फुले दांपत्यांना भारतरत्न नकोच

34

पुणे महानगरपालिकेने नुकतेच एका ठरावा द्वारे देशातील महिला शिक्षणाचे प्रणेते ज्ञानज्योती सावित्रीमाई आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले या समाज सुधारक जोडप्यास ‘भारतरत्न’ देण्याची शिफारस राज्य सरकारकडे पाठविण्याचे आयोजिले आहे.हे वृत्त वाचून वाचून बहुजनांना काहीतरी विशेष वाटायचे किंवा आनंद व्यक्त करायचे काही एक कारण नाही. कामकाजातील प्रथेनुसार हा विनंती ठराव आता राज्य व केंद्र सरकारकडे पाठविला जाईल आणि केंद्राकडून ही एक चालून आलेली संधी समजून योग्य वेळी याचा आपल्या मतलबी राजकारणासाठी कसा उपयोग करून घेता येईल याची योजना तयार केली जाईल.

आतापर्यंत, पुणे शहरातील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ महर्षि धोंडो केशव कर्वे आणि प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न प्राप्त झाला आहे.या दोघांना पुरस्कार देण्याबाबत आमचे काहीही म्हणणे नाही.’भारतरत्न’ हा जरी सर्वोच्च नागरी पुरस्कार असला तरी भारतातील तमाम बहुजनांनी फुले दांपत्यांना हा पुरस्कार प्रदान करायला विरोध केला पाहिजे.
इ.स.१८२७ मध्ये जन्मलेल्या ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांना शिक्षित करण्याचे प्रयत्न करीत असतानाच अस्पृश्यता आणि जातीयता निर्मूलनासाठीही भरीव कार्य केले.शोषित जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी आणि उत्पीडित वर्गाच्या उन्नतीसाठी जोतिबांच्या नेतृत्वाखाली ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना करण्यात आली. त्यांनी भिडेवाडा येथे १८४८ मध्ये पुण्यातील पहिली मुलींची शाळादेखील सुरू केली.इ.स.१८३१ ला जन्मलेल्या सावित्रीमाई फुले यांनी देखील ज्योतिबांच्या समाजनिर्मितीच्या आणि शिक्षण प्रसाराच्या कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून देशातील महिला शिक्षणाला चालना दिली. शिक्षणाच्या कार्यासाठी या दोघांनी आपले आयुष्य वाहून घेतले.

१८९० मध्ये ज्योतिबांचे निर्वाण झाले. त्यानंतर पुढे पुणे येथे प्लेगच्या महामारीत जनतेची सेवा बजावत असताना त्यांना ही त्याची बाधा होऊन इ.स.१८९७ रोजी सावित्रीमाईंचेही निर्वाण झाले.समाज सुधारक ज्योतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव मंजूर करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली नागरी संस्था असली तरी हा पुरस्कार जाहीर करायला महाराष्ट्रासारख्या पुरोगामीत्वाचा डांगोरा पिटणा-या राज्याला सव्वाशे वर्षे लागली ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे.ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या सामाजिक कार्याशी भारतातील समस्त बहुजन समाजाचा विशेषतः पुण्यातील नागरिकांचा भावनिक संबंध आहे. असे असूनही किती तरी वर्षाआधी त्यागमय वृत्तीने केलेल्या फुले दांपत्याच्या या समाजपरिवर्तनीय ऐतिहासिक कार्याला किनार करून इतरांना आधी पुरस्कार दिले गेले हे निश्चितच भूषणावह नाही.

आजपर्यंत सर्वोच्च नागरी पुरस्कारांच्या यादीवर जर नजर टाकली तर फुले दांपत्यांच्या नखांची सर येणार नाही अशी काही नावे त्यात आढळतात. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून करोडो रुपयांची माया गोळा केलेले, केवळ स्वतःचे उच्चांक प्रस्थापित करण्यासाठी आपल्या संघ आणि समुहाचा बळी देणारे, समाज आणि देशहितासाठी शून्य कामगिरी असलेल्या काल परवा डोळे उघडलेल्यांचा जर फुले दांपत्याच्या आधी पुरस्कारासाठी विचार केला जात असेल आणि असामान्य कर्तृत्व असलेल्या फुले दांपत्यांचा राजकीय लाभासाठी विचार केला जात असेल तर हा आम्हा बहुजनांचा घोर अपमान आहे. तसे पाहिले तर क्रांतीसुर्य ज्योतीबा तात्या, ज्ञानज्योती सावित्रीमाई, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य या पुरस्कारांपेक्षा किती तरी अधिक उंचीवरचे आहे ते ‘विश्वभूषण’ आहेत. त्यामुळे त्यांची अशा व्यवसायिक लोकांच्या श्रेणीत गणना करायची ही कल्पनाच आम्हाला संतापजनक वाटते. इतकेच.

✒️लेेखक:-विठ्ठलराव वठारे
उपाध्यक्ष पॉवर ऑफ मिडीया फाउंडेशन महाराष्ट्र.
९३२५४९९०४६.