जपू या, मनाचं आरोग्य !

33

आरोग्य धन संपदा ” ही म्हण लक्षात घेऊन अनेक व्यक्ती आपल्या आरोग्याविषयी फार जागरूक असतात.रोज योगा करतात,व्यायाम करतात,सकाळ संध्याकाळ चालायला जातात.घरातील सकस, ताजे अन्न व फळ खातात.वेळेवर नाश्ता व जेवण करतात.फार तेलकट,गोड अथवा तुपकट पदार्थ टाळतात.पौष्टीक पदार्थ व फळ आवर्जून खातात.स्वतःची फार काळजी घेतात.वय वाढले तरी ते अतिशय तंदुरुस्त असतात . कारण त्यासाठी त्यांनी अनेक वर्षे केलेला त्याग व कष्ट असतात ज्याचा परिणाम त्यांना दीर्घकाळ लाभतो व ते जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात. अगदी वयाच्या त्या टप्प्यात ही जेव्हा इतर व्यक्ती लवकर थकतात. आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे. आरोग्याच्या बाबतीत अनेक पुस्तके आहेत ,जी उत्तम मार्गदर्शन करतात. त्याचा लाभ अनेक व्यक्ती घेतात. मात्र मानसिक आरोग्याचे काय ? आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन ? मात्र मानसिक आरोग्य जपणे ही आजच्या आधुनिक व स्पर्धेच्या युगाची फार मोठी गरज आहे.

मात्र खंत म्हणजे ह्या गोष्टीकडे सहजासहजी दुर्लक्ष केले जाते आणि त्यामुळेच आज आत्महत्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे व आपल्या देशाची खूप मोठी समस्या होत चालली आहे.अगदी लहान मुलांपासून ते जेष्ट व्यक्ती देखील हा टोकाचा निर्णय घेतात . ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. मात्र त्याचा त्रास हा सर्व कुटुंबाला भोगावा लागतो. सर्व कुटुंब उध्वस्त होते .मुलांचे अतोनात हाल होतात . आपली प्रिय व्यक्ती आपल्यात नाही हा आघात पचवणे खूप अवघड होते. ह्या मुलांच्या बाबतीत जर बोललो तर त्यांच्या आत्महत्या करण्यामागे अतिशय शुल्लक कारणं असतात. जसे की आई रागावली, चिडून बोलली, मोबाईल खेळू नको म्हणून म्हणाली,टीव्ही पाहू नको अथवा खाऊ साठी पैसे दिले नाही म्हणून ही मुलं आत्महत्या करतात . आता ह्यांना काय म्हणावे ? पूर्वी तर आई वडील व शिक्षक काही चुकले तर मुलांना बदडून काढायचे.तरीही मुलं हसत,खेळत कायम असायची. तेवढ्यापुरते रडून पुन्हा दंगा करायला तयार असा तो आपला काळ. मात्र आज सर्व काही बदललं आहे.

घरात एक अथवा दोन मुलं, जी लाडात वाढलेली असतात ‘नाही’ हा शब्द ह्यांना माहीत नसतो. सगळ्या गोष्टी मागण्याचा अगोदर मिळतात. आई वडील देखील मुलांसमोर म्हणतात आम्हाला नाही मिळाले मात्र आम्ही मुलांना कधीही काहीही कमी पडून देणार नाही.येथेच तर सगळं गणित चुकतं .कारण त्यांना कधी नाही म्हणालो तर त्याचा त्यांना प्रचंड संताप येतो. त्यांचा इगो दुखावला जातो. हे त्यांना सहन होत नाही व ते आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतात. ह्यातून सर्व पालकांनी हेच शिकले पाहिजे की मुलांचे हट्ट पुरवताना त्यांना नाही पचवण्याची देखील ताकद शिकवली पाहिजे. कारण हीच ताकद त्यांना भविष्यात योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य देईल .यशाबरोबर अपयश देखील पचवण्याची ताकद मुलांमध्ये असली पाहिजे.जीवनात प्रत्येक वेळी सर्व काही मनासारखेच होईल असे नाही .परिस्थितीनुसार थोडे नमते घेऊन माघार घेता आली पाहिजे. प्रत्येक वेळी पहिला नंबर आलाच पाहिजे अथवा यश मिळेलच असा अट्टाहास का ? ठीक आहे, ह्या वेळी नाही जमले तर पुन्हा जास्त प्रयत्न करून चांगली कामगिरी करणे हेच महत्वाचे. मुलांना शाळेत शिक्षणाबरोबर मानसिक आरोग्य कसे जपावे ? याचे ही शिक्षण दिले पाहिजे. ही आजच्या काळाची गरज आहे.किमान महिन्या दोन महिन्यातून एकदा प्रत्येक शाळेने मुलांसाठी मानोसपचार विषयक कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. जेणे करून त्याचा मनातील घालमेल थांबेल.

त्याच्या प्रश्नाचे अचूक उत्तर त्यांना मिळेल. त्यांना योग्य दिशा मिळेल व त्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहील ज्यामुळे आत्महत्येचे प्रमाण किमान मुलांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. कारण ही मुलं उद्याचे भविष्य आहेत. आपल्या देशाचा स्वाभिमान आहेत .त्यामुळे ह्या गोष्टीची जनजागृती होणे फार महत्त्वाचे आहे.सर्वानीच वेळेत सावध होणे गरजेजे आहे.ही झाली मुलांची बाजू . पण बऱ्याचदा मोठे देखील सतत काही न काही ताणतणाववात असतात. जीवनात अनेक समस्या असतात. मात्र आत्महत्या करणे हा उपाय कदापीही नव्हे.त्या साठी त्यांनी देखील बोलले पाहिजे. स्वतःला होणारा त्रास किमान घरातील एखाद्या व्यक्तीला अथवा आपल्या विश्वासू मित्र मैत्रिणीला आवर्जून सांगितला पाहिजे.प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते ते शोधले की नक्की सापडते.आपण आज हरलोत तर उद्या नक्की जिंकू. मात्र स्वतःचा जीव देणे काही बरोबर नाही.हे सर्व वेळेत रोखले पाहिजे, म्हणजे अनर्थ टळेल. कोणतीही गोष्ट लपवून न ठेवता त्यावर उपाय शोधला पाहिजे.घरातील व्यक्तीचा ह्यांना पूर्ण पाठिंबा असला पाहिजे. जर आपल्या घरातील एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये असेल तर वेळेत उपचार होणे गरजेचे आहे. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेणे व औषध उपचार घेणे फार गरजेचे आहे.

जसे मधुमेह अथवा रक्तदाब असे काही आजार असतात तसाच हा ही एक आजार आहे. तो लपवण्याचा गरज नाही. नाहीतर आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावू शकतो .मग मात्र पस्तावण्याशिवाय काही हातात राहणार नाही. त्यामुळे वेळेत सावध झाले पाहिजे. डिप्रेशनमध्ये गेलेली व्यक्ती कधी कधी काहीच बोलत नाही . त्यांना एकांतात रहायला आवडते. हा एकटेपणा फार घातक आहे. त्यामुळे त्यांना बोलते करणे ही आपली जबाबदारी आहे. काही व्यक्ती फार चीड चीड करतात, रागावतात . समोरच्याला तोडून बोलतात .अपमान करतात. मात्र आपण मान अपमान ह्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांना समजून घेतले पाहिजे. कोण काय म्हणेल हे महत्वाचे नाही. मात्र त्या व्यक्तीचा जीव वाचणे हे महत्वाचे असले पाहिजे. त्यांनी आपले मन किमान एखाद्या व्यक्तीकडे मोकळे केले पाहिजे .हसले पाहिजे, रडले पाहिजे .आपल्या भावना प्रकट केल्या पाहिजे .ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. शरीराबरोबर मन देखील तंदुरुस्त असले पाहिजे. अनेक वेळा स्त्रिया रडून बोलून मोकळ्या होतात त्या दिसायला नाजूक असल्या तरी मनाने फार खंबीर असतात. त्यामुळे दुःख पचवण्याची क्षमता अगदी जन्मापासूनच त्यांच्यात जास्त असते.

पुरुष दिसायला खंबीर असला तरी मनाने फार हळवा असतो. तो फार कमी बोलतो अथवा फार कमी व्यक्त होतो. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. कामाचा ताण, आर्थिक ताण तणाव कर्ज , मान सन्मान,प्रतिष्ठा गमावण्याची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, आपल्या मुळे घरातल्याना त्रास होईल ,समाजात आपले नाव खराब होईल अशा एक न अनेक गोष्टीची भीती त्यांना आत्महत्या करण्यासाठी कारणीभूत ठरते.मात्र पुन्हा नव्याने सुरवात होऊ शकते ,पुन्हा यशस्वी होता येते हे जर त्यांना पटवून दिले, त्यांना सहकार्य केले तर निश्चितच ते ह्यातून बाहेर येतील व पुन्हा प्रयत्न करून यशस्वी होतील . स्त्रीया बऱ्याच वेळा आपल्या सासरी होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या करतात . नवरा पिऊन मारहाण करतो,सासू – सासरे , नणंद त्रास देतात,मुलगा होत नाही, त्यांना वंशाचा दिवा मिळत नाही,अथवा सासरी सतत पैशांची मागणी असते अशा अनेक घरगुती कारणांनी महिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होते. मात्र जर लहानपणापासूनच मुलींना घरात ,शाळेत हे धडे दिले पाहिजे की अन्याय कदापीही सहन करू नये व आपण ही कोणावर ही कधीही अन्याय करू नये . तसेच त्यांना आत्मनिर्भर केले पाहिजे जेणे करून भविष्यात काही समस्या आल्या तरी ती स्वतः सोडवू शकेल. तो आत्मविश्वास तिच्यात निर्माण करणे महत्वाचे ठरू शकते.ती एकटी राहून आपले घर चालवू शकते.

स्वतःबरोबर मुलांची देखील काळजी घेऊ शकते. त्यामुळे स्त्री ही नेहमी आत्मनिर्भर असली पाहिजे .ज्यामुळे स्त्रीयांमधील आत्महत्याचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते. जेष्ठ व्यक्ती अनेक वेळा एकटेपणामुळे अथवा मुलं सांभाळत नसल्याने आत्महत्या करतात .अशा वेळी त्यांना जर शेजाऱ्यांनी, नातेवाईकांनी त्यांचा थोडा वेळ दिला, गप्पा मारल्या, त्यांच्या काही अडचणी सोडवल्या तर ते ह्यातून नक्कीच बाहेर येतील . हे सगळ थांबल पाहिजे. प्रसिद्धी,पैसा,मान सन्मान ह्या ही पलीकडे आयुष्य आहे.साधं सरळ स्वाभिमानी जीवन जगण्यात ही खूप आनंद आहे. शेवटी आनंद तर आपल्या मानण्यावर आहे.कधी कधी श्रीमंत, प्रसिद्ध व्यक्ती ज्यांच्या घरात सर्व सुख सोयी आहेत नोकर चाकर आहेत तरी देखील तो समाधानी अथवा आनंदी नसतो, तर अनेक वेळा गरीब लोक लहान घरात राहून संतुष्ट,समाधानी व आनंदी जीवन जगतात. कारण एकच त्यांच्याकडे मनाची श्रीमंती असते जी त्यांना नेहमीच हसतमुख ठेवते . जी आजच्या काळात फार दुर्लभ गोष्ट आहे.जे आहे त्यात देखील मनुष्य आनंदी राहू शकतो.दर वेळी सहलीसाठी परदेशात गेलो तरच आनंद मिळेल असे काही नाही. तर कधी आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर केलेली एक दिवसाची सहल देखील खूप आनंद देऊन जाते व त्या मैत्रीच्या मैफिलीत मारलेल्या गप्पा गोष्टी,नाच गाणी सर्व शीण घालवू शकते एवढी अदृश्य शक्ती ह्या मैत्रीच्या नात्यात असते.

मानसिक आरोग्य ऊत्तम राहण्यासाठी काही गोष्टी सोडून द्यायला शिकले पाहिजे.सकारात्मक पुस्तकांचे वाचन केले पाहिजे.आपले छंद जोपासले पाहिजे.स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. ध्यान धारणा केली पाहिजे .मित्र मैत्रिणींशी मस्त गप्पा गोष्टी केल्या पाहिजे. एखाद्या सामाजिक संस्थांमध्ये काम केले पाहिजे .जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला देण्याची दानत असली पाहिजे. त्यामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तुम्ही देखील आनंदी रहाल .कारण आपण जे दुसऱ्याला देतो तेच तर निसर्ग पुन्हा आपल्याला देत असतो. तो त्या निसर्गाचा नियम आहे. जर दुसऱ्याला सुख दिले तर तुम्ही सुखी असाल आणि जर दुःख दिले तर ते ही तुमच्या वाटेला परत येणार.नाती गोती जपली पाहिजे. आपली माणसे सांभाळली पाहिजे. ज्यामुळे एक तरी हक्काचा खांदा असेल तुम्हाला रडण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी. कारण शेवटी हीच जोडलेली माणसे तुम्हाला साथ देतात. बिकट परिस्थितीत सोबत करतात.आपल्यातील माणूसकी जपली पाहिजे व आवर्जून एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी झाले पाहिजे. मग तुम्हीच पहा हे जग किती सुंदर आहे. सर्व अभावग्रस्त असलेल्या लोकांसाठी घरच्यांनी,समाजाने,मित्र मैत्रिणीने काही तरी केले पाहिजे .सतत त्यांना सोबत केली पाहिजे. त्यांना ह्यातून सहीसलामत बाहेर काढले पाहिजे जेणे करून ते अशा नकारात्मक गोष्टीचा कधीही विचार करणार नाही.जर अशा एका जरी व्यक्तीचा आपण प्राण वाचवू शकलो ,त्याचे मत परिवर्तन करू शकलो, जगण्याची ज्योत त्यांच्यात निर्माण करू शकलो तर याहून सुंदर काहीच असू शकत नाही.ही लढाई सर्वांनी मिळून लढू या. ज्या दिवशी वृत्तपत्रात अशी एकही बातमी नसली की समजावे की आपण सर्वात मोठी लढाई जिंकलो.तर ह्या नवीन वर्षाचा नवीन पण करू माणसं जपू या , माणसं सांभाळू या. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याची काळजी घेऊ या !

✒️लेखिका:- रश्मी हेडे

▪️संपादन : देवेंद्र भुजबळ(मो:-9869484800)