शिवजयंती निमित्त रोटवद गावात वैचारिक प्रबोधन

43

🔹शिवरायांना डोक्यावर नाही तर डोक्यात घ्या – लक्ष्मण पाटील

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगाव(दि.20फेब्रुवारी):- तालुक्यातील रोटवद गावातील युवक मित्र परिवाराच्या वतीने शिवजयंती औचित्य साधून वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रोटवद गावात शिवजयंतीच्या निमित्ताने वैचारिक प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व पुष्प अर्पण करण्यात आले. तद्नंतर वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम सुरू झाला.

विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष व शिवव्याख्याते लक्ष्मण पाटील यांनी शिवरायांच्या इतिहासावर प्रकाश टाकला. शिवरायांना आजवर आपण डोक्यावर घेतले परंतु आता शिवरायांना डोक्यात घेण्याची वेळ आली आहे. बहुजन प्रतिपलक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक व्यक्ती नसून एक अखंड विचार आहे. छत्रपतींचे स्वराज्य म्हणजे अठरापगड जातींना सामावून घेणारे लोककल्याणकारी राज्य होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास जगभरात केला जातोय. स्वच्छ चारित्र्य, उत्तम व्यक्तिमत्त्व, कुशल संघटक, शिवनीतीचे जनक, शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे अशा विविध गुणांनी संपन्न असलेल्या छत्रपतींचा आदर्श आजच्या युवकांनी घ्यावा, असे प्रतिपादन लक्ष्मण पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित सरपंच सुनिताबाई सुदर्शन पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील नरेंद्र रमेश पाटील, माजी सरपंच सुदर्शन युवराज पाटील, माजी जि. प. सदस्य सुभाष देवराम पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला धरणगाव वरून महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी. डी. पाटील सर, हेमंत माळी सर व आबासाहेब राजेंद्र वाघ हेही उपस्थित होते. कार्यक्रमाला गावातील पुरुष – महिला व युवकांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन युवक मित्र परिवार रोटवद यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोटवद येथील ओम शांती केंद्राचे विजय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील नरेंद्र पाटील यांनी केले.