कर्मयोगी ठक्कर बाप्पा : आदिवासी वस्ती सुधारणा

109

[अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर स्मृती दिन.]

बहुश्रुत असलेल्या ठक्कर बाप्पा योजनेतील अनेक प्रस्तावित विकासकामे रखडलेली आहेत. यामुळे आदिवासी गाव-पाड्यांमधील जनतेला या कामाच्या सुविधा व विकासांपासून वंचित राहावे लागत आहे. आदिवासी विकास विभागांमार्फत शंभर टक्के तेथील ठक्कर बाप्पा अर्थात ‘आदिवासी वस्ती सुधार’ या योजनांतर्गत खेड्यांतील रस्ते, विहिरी, समाजभवन आदी विकासकामे केली जातात. मात्र गडचिरोलीसारख्या बहुसंख्य आदिवासी जिल्ह्यातील परिस्थिती ‘जैसे थे’च बघावयास मिळते. ही कामे निधीची कमतरता वा काही तांत्रिक बाबी किं इतर कारणास्तव ती रखडलेली आहेत, हे सांगता येणे कठीण आहे. भारतीय संविधानातील कलम २७५ (१) अंतर्गत विविध योजनेतील चौथ्या क्रमांकावर ठक्कर बाप्पा वस्ती सुधार कार्यक्रम दिलेला आहे. आता नुकताच दि.६ मार्च २०१७ च्या शासन निर्णयान्वये ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रमांचा विस्तार करण्यात आला. केंद्र शासनाने ही योजना ठक्कर बाप्पांच्या नावे सुरू केली. याचे नेमके कारण काय? तर त्यांच्या जीवनकार्यांविषयी थोडक्यात जाणून घेऊया…

प्रस्तावना : विश्वात सर्वात मोठी सेवा कोणती? असे कोणी विचाराल तर ती आहे मानव सेवा ! आम्हाला अशीच आदर्श सेवेची साक्षात मुर्ती ठक्कर बाप्पांच्या जीवन कार्यातून दिसून येते. स्वतः उच्चविद्याविभूषित राहूनही थोर पुरुष कशाप्रकारे आपल्या कर्तृत्वाने महान ठरतात, ते त्यांचे जीवनच सांगू शकते.
जन्म व परिचय : ठक्कर बाप्पांचा जन्म दि. २९ नोव्हेंबर १८६९ रोजी गुजरातच्या भावनगरमधील एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे पुर्णनाव अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर होते. त्यांनी माध्यमिकची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. इ.स.१८९१मध्ये इंजीनिअरिंग पास करून ते बीजीजेपी.रेल्वेत अभियंता झाले. त्यांचे वडिल विठ्ठलदास हे नावाप्रमाणेच आध्यात्मिक विचाराचे व सेवाव्रती होते. अमृतलालजींच्या पत्नीचे अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या संघर्षमय जीवनास प्रारंभ झाला. जेव्हा ते सन १८९५ ते १९०० पर्यंत पोरबंदरला होते तेव्हा भीषण दुष्काळ पडला होता. मरणासन्न अवस्थेतील मजूर पती-पत्नीने आपल्या तीन पोटच्या गोळ्यांना मातीत जिवंत गाडले. हे हृदयद्रावक दृश्य बघून त्यांचे मन हेलावून गेले. त्यांनी त्या बालकांना स्वतःच्या हाताने बाहेर काढले आणि मानव सेवेचा संकल्प केला. ठक्कर बाप्पांनी तेथील दुष्काळपिडीतांसाठी वर्गणीच जमवली नाही तर एक खाणावळही उघडली. ज्यात दररोज सहाशे-सातशे लोक जेवण करत असत.

कार्य व विचार : बाप्पा रोज पहाटे उठून पूजा-अर्चा आटोपून खाणावळीत पोहोचत. ते सर्वांत शेवटी जेवत. गावोंगावी जाऊन कांबळे-घोंगडे व वस्त्रप्रावरणे वाटत. शंकरपुरा गावातील लोकांची अन्नान्न दशा त्यांना पाहावली नाही. एक स्त्री झोपडीबाहेर पडत नव्हती, कारण अंगावर एकही धड वस्त्र नव्हते. या भुकेकंगाल स्त्रीला बघून बाप्पाचे हृदय पिळवटून निघाले व ढसाढसा रडले. त्यांनी ‘भिल्ल सेवा संघटना’ स्थापन केली. त्यामार्फत आदिवासींसाठी शाळा व आश्रम चालविले. इ.स.१९३२मध्ये ते झालोदच्या सीमेवरील बारिया या आदिवासी वस्तीस ११ कोस पायी चालत गेले. कारण तेथील लोक आपली सारी जमापुंजी दारू पिण्यात उडवित होते. तेथे त्यांनी कार्यकर्ते व विद्यार्थ्यांना घेऊन दारू तथा समाजातील कुप्रथांचा विरोध केला. चौका-चौकांत तक्त्यांवर “शराब मत पियो। शराब पिने से बरबादी आयेगी। रोज नहाओ। रोज नहाने से शरीर साफ रहेगा। दाद, खुजली और नहरू नहीं निकलेंगे। जादू-टोना करने वाले ओझाओं से मत डरो। वे लुटेरे हैं, तुम्हें ठग लेंगे।” असे लिहिले होते. या घोषणा वाचत जाणाऱ्या राजाने ठक्कर बाप्पांना धमकावले. त्यांना रातोरात राज्य सोडून जाण्याचा हुकूम फर्मावला.

संघटनेचे कार्य करता करता बाप्पा प्रत्येक बाल-आश्रमाच्या पुढ्यात जमलेली घाण व खरकटे स्वतः स्वच्छ करत असत. हे बघून इतरही त्यांचे अनुकरण करत. इ.स.१९४३-४४ च्या दुष्काळात कित्तेक गावी प्रेते जाळण्यास माणसे उरली नव्हती. अशा जागीही जाऊन त्यांनी भोजन, कपडेलत्ते आणि औषधे पुरवली. रात्री जागून ते कार्य करत. नोआखलीत इंग्रजांनी अस्पृश्यांची घरे जाळली. तेथे जाऊन त्यांनी दीन-दुःखीतांना मदत केली. म.गांधीजींसोबत ते ‘हरिजन सेवक संघ’मध्ये सेवाकार्यात जुळून होते. एकदा तर त्यांनी धुन्याचा गठ्ठा डोक्यावर घेऊन बाजार ओलांडत धोब्याचे घर गाठले होते. सेवेत कसल्याही प्रकारचे संकोच वा लाज बाळगता कामा नये, असे त्यांचे स्पष्ट मत होते. बालपणापासून बाप्पा प्रामाणिक होते. लोकांची काम करताना लोक आपली जमीन वाचविण्यासाठी नोटांनी भरलेली पिशवी दाखवून भ्रष्ट करू पाहत. परंतु ते भ्रष्टाचारास पाप समजत. जेव्हा ते लोकनिर्माण विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते तेव्हा तेथेही त्यांच्यावर पैसे घेण्यास दबाव टाकला गेला. तेथीलही नोकरी सोडणे त्यांनी उचित समजले होते.

समर्पण व जीवनांत : ठक्कर बाप्पा हे त्याग, सेवा, बलिदान आणि करुणेचे साक्षात मूर्तिमंत रुप होते. त्यांचे संपूर्ण जीवन मानवतेच्या सेवेकरीता समर्पित झाले होते. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळेच ते महान संतांच्या श्रेणीत मोडतात. त्यांनी खरोखरच मानव कल्याणासाठी आयुष्य वेचले. वयाच्या ८१ व्या वर्षांपर्यंत ते अथकपणे कार्य करतच होते. दि.२० जानेवारी १९५६ रोजी या महात्म्याने आपले शरीराला साभार अर्पण केले. याच त्यांच्या पुण्यप्रतापी कार्याची दखल घेऊन ‘ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार’ योजना अंमलात आणली.
पुरोगामी संदेश परिवारातर्फे संत ठक्कर बाप्पांना व त्यांच्या कार्यांना मानाचा लवून मुजरा !

✒️संकलन व शब्दांकन:-‘बापू’ – श्रीकृष्णदास निरंकारी,
[सदस्य, विश्वबंधुत्व माझे मिशन]
मु. प. पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास,
रामनगर, गडचिरोली,
जि. गडचिरोली (७४१४९८३३३९)
email – krishnadas.nirankari@gmail.com