरी नियोजक), श्रीमती. अमृता देशकर (लेखा अधिकारी) तसेच ई-गव्हर्नन्स विभागातील श्री कुणाल गजभिये, श्रीमती आरती वाघ, श्री अनुप लाहोटीव पर्यावरण विभागातील डॉ. पराग अर्मळ, डॉ. मानस बडगे आणि ICLEI-SA चे श्री. शार्दुल वेणेगुरकर उपस्थित होते.