आणि स्त्रिया झाडांना कवटाळल्या

88

(चिपको आंदोलन प्रारंभ दिन)

चिपको आंदोलन हे झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन होते. यामध्ये वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणार्‍या वृक्षाला कवटाळून ठेवले. या आंदोलनामुळे शेकडो झाडांची जंगले, हजारो पक्षी व प्राण्यांची निवासस्थाने वाचली. दि.२६ मार्च १९७४ रोजी गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरादेवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनास सुरूवात झाली. अमृतादेवीचा कित्ता गढवालच्या गौरादेवीने गिरवला. गढवालमधील रेनी गावाजवळची झाडे तोडण्यासाठी ठेकेदारची माणसे आली, तेव्हा गावातल्या पुरुषांना नुकसान भरपाई देण्याच्या आमिषाने चमोलीला नेण्यात आले होते. गावात फक्त स्त्रियाच होत्या. गावातील महिला मंगल दलाची प्रमुख असलेली गौरादेवी हिने गावातील महिलांना जमा केले. त्या रात्रभर झाडांना चिपकून उभ्या राहिल्या. हे ‘चिपको आंदोलन’ देशभर गाजले आणि गौरादेवीमुळे समाजाला एक नवा आदर्श मिळाला.

ठेकेदार झाडं कापायला असंख्य माणसं घेऊन आला की ‘त्या’ झाडाला घट्ट मिठ्या मारून उभ्या राहायच्या आणि ‘पेड कटने नही देंगे’ अशा घोषणा द्यायच्या. एप्रिल १९७३मध्ये अलकनंदा खोऱ्यातील मंडल गावात ‘चिपको’ आंदोलनाची सुरुवात झाली. अलकनंदा खोऱ्यातील जंगलाचा एक भूभाग क्रीडासाहित्य तयार करणाऱ्या एका कंपनीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यातून आंदोलन उभे राहिले. ‘दाशैली ग्राम स्वराज्य संघ’ या स्थानिक संस्थेने शेतीची अवजारे तयार करण्यासाठी राज्य सरकारकडे याच जंगलात वृक्षतोड करण्याची परवानगी मागितली होती; ती नाकारली गेली होती. त्यामुळे साहजिकच व्यापारी कंपनीला दिलेल्या परवानगीला लोकांनी विरोध केला. त्यातून ‘चिपको’ आंदोलन उभे राहिले. त्यात गौरादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी यांसारख्या स्त्रिया हिरिरीने उतरल्या. गौरादेवीने गावागावांत फिरून स्त्रियांना एकत्र आणले आणि जंगलात ‘चिपको’ आंदोलन सुरू केले.

जंगलात तब्बल अडीच हजार झाडांचा लिलाव त्यावेळी करण्यात आला. गावातील आंदोलकांनी विरोध केला, तरीही लिलाव झालाच. ठेकेदारांना लोकांच्या विरोधाची कल्पना होती. त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांची जुनी देणी देण्याच्या निमित्ताने चामोलीत बोलावून घेतले. त्यांच्या गाफीलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी गुपचूप रेनीच्या जंगलात मजूर पाठविले. एका छोट्या झाडांची कत्तल करण्यासाठी आलेल्या मजुरांना पाहिले व धावत गावात ही खबर दिली. पण गावात फक्त १५-२० स्त्रिया आणि काही छोटी मुले होती. पुरुष मंडळींना निरोप कळवून ते परत येईपर्यंत दोन-तीन दिवस लागणार होते. तोपर्यंत जंगलतोड अटळ होती. हे लक्षात येताच गावातील महिला आपल्या मुलांसह जंगलात आल्या. बायकांसह सगळी लहान मुले झाडाला चिकटून उभी राहिली. ठेकेदारांनी स्त्रियांना विवस्त्र करण्याच्या धमक्या दिल्या. पण एकीनेही ठेकेदारांच्या धमक्यांना भीक घातली नाही. शेवटी मजूरांनी माघार घेतली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतात झालेले हे पहिलेच अनोखे आंदोलन होते.

पुढे हे आंदोलन ‘चिपको’ आंदोलन म्हणून ओळखले जाऊ लागले. स्त्रियांनाही याचे महत्त्व कळले. वन शाबूत तर जीव व जीवनही सुरक्षित असेल. अर्थात जंगल वाचले तर वृक्ष, वेली, पशू, पक्षी, जगतील. पाणीपाऊस योग्यप्रमाणात पडल्यास सर्व जीवजंतूचे अस्तित्व कायम असेल. त्यामुळे मानवीजीवनही सुखी व समृद्ध होईल, यात शंकाच नाही!वृक्षतोडीबाबत आजही शासन तशीच पद्धती योजत आहे. लाकूडफाटा व इतर वनसंपदा अल्पदरात विकून जंगले नष्ट करू लागले आहे. वरवर दाखविण्यापुरता वृक्षारोपण अभियान राबविले जात आहे. मात्र सर्वसामान्य जनतेलाच याचे परिश्रम, खर्च, लाभ व हानी सहन करावे लागत आहेत. जंगलातील साधे सरपण, रानमेवा, मोहफुले, चारं, टेंभरं आदी गोळा करण्यास वनविभागातर्फे मज्जाव केला जात आहे. ज्या अर्थी वृक्षारोपण अभियानात जनतेचा निष्काम सहभाग घेतला जातो त्या अर्थी जनतेला वनातील जीवनावश्यक वस्तू घेण्यासही अधिकार दिले पाहिजे. तेव्हाच पुढेही चिपको आंदोलने उत्स्फुर्तपणे होत राहतील व वृक्षारोपण आणि वनसंवर्धन याकामी महिलांसह सारेच कटिबद्ध असतील, हे निश्चित !

✒️संकलक व लेखक:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी,
(रयतेचा वाली – जिल्हा प्रतिनिधी व मराठी-हिंदी साहित्यिक.)मु. गुरूदेव प्रार्थना मंदिराजवळ, रामनगर, गडचिरोली.ता. जि. गडचिरोली (७७७५०४१०८६)
इमेल – Krishnadas.nirankari@gmail.com