शिक्षक व विद्यार्थ्यांना समर्पित जीवन

32

[राष्ट्रीय गणित दिन – श्रीनिवास रामानुजन जयंती विशेष]

भारतामध्ये श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांची जयंती ‘राष्ट्रीय गणित दिवस (National mathematics Day)’ म्हणून दरवर्षी २२ डिसेंबर रोजी साजरी केली जाते. त्यांच्या गणित क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीच्या स्मरणार्थ ‘राष्ट्रीय गणित दिन’ इ.स.२०१२पासून साजरा होऊ लागला आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी त्यावेळी चेन्नई येथे आयोजित महान गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांच्या १२५व्या जयंती समारोहात ही घोषणा केली. सन २०१२ मध्ये २२डिसेंबर हा दिवस प्रथमच ‘राष्ट्रीय गणित दिन’ साजरा करण्यात आला. या दिवसाचे महत्त्व – (१) माणुसकीच्या प्रगतीसाठी गणिताची गरज लक्षात घेऊन लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे, (२) शिबिरांच्या माध्यमातून गणित शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, (३) गणित आणि संबंधित क्षेत्रातील संशोधनासाठी प्रयत्न करणे, (४) अध्यापन-शिक्षण साहित्य विकास, उत्पादन आणि प्रसार यांवर लक्ष केंद्रित करणे, इत्यादी सांगितले जातात. 

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दि.२२ डिसेंबर १८८७ साली तिरोडा-तंजावर येथे झाला. ते एक महान भारतीय गणितज्ञ, एक अलौकिक गणिती होते. ते सदा न् कदा गणिताचाच विचार करीत असत. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू यावरच विचार करत असावा. म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिताची सूत्रे लिहून काढत. अशा या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत. ते ऐकून त्यांचे शिक्षकही आश्चर्यचकित होत असत.

रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो.हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो.हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो.हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच त्यांना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी तिकडे जाण्यास निघाले. इंग्लंडला गेल्यावर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तेथेच एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी प्रो.जी.एच.हार्डी एका मोटारीतून गेले.

त्या मोटारीचा क्रमांक होता १७२९. प्रो.हार्डीनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना मोटारीचा क्रमांक बोरिंग होता, असं सांगितले. तेव्हा तत्काळ रामानुजन यांनी म्हंटले, “नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबर आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.” यांवर आकडेमोडही करून दाखविली. तेव्हापासून १७२९ या संख्येला हार्डी-रामानुजन संख्या म्हटले जाते. इ.सन १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात त्यांनी तब्बल बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. सन १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.
रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते.

गणिताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे रामानुजन फाईन आर्ट् अॅण्ड झेड.डब्ल्यू.एन्.जे.यामध्ये नापास झाले होते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. त्याकाळी कागदाची किंमत जास्त असल्याने ते नेहमी पाटीवरच आकडेमोड करत गणित सोडवायचे. काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवण्यास सुरुवात केली. रामानुजन हा एक निसर्गाचा गणिती चमत्कार होता, असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. अवघे ३२ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले. मात्र त्यांचे काम प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रात उपयोगी आहे. त्यांनी अगदी साध्या सुत्रांपासून तर अतिशय जटिल अशा सुत्रांची निर्मिती केली. जवळपास चार हजार गणिताची सूत्रे त्यांनी मांडली आहेत. त्यांचे भरीव योगदान आजदेखील संशोधकांना आव्हान देत असून आणखी काही शतके काम करता येईल एवढी ती सखोल आहेत.

गणितातील संकल्पना व पद्धती उपलब्ध झाल्यामुळेच आज अनेकविध क्षेत्रात प्रगती साधली जात आहे. म्हणून यात सातत्याने संशोधन करून ज्ञानात भर घालणे व इतिहास रचणे काळाची गरज आहे.इ.स.१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणातच खिळून राहण्यात गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी दि.२६ एप्रिल १९२० रोजी रामानुजन हे महान गणितज्ञ या जगाचा निरोप घेऊन गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले. आपण गणितातील मूलभूत क्रिया, सूत्र, प्रमेय, उपयोजन, संशोधन आदींसाठी गणितज्ञ रामानुजन यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्यांनी आर्थिक, शैक्षणिक व शारीरिक प्रतिकूल परिस्थितीतही गणितासाठी आपले संपूर्ण जीवन झोकून दिले.परंतु भारतातील गणित विषयातील गौरवशाली परंपरा अबाधित ठेवून सतत वृद्धिंगत केली. माणसाला आपले दैनंदिन जीवन गणिताशिवाय व्यतीत करणे शक्यच नाही.

राष्ट्रीय गणित दिनी अशा या थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना कोटी कोटी नमन !
!! आणाया वाचण्या ज्ञानवर्धक बातमी ! तत्पर सदैव संदेश पुरोगामी !!

✒️लेखक:-श्री के.कुमार जी.निकोडे प्राथ.शिक्षक.
मु.जि.गडचिरोली पिन.४४२६०५.
भ्र.ध्व.क्र. ७७७५०४१०८६.
इमेल – krishnadas.nirankari@gmail.com