✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.3जानेवारी):- येथील अभिजित राणे युथ फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वर्तमान पत्रात उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल दौंड येथील श्याम ठाणेदार यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वर्तमानपत्रात नियमीत लेखन करणाऱ्या वृत्तपत्र लेखक तसेच पत्रकरांचा अभिजित राणे युथ फाउंडेशनतर्फे दरवर्षी सन्मान केला जातो. श्याम ठाणेदार हे महाराष्ट्रातील विख्यात स्तंभलेखक आहेत.

महाराष्ट्रातील सर्वच वर्तमानपत्रात ते विविध विषयांवर नियमित लेखन करीत असतात. कोव्हीडच्या काळात त्यांनी अनेक प्रबोधनात्मक लेख लिहून जनजागृती केली त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

मुंबईतील गोरेगाव येथील केशवराव गोरे ट्रस्ट हॉल मध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मुंबई मित्र दैनिकाच्या संपादिका अनघा राणे, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, बिग बॉस फेम सिने अभिनेते अनिल थत्ते, माजी नगरसेवक विनोद शेलार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, बुके असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

श्याम ठाणेदार यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्र परिवाराकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे. याप्रसंगी धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजित राणे, जेष्ठ राजकीय विश्लेषण अशोक राणे, सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील नामांकित पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच वृत्तपत्र लेखक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED