महाविकास आघाडी शासन शेतकरी बांधवांच्या खंबीरपणे पाठीशी- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

34

🔸नुकसानभरपाईपोटी जिल्ह्याला सर्वाधिक निधी प्राप्त

✒️अमरावती(पुरोोगामी संंदेश नेटवर्क)

अमरावती(दि.12फेब्रुवारी):-गत हंगामात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 3 लाख 66 हजार 916 शेतक-यांना नुकसानभरपाईपोटी शासनाकडून 337 कोटी सहा लक्ष रूपयांची अनुदान अदा करण्यात आले आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या निर्देशानुसार गतीने व विस्तारपूर्वक पार पडलेली पंचनाम्याची प्रक्रिया व पाठपुरावा यामुळे जिल्ह्याला नुकसानभरपाईपोटी सर्वाधिक अनुदान मिळाले आहे. महाविकास आघाडी शासन शेतकरी बांधवांच्या खंबीरपणे पाठीशी असून, शेती क्षेत्राच्या हितासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली आहे.

जून ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक व फळबागांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतांची पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी वेळीच पाहणी केली. जिल्ह्यात गावोगाव जाऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व अतिवृष्टीने शेतात झालेल्या प्रत्येक नुकसानीचे तपशीलवार पंचनामे नोंदविण्याचे आदेश महसूल प्रशासनाला दिले. पालकमंत्र्यांचे निर्देश, स्वत: ठिकठिकाणी जाऊन केलेली पाहणी व पाठपुरावा यामुळे पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पूर्ण झाली व महसूल प्रशासनाकडून वेळेत पंचनामेही शासनाला सादर करण्यात आले. या भरपाईबाबत पालकमंत्र्यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावाही केला. त्यामुळे भरपाईच्या प्रक्रियेला वेग येऊन दोन टप्प्यांत भरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे.

पंचनामा प्रक्रियेनुसार जिल्ह्यातील बाधित गावांची संख्या 1 हजार 903 व शेतकरी बांधवांची संख्या 3 लाख 66 हजार 916 इतकी आहे. त्यानुसार जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 168.53 कोटी व दुस-या टप्प्यात 168.53 कोटी अशी एकूण 337.06 लक्ष रूपये अनुदान शासनाकडून वितरीत करण्यात आले. त्यापैकी 3 लाख 31 हजार 891 शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

अतिवृष्टी व पुरामुळे पीक व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले. या बाधित शेतक-यांना बागायती व सिंचनअंतर्गत प्रतिहेक्टरी 10 हजार रूपये व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 25 हजार रूपये दराने दोन हेक्टरपर्यंत मदत शासनाने जाहीर केली. या मदतीचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वीच जमा करण्यात आला. त्यानंतर दुसरा हप्ताही प्राप्त झाला. अतिवृष्टीनंतर पालकमंत्र्यांची गावोगाव तातडीची पाहणी व महसूल यंत्रणेला वेळोवेळी दिलेले निर्देश, सविस्तर पंचनाम्याची प्रक्रिया व पाठपुरावा यामुळे अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक मदत निधी प्राप्त झाला आहे.

यंदा कोरोना साथीमुळे शेती क्षेत्रासह विविध क्षेत्रांत अडचणी उभ्या राहिल्या. त्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव अडचणीत सापडला. जगाचा पोशिंदा मानल्या जाणा-या शेतकरी बांधवांची ही अडचण लक्षात घेऊन मदत निधीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाख शेतकरी बांधवांना भरपाई मिळू शकली. महाविकास आघाडीने शेतीकेंद्रित विकासाला प्राधान्य दिले असून, शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.