काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी घेतली खासदार सुनील तटकरे यांची भेट

27

🔹समस्या सोडविण्याचे तटकरे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

✒️उरण(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उरण- रायगड जिल्हा(दि.3डिसेंबर):-उरण तालुक्यातील कोटनाका काळाधोंडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडको व रेल्वे प्रशासनाने संयुक्तपणे रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केले मात्र त्याबदल्यात आजपर्यंत येथील शेतकऱ्यांना कोणतेही मावेजा, मोबदला अथवा नुकसान भरपाई मिळालेली नाही. सिडको व रेल्वे प्रशासन चर्चेला सुद्धा तयार नाही.

सुरवातीपासूनच रेल्वे व सिडको प्रशासनाने येथील शेतकऱ्यांच्या महत्वाच्या समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. रोजगार नसल्याने या शेतकऱ्यांवर, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रेल्वे व सिडको प्रशासना विरोधात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा तसेच कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधिकारी -कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी या विषयावर खासदार तटकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. व या समस्या सोडविण्याची मागणी तटकरे यांच्याकडे केली आहे. यावेळी स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार तटकरे यांनी सकारात्मक भूमिका घेत काळाधोंडा येथील शेतकऱ्यांना योग्य ते न्याय देण्याची भूमिका घेतली.

तटकरे यांनी लवकरच संघटनेची प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, सिडकोची व रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक घेणार असल्याचे सांगितले. या स्थानिक व भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी जातीने लक्ष घालून पुढाकार घेतले आहे.