मुद्रणकलेस मानाचा मुजरा

27

(विश्व मुद्रण दिवस)

प्रत्येक वर्षी २४ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मुद्रण दिन – वर्ल्ड प्रिन्टिग डे’ म्हणून जगभर साजरा केला जातो. मुद्रणकलेचे जनक योहानेस गुटेनबर्ग यांचा जन्मदिवस ‘जागतिक मुद्रण दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म जर्मनीतील माइंत्स येथे दि.२४ फेब्रुवारी १३९८ रोजी झाला. मुद्रण कलेच्या शोधामुळेच आज आपण वैचारिकदृष्ट्या समृद्ध आहोत. आज आपण सोशल मीडिया क्षेत्रात केलेली प्रगती ही मुद्रणकलेचा उत्तम नमुना आहे. त्यापूर्वी ताडपत्रावर किंवा तत्सम पानांवर मोडी लिपीद्वारे लिहून माहिती वा विचारांचे जतन केले जात होते. हे सर्वांना विदितच आहे.

इसवी सनानंतरच्या दुसर्‍या शतकात चीनी लोक कोरलेल्या मजकुरावर विशिष्ट शाई लावून त्यावर ओलसर कागद दाबून मुद्रणाचा ठसा मिळवीत असत. आपण लहानपणी बटाट्याच्या कापलेल्या फोडींवर अक्षरे व शब्द कोरून ती फोड रंगात डुबवून मित्रांच्या कपड्यांवर उमटवित होतो कि नाही? हो, अगदी तस्संच बरं का? याचप्रकारे चीनी लोकांना मुद्रणप्रतिमेद्वारे प्रिंटिंगचे तंत्र सापडले. सहाव्या शतकानंतर संगमरवरी दगडाची जागा लाकडाने घेतली. कारण दगडावर अक्षर कोरण्यापेक्षा लाकडावर कोरणे जास्त सोपे वाटले. इ.स.१०४१ ते १०४८ या कालखंडात बी.शंग नावाच्या चिनी व्यक्तीने मुद्रणासाठी चल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येणाऱ्या खिळ्यांची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात चीनमध्ये मुद्रण पद्धतीचा शोध लागला. त्यानंतर या क्षेत्रात प्रचंड गतीने प्रगती झाली. त्याकाळी मुद्रण पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांत कागद, शाई व मुद्रणप्रतिमांचा समावेश होता. पूर्वी स्तुपांमध्ये बौद्ध धर्मातील काही विचार व मजकूर संगमरवरी दगडी खांबावर कोरून ठेवले जात होते.

इ.स.१४३४ ते १४३९ हा काळ मुद्रणकलेस सर्वाधिक महत्त्वाचा काळ ठरला. या काळात जर्मनीतील योहानेस गूटेनबर्ग यांनी ‘धात्वलेखी मुद्रण’ नावाचा प्रकार शोधून काढला. परंतु हा प्रकार तत्पूर्वीच अस्तित्वात होता, असे सांगण्यात आले. मात्र याबाबत कोणतेही पुरावे उपलब्ध झाले नाहीत. पुढे गुटेनबर्गने मुद्रा, मातृका व शिशाचा उपयोग करून ४० पानांचे बायबल छापले. तो जर्मनीतील चांदीचा कारागिर होता. इ.स.१४५५मध्ये त्यांनी चल अक्षरांचा व मुद्रणकलेचा शोध लावल्यामुळे कमी वेळात मुद्रण होऊ लागले. इ.स.१७९०मध्ये विल्यम निकलसन या इंग्रज वैज्ञानिकांनी खिळ्यांवर शाई लावण्यासाठी कातडी आवरणाचा एक रूळ तयार करून तो वापरायला सुरुवात केली. यामुळे अशा यंत्रावर प्रथम चक्रीय गतीचा उपयोग केला गेला. तसचे इंग्लंडमध्ये प्रथमतः धातूचा उपयोग केलेले मुद्रणयंत्र तयार करण्यात आले. त्यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अमेरिकेत ओटमार मेर्गेन्टालर यांनी ‘लायनोटाईप’ नावाचे एक पूर्ण ओळ जुळवण्याचे यंत्र शोधून काढले. काही दिवसानंतर अलिबागमध्ये ‘सत्यसदन’ नावाचा पहिला छापखाना सुरू झाला. असेच तेथे एकंदर तीस छापखाने होते.

तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर चौदा-पंधराव्या वर्षी महाराष्ट्रातील कुलाबा जिल्ह्यात एकूण दहा मुद्रणालये – प्रिन्टिग प्रेस्सेस स्थापन झालीत. माझ्याही पाहणीत त्यात एका चौकोणी तबकडीत अक्षरे, काना, मात्रा.. जुळवून शब्द, त्यानंतर वाक्यरचना मग उतारा तयार केला जात असे. तो ठप्पा मशीनद्वारे फटक-फटक करत कागदावर उमटविला जात असे. आपल्या लग्नपत्रिका अशाच छापल्या जात असत, याची बऱ्याच जणांना माहिती आहे.
मुद्रणकलेची अशी घोडदौड सुरू असतानाच काही दिवसांत कंप्युटरवरून कमाण्ड देऊन मुद्रणकलेचे तंत्र विकसित झाले. त्यामुळे ते अत्यंत कमी त्रास, सहज, सुलभ, कमी वेळात व वाजवी खर्चात पूर्ण होऊ लागले. त्यानंतर काही वर्षातच संगणकाच्या विकासासोबतच इंटरनेटचा विकास होऊन हळूहळू समाज माध्यमेही विकसित होत गेली. अशा पद्धतीने मुद्रणकलेचा विकास होत गेला. आज आपण त्यावर अगदी सहजरित्या टाईप, छपाई वा मुद्रण करू शकतो. योहानेस गुटेनबर्ग यांनी जर्मनीत माइंत्स येथे दि.३ फेब्रुवारी १४६८ रोजी जगाचा निरोप घेतला. या येथवरच्या प्रवासात त्यांच्यासह अनेक संशोधकांचे प्रयत्न कामी आले.
!! आज विश्व मुद्रण दिनाच्या औचित्याने त्या सर्व संशोधकांच्या कर्तृत्वास मानाचा मुजरा !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री कृ. गो. निकोडे गुरुजी.
(संत-लोक साहित्य आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक.)
मु. पो. ता. जि. गडचिरोली (७७७५०४१०८६).
email – nikodekrishnakumar@gmail.com