हिंगणघाट तालुक्यात ग्रा.प.निवडणुकीत महाविकास आघाडी वरचढ

25

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.१८जानेवारी):-तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्यपदाकरिता दि.१५ रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल आज दुपारी घोषित करण्यात आला.
तालुक्यातील पाच ग्रामपंचायतमधे सिरुड,वणी,आजन्ती,कापसी,मोझरी या ग्रामपंचायतीचा समावेश असून झालेल्या निवडणुकीत भाजपाने पाचपैकी दोन ग्रामपंचायतीवर दावा केला तर महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी कांग्रेसने इतर तीन ग्रामपंचायतीवर बहुमत मिळविल्याचा दावा केला आहे.

यामुळे भाजपाला तालुक्यातील ग्रामीण भागात अजूनही जनाधार प्राप्त असल्याचे निदर्शनास येत आहे.
तालुक्यातील महत्वाच्या सिरुड ग्रामपंचायतीवर मात्र ९ पैकी ६ जागी भाजपापुरस्कृत सदस्य निवडून आल्याने तेथे भाजपाचे निर्विवाद वर्चस्व दिसुन येत आहे.आजन्ती येथे सत्ताधारी राष्ट्रवादी कांग्रेसच्या कोचर-कोठारी गटाने ११ पैकी ८ जागेवर विजय मिळविला असून तेथे राष्ट्रवादी कांग्रेसने पुन्हा एकदा आपला गड कायम ठेवला आहे.

मोझरी येथिल ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कांग्रेसने ९ पैकी ८ जागा जिंकल्याचा दावा केला तर भाजपाने तेथे ३ जागा जिंकल्याचा दावा केला असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.वणी (छोटी) येथे एकूण ९ जागेकरीता लढत झाली असून भाजपा समर्थित आघाडीने दावा सांगितला आहे तर कापसी येथेसुद्धा ६ जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविल्याचे दिसुन येत आहे.

आज सकाळी १० वाजता हिंगणघाट येथे तहसील कार्यालयात मतमोजणी सुरु झाली,लवकरच दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व पाचही ग्रामपंचायतीचा निकाल घोषित करण्यात आला.
यावेळी अनेक मतदारांनी NOTA चा पर्यायसुद्धा निवडला असल्याचे मतमोजनीदरम्यान दिसुन आले.