उन्हाळी धानावरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना

39

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.17फेब्रुवारी):-कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही यांनी जिल्ह्यातील उन्हाळी धानाचे सर्वेक्षण केले असता सद्यस्थितीत धान पीक हे रोवणी केलेल्या अवस्थेत असुन खोडकिडीचा प्रादुर्भाव हा २.५ ते २० टक्के याप्रमाणात कमी अधिक आढळुन आलेला आहे. यावर्षी उन्हाळी हंगामामधे सतत ढगाळ वातावरण, रात्रीस अधिक आर्द्रता यामुळे उन्हाळी धान पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसुन येत आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास येणा-या काळात हा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खोडकिडीचा पतंग १-२ सें.मी. लांब, समोरील पंख पिवळे, मागील पांढरे तर समोरील पिवळ्या पंखावर प्रत्येकी एक ठळक काळा ठिपका असतो. अंडी पुंजक्याच्या स्वरूपात असून पिवळसर तांबड्या तंतुमय धाग्यांनी पानाच्या शेंडयावर झाकलेले असतात. पुर्ण वाढ झालेली अळी २० मि.मी. लांब पिवळसर व पांढरी असते. खोडकिडीची अळी खोड पोखरते त्यामुळे रोपाचा गाभा मरतो व फुटवा सुकतो. यालाच किडग्रस्त फुटवा/गाभेमर/डेडहार्ट म्हणतात. हा फुटवा ओढल्यास सहज निघून येतो अशा फुटव्यास दाणे न भरलेल्या पांढ-या ओंब्या येतात. यालाच पळीज किंवा पांढरी पिशी म्हणतात.

१.खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी २० याप्रमाणे कामगंध सापळे लावावे.
२.प्रकाश सापळयाचा उपयोग करावा.
३.ट्रायकोग्रामा जापोनीकम या परोपजीवी किडीचे १,६०,००० अंडी प्रति हेक्टरी, ०७ दिवसांच्या अंतराने ३-४ वेळा सोडावित.

४. क्लोरेनट्रानीलीप्रोल ४ दाणेदार १० किलो किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड ४ जी, १८ किलो किंवा फिप्रोनिल ३ जी २५ किग्रॅ. प्रति हेक्टरी बांधीमध्ये पाणी असतांना टाकावे किंवा क्लोरेनट्रानीलीप्रोल १८.५ टक्के एस.सी.३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. एकाच किटकनाशकाचा वारंवार वापर करू नये.

वरील माहिती www.atmachandrapur.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याकरीता शेतकरी बांधवानी धान पिकाची वेळीच पाहणी करून पिक संरक्षणाचे उपाय योजावेत असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही, व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी कळविले आहे.