जीवनात मित्र महत्वाचे असतात

378

‘फ्रेंडशिप डे’ हा आपल्या भारतीय संस्कृतीत; अजून तरी तितकासा रुढ झालेला नाही. तरुणाई वगळता इतर कुठल्याही वयोगटात; हा दिवस भुरळ घालताना दिसत नाही. मित्रता दिवसाला महत्व नसले ; तरी रामायण महाभारतापासून ‘मैत्रीभावा’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुरातन काळापासून मित्रत्वाचे अनेक आदर्श उदाहरणे आहेत. मैत्रीखातर आपले सर्वस्व पणाला लावून, अगदी आपल्या आई व भावांच्या विरोधात लढणारा, ‘दानशूर कर्ण’ सर्वांना परिचित आहेच. दुर्योधनाची बाजू ‘अधर्मा’ची आहे. हे आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला पटून देखील खऱ्या मैत्रीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कर्णाने आपले ‘मित्रत्व’ निभावले. सर्वशक्तिमान सुदर्शन चक्रधारी जगद्गुरु श्रीकृष्ण व सुदामा यांच्या मैत्रीच्या गाथा आपणा सर्वांना ज्ञात आहेतच. कृष्णाच्या दारावर…. “अरे द्वारपालो ऽऽऽ…., कन्हैया से कह दो…. दर पे सुदामा गरीब आ गया है …” अशी ओजस्वी भावस्पर्शी हाक देणारा सुदामा आजही आठवतो.

मनुष्याच्या निर्मितीपासून माणसाला मित्राची गरज आहे. हे आजपर्यंतचा इतिहासाने सिद्ध केलंय… त्यातही आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या, विज्ञान युगात, संगणक युगात, माणसाला मित्राची नितांत गरज आहे. मित्र हे आपल्या जीवनातील ऑक्सिजन आहेत. खर्‍या अर्थाने मित्र हेच श्वास आहेत. आधी हे जाणून घेणे गरजेचे आहे. “मला कुणाची गरज नाही… मी एकटा सुखाने जगू शकतो…..” या अविर्भावात रहाल तर फसाल. कारण ते शक्य नाही. शक्य असले तरी प्रभावी आणि परिणामकारक जीवन नक्कीच नाही. हा ज्याच्या त्याच्या आत्मचिंतनाचा प्रश्न आहे.

तुम्हाला मित्र असलेच पाहिजेत. कारण नात्याला बंधने, मर्यादा, अपेक्षा असतात. मित्रत्व मात्र निर्बंध, अमर्याद आणि अपेक्षा विरहित असते. नात्यात रुसवे-फुगवे असतात.‌ इथे बिनधास्तपणा असतो. नात्यात राग,लोभ असतो. मैत्री निस्पृह आणि निर्लोभ असते. पद, पैसा, प्रतिष्ठा यामुळे नात्यात वेगवेगळे स्तर, पातळ्या असतात. मित्रत्व सर्वांना एका स्तरावर आणते. एकाच पातळीवर ठेवते. थोडक्यात पद, पैसा, प्रतिष्ठा याने तयार झालेली माणसा-माणसातील दरी; नात्यात कमी होत नाही. हीच दरी मैत्री पूर्णपणे संपवते. खऱ्या अर्थाने एकमेकांना एकत्र आणते. सर्वांना एका समान पातळीवर आणून ठेवते.

नात्यात विश्वास असेल की नसेल….? हे सांगता येत नाही. मैत्रीत विश्वास असतोच. त्यामुळेच मैत्री टिकते. नाती जन्माने, रक्ताने मिळतात. यामुळे यात निवडीचे स्वातंत्र्य नसते. मैत्री केलेली असते, म्हणून यात निवडीचं स्वातंत्र्य असते. अर्थातच निवडीचे स्वातंत्र्य असल्याने….. आपल्याला जी माणसे आवडतात, त्यांचा स्वभाव आवडतो, अशाच माणसांसोबत मैत्री होते. समान विचाराने, समाना आचाराने एकत्र आलेली माणसे पुढे आयुष्यभर एकमेकांची साथ-सोबत करतात.

नात्यांची गुंफण असते. हीच गुंफण कधीकधी गुंतागुंत होते. अक्षरश: माणसे कधीकधी नात्यांना कंटाळतात, नातेवाईकांना कंटाळतात. यावेळी मदतीची, सहानुभूतीची, आधाराची एकच जागा असते. ती म्हणजे मित्रत्व. बऱ्याच गोष्टी माणसे, आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला सांगत नाहीत. पण या गोष्टी माणूस मित्राजवळ मनमोकळेपणाने सांगून हलका होतो. सुखा-दु:खात नेहमीच माणसाला मित्राची गरज भासते. खऱ्या अर्थाने मित्र हे…. माणसाच्या आयुष्यातील; दुःख, राग, मनातील खदखद यासारख्या भावनांचा निचरा करणारे ‘आउटलेट’ असतात. ज्यांना मित्र आहेत; ते फार काळ दुःखी राहत नाहीत. त्यांचा राग जास्त दिवस टिकत नाही. ते चिडचिड करत नाहीत. ते एकलकोंडी नसतात; तर मन मोकळे असतात. आपल्या सगळ्या भावना उस्फूर्तपणे आपल्या मित्रांना सांगतात. सगळं सांगून मनाने फुलपाखरासारखी हलके होतात. मित्र असणारे कधी ‘कुढतं’ नाहीत. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर विपरित परिणाम होत नाही. मैत्रीमध्ये कुठलीच बंधने अगर मर्यादा नसतात. या नात्यात माणूस मुक्त पक्षासारखा वावरत असतो. म्हणूनच या संपूर्ण पृथ्वीतलावर मैत्री सारखं दुसरं नातं नाही.

जी नाती माणसाला जन्माने, रक्ताने लाभत नाहीत. कुठल्याच नात्यात त्यांना गुंफता येत नाही. अशांसाठी मैत्रीचा एक धागा; त्यांना आपल्यासोबत अतूट जोडून टाकतो. मैत्रीचं नातं…. एवढं निर्मळ, निष्पाप, निरागस असतं की, इथं बोलताना कोणतच तारतम्य बाळगायची गरज नसते. वावरताना कोणतीच आवर घालायची गरज नसते. खदखदून हसताना कोणतेही अविर्भाव जपण्याची गरज नसते. बेभान होऊन चिडता येतं, रागवता येतं. अगदी शिव्याही देता येतात. जे तोंडाला येईल; ते बोलता येतं. धायमोकलून रडताना लाज वाटत नाही. भेगाळलेल्या जखमा दाखवून, हंबरडा फोडताना…. या जखमा आणखी सलत नाहीत. तर त्या मित्राने घातलेल्या हळूवार फुंकरीने कोरड्या व्हायला लागतात.

खरा मित्र अडचणीत योग्य वाट दाखवतो. सुखात आनंदी होतो. दुःखात गहिवरून जातो. वेळेवर खंबीर होऊन साथ देतो. ढासळताना तोल सावरतो. अडखळताना पावलांना बळ देतो. कोसळताना आपला आधार होतो. आपल्या आनंदाच्या क्षणात हाच भारावून जातो. आपल्यावर आलेल्या संकटाने यालाही दुःख होतं. जो चांगल्या-वाईट, सुखा-दुखात प्रत्येक क्षणात तुमची मनाने साथ सोबत करतो. चुकल्यास खडसावतो. चुकीच्या वाटेवर चालताना; सत्याचा मार्ग दाखवतो. आयुष्यात आपला तोल जाताना; आपल्याला सावरतो. चांगला मार्ग दाखवतो. त्या मार्गाने चालण्यासाठी सोबत करतो. संकटात खचून न जाता लढण्यास शिकवतो. अडचणीच्या प्रसंगात केवळ मदत किंवा सहकार्य करत नाही याच्याही पुढे जाऊन संकटाला तोंड द्यायला शिकवतो. खऱ्या मित्राला… स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा नसते; पण आपला मित्र दुःखी झालेला त्याला चालत नाही.

कोणी कोणी मित्राला ‘सावली’ची उपमा देतात. तो त्याच्याही पुढे असतो. रात्री आणि सूर्यप्रकाश नसेल त्यावेळी सावली आपली सोबत सोडते. मित्र कधीच सोबत सोडत नाहीत.ते कधीच आपल्याला एकटे पडू देत नाहीत. कुणालाही नसला तरी मित्राला आपला विश्वास असतो. तोच गहिवरून सांगतो, “माझा मित्र आहे तो…..असं करू शकणार नाही…. मी त्याला चांगले ओळखतो….. खूप चांगल्या मनाचा आहे तो.” तुमचे नातेवाईक, तुमच्या घरातली माणसे तुमच्याबद्दल चांगले बोलतीलच…? ते तुमची काळजी करतीलच..? असं होईल अगर होणारही नाही…? पण कोणाचाच खरा मित्र कधीच त्याच्याबद्दल वाईट बोलणार नाही. त्याला टचके-टोमणे मारणार नाही. त्याचा द्वेष करणार नाही.

एखादेवेळी तुमची प्रगती तुमच्या भाऊबंदकीला, तुमच्या रक्ताच्या नातेवाईकला देखवणार नाही. त्यांना तुमची असूया वाटेल, तुमचा द्वेष वाटेल. पण खरा मित्र…. तुम्ही यशाची कितीही उंच शिखरे सर केलात; तरीदेखील तीळभरही असूया बाळगत नाही. कुठलाच लोभ ठेवत नाही. कोणत्याच कारणाने त्याला द्वेष वाटत नाही. काहीही झाले तरी तो तुमचा मत्सर करत नाही. या सर्व कारणामुळेच मैत्रीला तोड नसते. नात्याला जोड असली; तरी जोड नसलेले अफाट नाते म्हणजे ‘मैत्री’ असते.

मैत्री निखळ, निर्मळ, असते. निर्बंध असते. कोणी कसे वागावे…? याचे फालतू एटिकेट्स नसतात. कुठल्याच मॅनर्सला महत्त्व नसते. कुठल्याही फॉर्मलीटीज नसतात. कोणत्याही शिष्टाचाराची झूल नसते. मान-पान, आदर-सत्कार, स्वागत-सन्मान यासारखी ‘बेगडं’ नसतात. चकचकीत मुलामा नसतो. कुठल्याही कार्यक्रमात आहेर, प्रजेंट ; यापेक्षा मित्राची उपस्थिती अधिक सुखदायी असते. त्याच्या असण्याने मन बहरून जाते. बरेच दिवस भेटलो नाही; तर विरह वाटतो. मनात साठलेले सुख-दुःख, राग-लोभ कधी एकदा त्याला सांगून; ‘मोकळं व्हावे’ असे वाटायला लागते. मित्राचे ‘ऋणानुबंध’च तशे असतात. मैत्री कुठल्याच नात्यापेक्षा कमी नसते तर ती सगळ्याच नात्यापेक्षा फार मोठी असते.

देवाला ज्या माणसाला आपल्या आयुष्यात ; नातेवाईकाच्या रूपात पाठवता आले नाही. त्याच्याशी कुठलेच बंध जुळले नाहीत. आशा अंतःकरणाला स्पर्श करणाऱ्या माणसांसाठी ‘बेबंध मैत्री’ असते. मैत्रीत जात-पात-धर्म यांना थारा नसतो. वयाची बंधने नसतात. काळा-गोरा भेद नसतो. लहान मोठेपणा नसतो. गरीब-श्रीमंतपणा आड येत नाही. कुठलीच ठिकाणे मर्यादा घालू शकत नाहीत. समाजाची बंधने नसतात. समाजाच्या चाकोरीची ‘बुजं’ नसते. मैत्रीला मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्यांची गरज नसते. कायम सोबत राहावे असेही काही नसते. स्त्री-पुरुष हाही भेद नसतो. अर्थात अजूनही बुरसटलेल्या समाजव्यवस्थेने स्त्री-पुरुषाच्या निखळ, निर्मळ मैत्रीला राजमान्यता दिली नाही. तरीही स्त्री-पुरुषांची निखळ, निर्मळ मैत्री असणे; ही काळाची गरज आहे. त्यामुळेच अनेक अनुत्तरीत वाटणारे प्रश्न सुटणार आहेत.

मैत्री स्वच्छ, निर्मळ असते. यात लपवा-लपवी, फसवा-फसवी, खरे-खोटे, चांगले-वाईट असे काहीच नसते. या सगळ्यांच्या पलीकडे मैत्रीचे नाते असते. एक मात्र लक्षात असू द्या… कृष्णाला हजारो मित्र होते. पण उदाहरण मात्र कृष्ण-सुदाम यांचेच दिल्या जाते. दुर्योधन-कर्ण यांना मित्राची कमी नव्हती. पण खरे मित्र म्हणून दुर्योधन-कर्ण यांच्याकडेच पाहिले जाते. तसेच आपल्याही आयुष्यात आहे. मित्र खूप असतील…. पण जीवाभावाचे, जिवलग, खरे मित्र हे बोटावर मोजण्याएवढेच असतात. तेच खऱ्या मैत्रीच्या व्याख्येत बसतात. सगळ्या सोबत मैत्रीभावाने वागणे वेगळे आणि जीवाभावाचे मित्र असणे वेगळे.

सगळ्यात महत्त्वाचे आभासी दुनियातील मित्रांची गणना यामध्ये होत नाही. फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटरवर हजारोंच्या, लाखोंच्या संख्येने मित्र असतील; पण त्यांना आयुष्याचे ‘सखे-सोबती’ म्हणू शकत नाहीत. ते आभासी दुनियेपुरतेच मित्र असतात. खरी मैत्री वाहवत नेत नाही. तर ती योग्य मार्गावर आणते. यात फायदा किंवा गैरफायदा नसतोच; असे झाल्यास ती मैत्रीच असू शकत नाही. आजच्या तरुणाईने हे पाळणे गरजेचे आहे. केवळ मैत्रीच्या नावाखाली भरकटत जाऊ नये. यामुळेच या नात्यातील पवित्रता संपत आहे. याचे जाण आणि भान ठेवणे गरजेचे आहे.

मैत्री बाहेरच्याच जगाशी असावी. असे नाही. ती खऱ्या अर्थाने घरातही रुजली पाहिजे. नात्यातही सजली पाहिजे. ‘असामंजस्य’ आणि अनाठाई ‘इगो’मुळे दुभंगनारे, आयुष्याचा सर्वात जवळचे नाते ‘पती-पत्नी’ मैत्रीभावा शिवाय फुलू शकत नाही. कायम धूसफुसणारी सासू-सून. सूर्य चंद्राप्रमाणे असणारे पिता-पुत्र. ऊन सावली सारख्या माय-लेकी. एकाच आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेले ‘भाऊ-भाऊ’ , ‘बहिणी-बहिणी’ ‘भाऊ-बहीण’. यासारख्या अनेक दुभंगत चाललेल्या नात्यागोत्याचा अभ्यास केला; तर प्रत्येकाला नक्कीच वाटेल…. खऱ्या अर्थानं नात्यातही ‘मैत्रीभाव’ येणे गरजेचे आहे. तरच या नात्यात मायेचा ओलावा कायम राहील. मनापासून आपल्या आवडत्या माणसांला म्हणावे वाटेल. “ना त्याला काही नाव असावे…. ना त्याचे काही बंधन व्हावे… तू ही रे माझा…. ‘मितवा’…!”

✒️लेखक:-श्री.मयूर मधुकरराव जोशी(ग्रीन पार्क, जिंतूर. जिल्हा परभणी)मो:-9767733560/7972344128